Skip to content

आयुष्य जगताना पूर्णविराम सुद्धा वापरायचा असतो !!!

आयुष्य जगताना पूर्णविराम सुद्धा वापरायचा असतो !!!


सौ. मिनल वरपे


शाळेत असताना आपल्याला व्याकरणात विरामचिन्हे कधी आणि कुठे वापरावीत हे शिकवलं. .कधी प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्न चिन्ह.. आश्चर्यकारक काही असेल तर उद्गारचिन्हं अगदी यासोबतच इतर सर्व चिन्हांचा उपयोग आपल्याला शिकवला आहेच.. आणि त्यापैकीच आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच असलेलं विराम चिन्ह म्हणजे पूर्ण विराम..

शाळेत वाक्य कुठे संपणार तिथे आपण सहजच पूर्ण विराम वापरायचो. शाळेत शिक्षक असायचे लक्ष द्यायला मात्र आज आपल्या आयुष्यात आपल्यालाच लक्ष देऊन या पूर्णविरामचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे.. कारण जेव्हा आपल्याला योग्य वेळी कुठे थांबायचं हे कळलं तर नक्कीच आपल्याला नंतर कोणताच पश्चाताप होणार नाही..

आता हा पूर्णविराम वापरायचा कुठे.. म्हणजेच आयुष्यात नेमकी थांबायचं कुठे तर..

ज्यावेळी आपल्या रागाचा पारा चढत असेल व याच रागामुळे आपले शब्द काय असतात, आपण काय वागतो, कधी कोणत पाऊल उचलतो, कधी कोणाला दुखावतो तर कधी जवळची माणसं सुद्धा गमावतो.. पण तेच जर आपल्याला आपला राग कुठवर न्यायचा आहे… या रागाला कुठे थांब म्हणायचं आहे हे जर कळलं तर इतक्या साऱ्या रागामुळे कळत नकळत होणाऱ्या चुकांपासून आपण लांब राहू.

आपल्याला एक खूप वाईट सवय असते ती म्हणजे काही मिळत असेल तर त्यामधे समाधान न मानता अजून जास्त कस मिळवता येईल याचे आपण जास्त प्रयत्न करतो म्हणजेच जर मला आज चांगली नोकरी आहे घर व्यवस्थित आहे पण तरी आहे त्यामधे माझं समाधान नाही मला घराचा बंगला कधी होईल याची जास्त हुरहूर असते आणि त्यासाठीच माझे इतके प्रयत्न सुरू असतात की जास्तीत जास्त कस कमवता येईल यासाठी मी रात्रीचा दिवस करत असतो..

तिथेच आपण आपला वेळ घालवतो, ऊर्जा वापरतो, आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मुकतात आणि जवळची माणस कधी आपल्यापासून दूर जातात हेसुद्धा आपल्याला कळत नाही.. पण तेच जर आहे त्यात समाधान मानलं.. प्रयत्न चालूच ठेवले पण त्यासाठी कोणतीच घाई नाही.. सगळं अगदी विचार करून, सर्वांना वेळ देत,. वेळेचं योग्य नियोजन केलं तर आपली ऊर्जा सुद्धा योग्य ठिकाणी वापरली जाते.. आणि हवं ते साध्य करता येते काहीच न गमवता.. फक्त किती कष्ट करायचे आणि कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं तरच…

प्रेम असो नाहीतर मैत्री आपल्या भावना, आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा यांना कुठे थांबायचं हे माहीत असेल तर हे नात अगदी योग्य दिशेने जाते पण जर तिथे स्वतःच्या भावनांवर, अपेक्षांवर, इच्छांवर ताबा नसेल तर त्या नात्यातील जिव्हाळा, आदर आणि नात्यातील ओढ कमी होत जाते.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले विचार.. आपल्या विचारांची सुरवात ही कधी सुरू होते हे आपल्याला कळतच नाही.. कोणत्या क्षणाला आपण काय विचार करू हे इतरांच सोडा आपल्याला सुद्धा माहीत नसते.. पण हे विचार योग्य ठिकाणी थांबले तर त्याचा उपयोग होईल त्रास होणार नाही पण हेच विचार जर थांबायचं विसरत असतील तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्या जीवनावर नक्कीच होतो.. म्हणून कधी कोणते विचार करावे, कोणते करू नये आणि जे विचार आपल्याला पुढे जाऊन त्रास देणार असतील त्यांना आताच योग्य वेळी थांबवलं तर आपण नेहमीच आपली ऊर्जा योग्य प्रकारे वापरणार..कारण विचार करत राहिलो तर हातात असलेली वेळ कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही.. आणि आलेला प्रत्येक क्षण जसाच्या तसा पुन्हा मिळत नाही.

आपण जे नात स्विकारतो, करिअर निवडतो त्यामधे आपल्याला पुढे काय होणार याची कल्पना नसते.. प्रत्येक नात सुरवातीला जस छान असते अगदी तसच आयुष्यभर राहत नाही मग अस नात उगाचच टिकवण्यात काय अर्थ आहे जर दोन्हीकडे त्या नात्याची ओढ राहिलेली नसेल.. करिअर निवडताना सुद्धा वरवर बघून ऐकून आपण ते निवडतो पण नंतर जेव्हा प्रत्यक्ष शिकताना त्यामधे आपल्याला जास्त रस वाटत नाही..

लक्ष लागत नाही कारण जस वाटलं होत तस ते नसते मग अशावेळी कोण काय बोलेल याचा विचार न करता आपल्याला मिळणाऱ्या आनंदासाठी जिथे जातोय तिथे थांबायचं.. आणि नव्याने आपल्याला आवडेल ते करण्याची सुरवात करायची.. कारण नात असो नाहीतर करीअर आयुष्यभर मन मारून, मनावर दगड ठेवून, इतरांचा विचार करून आपल्याला मोकळं जगता येणार नाही त्यापेक्षा ते तिथेच थांबवून नव्याने जगायचं..

आवडत नाहीत त्या गोष्टी जर आपण करत असू तर त्यातला आनंद आपल्याला अनुभवता येत नाही.. मग अशावेळी ज्या गोष्टी आवडतच नाहीत त्या करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया न घालवता कोणताच नकारार्थी विचार न करता तिथे थांबलं पाहिजे.कारण आवडत नसलेल्या गोष्टी केल्या तर आपल्यातील नकारात्मक विचार हे वाढतच जातात त्यापेक्षा तिथेच थांबलेल बर..

आपल्यातील हाव असो नाहीतर समजून घेण्याचा आपला स्वभाव असो.. कधी कोणाला दुखवण्याच आपल वागणं असो नाहीतर सहन करण्याची आपली सवय असो… अगदीच आपला आराम असो अथवा काम करण्याची पद्धत या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे जर आपल्याला कळलं तर नक्कीच आपल्याला मोकळं जगता येईल..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आयुष्य जगताना पूर्णविराम सुद्धा वापरायचा असतो !!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!