आयुष्य निरर्थक झाल्याची जाणीव का होते ??
सौ. मिनल वरपे.
आपण आपलं आयुष्य अगदी सरळ साध्या पद्धतीने जगावं.. जे आहे त्यामधे आनंद मानावा.. समाधान मानावं.. जे नाहीये त्याची अपेक्षा करत रडत.. दुःखी होत आयुष्य जगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं…
जे आपल्याला अपेक्षित आहे ते स्वतः पूर्ण करण्याची धडपड करायची.. मिळालं तर आनंद नाहीतर आपण प्रयत्न केले याच समाधान..
आपण जे आयुष्य जगतोय त्यामधे फक्त आपण एकटे नसतो आपल्यासोबत आपल कुटुंब, परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक, सहकारी या सगळ्यांचा समावेश आपल्या जीवनात होतो.
यांच्या अवतीभोवती आपलं आयुष्य फिरत असते. पण ते आयुष्य तेव्हाच मजेशीर असते जेव्हा सर्वांमध्ये असून सुद्धा त्यांच्यात न अडकता आपलं आपण मोकळं जगलं तरच..
अडकु नये म्हणजे नेमंक काय तर आपल्या येणाऱ्या सुखदुःखात या सर्वांना आपण सहभागी करतोच शिवाय त्यांच्या सुखदुःखात आपण सुद्धा सहभाग घेतोच.. पण या जगात जो स्वतःकडून अपेक्षा करेल आणि त्या पूर्ण करेल तो सुखी समाधानी..एखाद्यावेळेस त्या अपेक्षा पूर्ण जरी नाही झाल्या तरीसुद्धा स्वतःला दोष देऊन आपण अनुभव घेतो आणि पुढे जातो. पण याच अपेक्षा आपण जेव्हा दुसऱ्यांकडून करतो तेव्हा आपल्याला त्या पूर्ण झाल्या की आनंद आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की त्रास होतो.
आणि जर आपण सतत समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करत राहू तर तो सुद्धा आपल्याकडे अपेक्षेने पाहणार. आपण त्याला हवं तसं केलं की तो आनंदी आणि जर आपण जे केलय त्याचा त्यांना विसर पडला की आपण दुःखी. आपल्या अपेक्षा ते जर पूर्ण नाही करू शकले तर आपल्याला सगळं निरर्थक वाटू लागते.
आपण जगताना स्वतःसाठी जगल तर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो पण तेच जर आपण इतरांसाठी जगत असू आणि त्यांना याची जाणीव नसेल तर त्यावेळी आपण का आणि कशासाठी जगतोय असा विचार करत आपल्याला सगळं निरर्थक वाटू लागते.
काही स्वप्न असेही असतात ती स्वप्नच समजून सोडून द्यायची भलेही ती आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले असले तरीसुद्धा… पण आपण त्या स्वप्नपूर्तीसाठी इतकी धडपड करत.., इतकं स्वतःला त्यामधे अडकवतो की ते पूर्ण नाही झालं की आपल्याला जगण्यातला अर्थ सापडत नाही कारण ते स्वप्न सोडून आपण दुसर जग पाहतच नाही इतका त्या स्वप्नाचा ध्यास आपण घेतलेला असतो.आणि शेवटी निराश होऊन आयुष्याला दोष देत त्यालाच निरर्थक ठरवून आपण मोकळे होतो.
आपल्या माणसांमध्ये, आपल्या आवडीच्या व्यक्तींमधे आपण इतके गुंतून जातो की तेच आपलं आयुष्य होतात. पण अस अचानक काही घडते आणि ते आपल्याला सोडून जातात.. त्यांच्या अचानक जाण्यामुळे, आपल्या आयुष्यातील त्यांच्या उणीवेमुळे आपण स्वतःला हरवून बसतो. आणि आजूबाजूला जरी आनंद उत्साह असेल तरी आपल्याला तो आनंद तो उत्साह जाणवत सुद्धा नाही कारण आपण पूर्ण त्या व्यक्तीच्या दुःखात अडकलेलो असतो..म्हणून आजूबाजूला जरी सगळं असलं तरी त्याची किंमत आपल्या आयुष्यात शून्य होते.
म्हणून जगणं अस असावं जे दुसऱ्यांना आनंद देईल पण पहिले आपण आनंदी असायला पाहिजेत.. अपेक्षा या आपण आपल्याकडून करून प्रयत्न चालूच ठेवले तर उत्साह कुठेच थांबणार नाही.. जवळची व्यक्ती कितीही आवडीची असली तरी तिच्या जाण्यामुळे आपलं आयुष्य न बदलता जगण्यातील आनंद शोधत राहावं.. तेव्हाच आपलं आयुष्य निरर्थक आहे हा चुकीचा विचार आपल्या मनात नाही येणार…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

