Skip to content

आयेशाने व्हिडिओ करून केलेली आत्महत्या आणि मानसशास्त्र!

आयेशाने व्हिडिओ करून केलेली आत्महत्या आणि मानसशास्त्र!


मिलिंद जोशी, नाशिक


काल युट्युबवर आयेशाचा व्हिडिओ पाहण्यात आला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तो शूट केला आणि नंतर आईवडिलांना फोन केल्यानंतर साबरमती नदीत आपले जीवन संपवले. तिचे वय फक्त २३. अनेकांनी तो व्हिडिओ बघितला असेल.

दोन मिनिटाच्या त्या व्हिडिओमध्ये ती सांगत होती की, “माझ्या मृत्यूबद्दल कुणालाही दोषी धरण्यात येऊ नये, बहुतेक माझेच नशीब वाईट होते म्हणून माझ्यावर ही वेळ आली.”

आयशा मुळची गुजरातची. तिचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करत होते. आयेशाचे आजोळ राजस्थानचे. त्यामुळे तिचे राजस्थानमध्ये येणेजाणे होते. तिथेच आरिफही रहात होता. ( आयेशाचा पती ) तसा तो आयेशाचा दूरचा नातलगही होता.

अगदी लहानपणापासून ते एकमेकांना ओळखत असल्यामुळे त्यांचे प्रेम जमले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवले. आयेशाच्या घरच्यांनाही यात काहीच वावगे वाटले नाही. कारण तेही आरिफला तो लहान असल्यापासून ओळखत होते.

२०१८ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि काही दिवसातच आरिफने खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली. आयेशाकडून हुंड्याची मागणी सुरु झाली. तिच्या वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे आधी तिने नकार दिला. पण त्याने तिला माहेरी पाठवून दिले.

शेवटी आयेशाच्या वडिलांनी कसेतरी करून आरीफची मागणी पूर्ण केली आणि आयेशाला परत पाठवले. त्यानंतर २/३ महिने व्यवस्थित गेले आणि पुन्हा नवीन पैशाची मागणी सुरु झाली. परत आयेशाला माहेरी पाठवले गेले.

त्यावेळी तिच्या वडिलांनी आरिफला दीड लाख रुपये दिले. परत २/३ महिन्यांनी तेच. सव्वा वर्षात चार वेळेस असे झाल्यानंतर तिने आरिफ आणि कुटुंबियांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याने प्रकरण अजूनच बिघडले.

त्यानंतर तिने पुन्हा एकदा जमवून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. ज्याला ती लहानपणापासून ओळखत होती, जो तिच्या नात्यातला होता, ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले तोच तिच्याशी वैऱ्यासारखा वागत होता. त्याच्यातील हा बदल तिला सहन होत नव्हता.

तिच्या आईवडिलांची स्थितीही बघवत नव्हती. त्यांच्या दुःखाला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत ही सल मनात होतीच. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशी तिने आरिफला फोन केला.

त्यावर त्याने उत्तर दिले, ‘तुला जीव द्यायचा तर दे, हवे तर त्याचा व्हिडिओही बनव आणि मग जीव दे.’ आणि तिने ते प्रत्यक्षात आणले. जीव देण्याआधी तिने तिच्या आईवडिलांनाही फोन करून आपला निर्णय सांगितला. ( ते बोलणेही युट्युबवर वायरल झाले आहे. )

आई वडिलांनी तिला रोखण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. ज्यावेळी पोलीस आरिफला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले त्यावेळी तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब फरार झाले होते.

या घटनेमुळे काही गोष्टी पुन्हा एकदा जगासमोर आल्या.

१. अनेकदा नात्यातील व्यक्तींनाही तुम्ही पूर्ण ओळखू शकत नाहीत.

२. लग्नापुर्वीचा स्वभाव आणि लग्नानंतरचा स्वभाव यात खूप फरक पडू शकतो.

३. प्रेमाची सफलता लग्नात नाही तर सुखी सहजीवनात असते.

४. ज्यांच्या मनात हुंड्याची लालसा (लालच) उत्पन्न होते त्यांच्यासाठी प्रेम, नाते, नैतिकता या गोष्टी गौण ठरतात.

५. धर्म कोणताही असो, हुंड्याची समस्या सगळीकडेच आढळते. फरक असतो तो फक्त त्याला दिल्या जाणाऱ्या नावात.

६. धर्माची शिकवण, नैतिकता या सगळ्या गोष्टी इतरांना सांगण्यासाठी असतात, आचरणात आणण्यासाठी नाही.

७. अनेकदा आत्महत्या स्वतःचा त्रास नाही तर इतरांचा त्रास बंद व्हावा यासाठीही केली जाते.

८. अनेकदा कमी वयात मुलांना प्रेम म्हणजेच सर्वकाही वाटू लागते आणि ज्यावेळी खरी परिस्थिती लक्षात येते त्यावेळी ते मनातून तुटतात. अशा वेळी त्यांना समजावणे खूपच अवघड असते.

९. साधनसुविधा वाढल्या म्हणून मानसिकता बदलत नाही.

१०. शालेय शिक्षणाने पैसा कमाविण्याचे ज्ञान मिळते, नैतिकतेचे नाही.

११. सगळ्यात महत्वाचा मुद्दा… ‘पालकत्व’ हे नोकरी, व्यवसाय यासारखेच महत्वपूर्ण काम ( जॉब ) आहे. त्याचा मोबदला पैशात नाही तर ‘सद्वर्तनी पाल्याच्या’ रुपात मिळतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!