आवडत्या व्यक्तीबद्दल थोडसं झालेलं बोलणं सुद्धा दिवसभर आपल्याला आनंदी ठेवतं.
हर्षदा पिंपळे
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे…
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला,
जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे…
आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे…!!
ही ‘बालकवींनी’ अर्थात ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे’ यांनी लिहीलेली कविता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयाची. यातील काही ओळी या विषयाला अनुसरून खरच खूप स्पष्ट आणि बोलक्या आहेत.
(एक काल्पनिक प्रसंग-)
त्या दिवशी ‘राधा’ सहज संध्याकाळी बाहेर फेरफटका मारायला गेली. आणि जाता जाता तिला त्या on the way च असलेल्या बागेमध्ये ‘शमिका’ दिसली.( शमिका म्हणजे राधाची जवळची मैत्रीण.)शमिकाचे आईवडील काही दिवसांपूर्वीच एका अपघातात मरण पावले.
शमिका तशी मनाने अगदी खंबीर.नाही म्हंटल तरी ती आईबाबांच्या धक्क्यातून थोडी फार सावरली होती.मन रमावं म्हणून ती बागेत जात होती. तिथे असलेल्या आजी-आजोबांशी, लहान मुलांशी ती मनमोकळ्या गप्पा मारायची.
आणि असच गप्पा मारता मारता तिला तिथे असणाऱ्या काही आजी-आजोबांनी तिच्याच आईबाबांविषयी तिला माहीत नसलेल्या कितीतरी कौतुकास्पद गोष्टी सांगितल्या.तिला त्या गोष्टी ऐकताना अक्षरशः भरून आलं होतं.आनंदाने ऊर कसा भरून गेला होता.त्या दोन शब्दांनी तिच्या आनंदाला उधाण आलं होतं.ईतके दिवस आईबाबांच्या जाण्याने अस्वस्थ असणारी ती आज थोडीफार खुलली होती.अगदी कळ्यांची फुलं व्हावी तशीच…!
आणि राधा हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवत होती.नंतर थोड्यावेळाने राधा आणि शमिकाची भेट झाली. दोघीही भरभरून गप्पा मारत होत्या. आणि गप्पा मारता मारता शमिका राधाला सहज बोलून गेली.की
“एखाद्या आवडत्या व्यक्तीबद्दल, आपल्या व्यक्तीबद्दल झालेलं बोलणं किती सुखावणारं असतं.त्या क्षणभर बोलण्याने मनभर आनंद सहज मिळून जातो.” पुढचे काही क्षण तर यामुळे हसतहसत सहजपणे निघून जातात.त्या आनंदाची व्याख्या शब्दांत मांडणं कठीण…!
(प्रसंग काल्पनिक असला तरी वास्तविक जीवनात असे प्रसंग आपण अनेकदा अनुभवत असतो.)
त्या दोघींच्या या गप्पा चालूच राहिल्या पण त्यावरून एक लक्षात आलं…..की…,
माणसाला जगायला काय हवं असतं…? अन्न-वस्त्र-निवारा या जरी मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी त्याची मूळ गरज ही मानसिक आधाराची असते.अन्न वस्त्र निवारा याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. पण हेही तितकच खरं की माणूस माणसाशिवायही राहू शकत नाही.
अन्न-वस्त्र प्रमाणेच एखादी व्यक्तीही आपल्या गरजेची होऊन जाते.पण केवळ एक गरज म्हणून आपण त्या व्यक्तीकडे कधीच पहात नाही.एखादं object म्हणून त्या व्यक्तीकडे आपण कधीच पहात नाही. त्या व्यक्तींशी आपलं कोणतं ना कोणतं नातं जोडलं गेलेलं असतं.यातील काही लोकं आपल्या सवयीची होऊन जातात. आपल्या आवडीची होऊन जातात.त्यांच्याशिवाय आयुष्य जगणं म्हणजे एखाद्या प्रलयासारख वाटतं.
शेवटी मनुष्याचा आनंद आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत संवाद साधण्यात, आपल्या आवडत्या व्यक्तींविषयी चांगलं ऐकण्यात असतो.आवडत्या व्यक्तीशी झालेलं क्षणभराच बोलणं किंवा आवडत्या व्यक्तीबद्दल झालेलं बोलणं दिवसभर मनाला उभारी देतं.मनाला आनंद देत राहतं.
एक प्रकारची निराळी सकारात्मक ऊर्जाच त्या बोलण्याने आपल्या अवतीभवती फिरत असते.खरचं ते क्षणभराच बोलणं किती किती सुखावणारं असतं याची कल्पना केवळ जाणणाराच करू शकतो.
आवडणारी व्यक्ती कुणीही असु शकते.तुमचे आई-बाबा, काका-काकू, मित्र – मैत्रिणी ते अगदी एखादे शिक्षक. त्यांच्याबद्दल झालेलं बोलणं आपल्याला नेहमी हवहवसं वाटतं. कारण आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी बोललं जातय ही भावना मुळातच सुखाचे क्षण देणारी असते.
मनातील आनंद द्विगुणित करणारी असते.जसं एखादा आवडीचा पदार्थ खाल्यावर आनंद होतो तसाच आनंद आवडत्या व्यक्तीबद्दल बोलणं झाल्यावर होतो.
आणि मुळातच आवडती व्यक्ती ही फार जवळची असते.आणि एखादी व्यक्ती उगाचच आवडत नसते.त्यांच्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे ती व्यक्ती आपल्याला हवीहवीशी वाटते.आपलीशी वाटते.
आणि जवळच्या व्यक्तीबद्दल असं बोलणं झालं तर नैसर्गिकपणे चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. त्या थोड्या थोडक्या बोलण्याने कितीतरी आनंदाचे क्षण सहज आठवत राहतात.
कदाचित ही माणसं आपल्या आनंदासाठीच जन्माला आली असावीत असं वाटतं.सहवास असला तरी आनंदच आहे. आणि सहवास नसला तर केवळ त्यांच्याविषयीच्या बोलण्यानेही आनंदाचे झरे मनात वाहू लागतात.
So….आपलं वागणं-बोलणं असच असूद्या जेणेकरून इतरांना आणि स्वतःलाही निखळ आनंद मिळेल.(आपण जिवंत असताना आणि गेल्यानंतरही.)
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला