“आयुष्यात येणाऱ्या संकटांना संघर्ष आणि मेहनतीचा अनुभव द्या.”
मधुश्री देशपांडे गानू
“जब कोई बात बिगड जाये,
जब कोई मुश्किल पड जाये..
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज
न कोई है, न कोई था..
जिंदगी में तुम्हारे सिवा,
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज..”
किती सुंदर गाणं आहे. आणि सगळ्यांचं आवडतं. आता प्रियकर प्रेयसीसाठी, नवरा बायको साठी म्हणतोयं. “माझ्या प्रत्येक दुःखाच्या, संकटाच्या वेळी तू माझ्याबरोबर राहा. तुझ्याशिवाय माझं या दुनियेत कोणीच नाही.” असं तो सांगतोय. पण विचार करा, हे गाणं तुम्ही स्वतःसाठीच म्हणतायं. खरंतर आपली पूर्ण साथ फक्त आपण स्वतःच देऊ शकतो.
आपल्यासाठी दुसरे कोणी नाही तर आपण स्वतःच स्वतःसाठी कायम बरोबर असतो. सुखातही आणि दुःखातही. मग हे गाणं स्वतःसाठी गाऊन पहा. प्रत्येक संकटाला समर्थपणे सामोरे जायला तुमची स्वतःचीच साथ किती गरजेची आहे हे तुम्हांला कळून येईल.
एक छान उदाहरण देते. २९ वर्षीय मेजर विभूती शंकर धोंडीयाल हे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले. विचार करा, त्यांच्या तरुण पत्नीवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल. पण ती तडफदार स्त्री आपल्या वीर मरण आलेल्या पतीसाठी फक्त शोक करत बसली नाही.
तर तिने नवऱ्याला योग्य सन्मान आणि आदरांजली म्हणून स्वतः भारतीय सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ही केवढी कठीण आणि मोठी गोष्ट आहे! पण अत्यंत संघर्षाने आणि कष्टप्रद मेहनतीने तिने प्रशिक्षण पूर्ण केले. आणि ती भारतीय सैन्यात अभिमानाने दाखल झाली.
हे एकच उदाहरण पुरेसं आहे. हे सांगायला की येणाऱ्या संकटाला संघर्ष आणि मेहनतीने चोख उत्तर कसं द्यायचं? पुन्हा नव्या तडफेने आयुष्याला सामोरं कसं जायचं? जीवन हे सुखदुःखाचा प्रवास आहे. आणि हा प्रवास कोणालाही चुकलेला नाही. पण दुःखाचा सामना करताना माणूस घाबरतो, हतबल होतो, निराश होतो. त्याची मानसिक स्थिती बिघडते. मन योग्य विचार, कृती करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. आयुष्य एका संकटाशी, दुःखाच्या क्षणापाशी थांबून राहतं.
आज कोविड मुळे संकटांचा ही महापूर आला आहे. प्रेमाची माणसं गमावल्याचे दुःख, नोकरी व्यवसाय बंद पडल्याचे दुःख.. एक ना अनेक.. आज नैराश्यात वावरणाऱ्या आणि सहजी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कारण आपण संकटांचा सामना करू शकत नाही. विचार करण्याची ताकद संपते. आपली इच्छाशक्ती मरण पावते. संकटं आली तर फक्त दुःख करत बसणं हा कशावरचाही उपाय होऊ शकत नाही. त्याही परिस्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवून तुम्ही नक्की मार्ग काढू शकता.
सर्वात प्रथम “बदल अनिवार्य आहे आणि तो मीच घडवला पाहिजे” ही इच्छाशक्ती तुमच्यात हवी. “स्वतःचं आयुष्य बदलण्याची, विचारधारा बदलण्याची जबाबदारी फक्त माझी आहे.” हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तोच क्षण अत्यंत आशादायी असतो. आज कित्येकांनी नोकरी गेल्यावर छोटे मोठे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.
कोणी भाजीचा व्यवसाय, कोणी वडापावची गाडी. विचार केला तर प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणतेही काम, कष्ट, मेहनत छोटी किंवा मोठी नसते. आलेल्या दुःखावर संघर्षाने आणि मेहनतीने मात करायची असते. अत्यंत सकारात्मक विचारांनी, कृतीने तुम्ही हे करू शकता. मोह, लोभ, लालसा, अवास्तव अपेक्षा या गोष्टींनी दुःखाला आमंत्रण मिळतेच. खूप अपेक्षा न ठेवता अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करायचे.
स्वतःचे शंभर टक्के द्यायचे. यश मिळतंच. वेळ लागेल. संयम, सारासार विचार याची मेहनतीला जोड हवीच. भावनांचं सुनियोजन हवं. शक्यतो स्वतःचे काम स्वतः करा. अवलंबून राहू नका. स्वयंसिद्ध बना. अस्थिर मनाने तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मन शांत, स्थिर हवं.
स्वतःच्या आवडीच्या कामांमध्ये, छंदांमध्ये मन रमवा. मुळात सतत कशाततरी व्यस्त रहा, स्वतःला गुंतवून ठेवा. आज कित्येक जण छंदाचे व्यवसायात रुपांतर करताना दिसतात. म्हणजे संघर्ष, मेहनत हे कष्टप्रद वाटत नाही. आवडीच्या कामाचा आनंद, आणि समाधान आणि त्यातून मिळणारं आर्थिक यश काही औरच असतं.
संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आपसूकच अनेक यशाचे मार्ग दिसायला लागतात. कोणतीही गोष्ट सहज साध्य नाही. संघर्ष आणि मेहनतीला पर्याय नाही. पण या मेहनतीनेच मिळणारे यशाचे अनुभव हे अत्यंत आनंदाचे, अभिमानाचे, सुखदायी असतील, हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


