Skip to content

आयुष्य प्रत्येकवेळी घड्याळाच्या काट्यावर नाही चालू शकत..

आयुष्य प्रत्येकवेळी घड्याळाच्या काट्यावर नाही चालू शकत..


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


विश्वास दाभोळकर अतिशय शिस्तीत राहणारा माणूस. याला फक्त एक मुलगा असतो. विश्वास दाभोळकरांना वेळेवर न येणारी माणसे, जेवताना वचावचा खाणारी माणसे, चहा बशीत ओतून फुरफुर करत पिणारी माणसे, अजिबात आवडत नाहीत. आणि दाभोळकर घराण्यात म्हणे क्रीम किंवा अगदी शुभ्र पांढरा शर्टच घातला पाहिजे असा नियम. दाभोळकरांचा वाढदिवस असतो, त्यादिवशी, त्यांची बायको, मुलगा हे दोघे त्यांना एक खूप छान पुष्पगुच्छ देतात आणि गिफ्ट म्हणून एक खूप छान रंगीत शर्ट देतात.

पण विश्वास दाभोळकर, अगदी इस्त्री केलेल्या चेहरा ठेवून हातात फुलांचा गुच्छ घेतात. शर्टचा रंग बघून मात्र त्यांचा तोल सुटतो. ते खेकसतात कि हा काय रंग आहे. मला हा शर्ट अजिबात नको आहे.

वाढदिवसाच्या दिवशी दाभोळकरांना एक मोठी ऑर्डर मिळणार असते. त्यासाठी दिल्लीहून मोहनलाल म्हणून एक व्यक्ती दाभोळकरांना १० वाजता भेटायला येणार असते. आज वाढदिवस म्हणून बायकोला वाटत असते कि यांनी आज घरी राहावे. पण विश्वासला काही ते मान्य होते नाही.

मात्र संध्याकाळी त्यांच्या व्यवसायातील सगळ्यांना एक पार्टी मात्र ठेवलेली असते. दाभोळकरांना त्यांची बायको म्हणते कि मी एक लेख वाचला त्यात असे म्हटले आहे कि तुम्ही जर वर्षातून एक दिवस जरी तुमचे रुटीन सोडून वेगळ्या विषयावर, वेगळ्या माणसांना भेटलात तर तुमचे आयुष्य ५ वर्षांनी जास्त होते. पण या सगळ्यावर दाभोळकरांचा अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे ते हट्टाने ऑफिसला जातात.

ऑफिसला जाताना ड्रायव्हर उशिरा येतो, त्यामुळे त्याच्यावर खेकसतात व स्वतःच गाडी घेऊन जातात. मोहनलाल खूप उशिरा येतो. हे वैतागतात. पण त्यांच्या व्यवसायातील पार्टनर अग्रवाल त्यांना शांत राहून मोहनलाल बरोबर व्यवहार करायला सांगतात. मोहनलाल अपेक्षेपेक्षा जास्त पैश्याची ऑर्डर घेऊन येतो. दुपारी जेवण झाल्यावर दाभोळकरांना म्हणतो कि मला तुमची गाडी आजच्या दिवस द्या, तुम्ही टॅक्सीने परत जा. दाभोळकर गाडी मोहनलालच्या ताब्यात देऊन टक्सी पकडायला जातात, तर नेमका त्यांचा संप सुरु असतो.

त्यामुळे विश्वास दाभोळकरांना चालत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. असेच जात असताना त्यांचा बालपणीचा मित्र भेटतो. हा मित्र आता बराच म्हातारा दिसू लागलेला असतो, त्यामुळे दाभोलकर त्याला ओळखत नाहीत.

पण हा मित्र मात्र ओळखतो, आणि मग त्याच्या आयुष्यातील गोष्ट ऐकता ऐकता दाभोळकरांना खूप आश्चर्य वाटते, कि इतका कमी पगार असून देखील हा माणूस स्वप्नं कशी काय बघू शकतो. तर दाभोळकर त्यानंतर कोणा-कोणाला भेटतात त्यांचा दिवस कसा जातो हे पाहायला मिळत एक उनाड दिवस या चित्रपटामध्ये.

आयुष्यात वेळ ही नक्कीच महत्वाची आहे. त्यामुळे आयुष्याला शिस्त लागते. आयुष्याला वळण लागत. पण हे जरी कितीही खर असलं तरी आयुष्य हे काही घड्याळाचा काटा नाही. प्रत्येकवेळी, प्रत्येक क्षणी एका ठराविक लयिमध्ये सर्व गोष्टी घडायला.

अनेकदा आपण शिस्तीच्या नावाखाली स्वतःला इतकं काटेकोर करून टाकतो की आयुष्यातले छोटे छोटे आनंद, अचानक घडणाऱ्या गोष्टी ज्या चेहेऱ्यावर हसू आणतात, आपल्याला जवळच्या माणसांसोबत घालवायचे क्षण विसरून जातो. काम हे जीवन जगण्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. पण त्यातून पण आनंद घेता आला पाहिजे. जर या कामाने, या अति शिस्तीने आपण आताचे लाखमोलाचे, सुखाचे क्षण गमावत असू तर त्याचा काय उपयोग? आपण अश्या वेळी जवळ जवळ मशीन होऊन जातो.

एक उनाड दिवस हा चित्रपट आपल्याला हेच सांगतो, की रोजच्या साचेबंद आयुष्यातून स्वतःला बाहेर काढून, स्वतःच्या पदाला थोड्या वेळेसाठी का होईना बाजूला ठेवून एक साधं माणूस म्हणून रोजच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला पाहिजे आणि अश्या वेळी वेळ जरा मागे पुढे झाली तरी चालते. यातूनच आपल्याला नवीन दृष्टी मिळते.

कारण आपण काही रोबोट नाही. प्रत्येक गोष्ट काही वेळेत आणि पैश्यात मोजता येत नाही. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या या सर्व गोष्टी आपला श्रम, थकवा घालवतात. म्हणूनच आपल्याला आयुष्यात एक तरी असा उनाड दिवस असला पाहिजे. जो आपले क्षण वेळेत नाही तर समाधानात मोजेल, ज्यातून आपल्याला पैश्याचा नफा नाही झाला तरी जीवनातील मौल्यवान गोष्टींचा नफा मिळवून देईल, आयुर्मान वाढवेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!