” आयुष्यात मिळालेल्या गोष्टींपेक्षा न मिळालेल्या गोष्टी आयुष्य बदलून टाकतात.”
मधुश्री देशपांडे गानू
“माना कि जिंदगीभर खुशनसीब रहें हम..
पर जिद तो उसे पाने की रही, जो हासिल न हो सका…..”
मीच लिहीलेला शेर आहे हा! किती खरंय! “माणूस नेहमीच हातचं सोडून पळत्याच्या मागे धावत सुटतो.” जे आपल्या जवळ आहे, आपल्या हक्काचं आहे मग वस्तू असो नाहीतर माणसं, त्यांचे मूल्य त्याला कधीच कळत नाही. त्याला नेहमीच जे आपलं नाही, सहज प्राप्त होणार नाही याचंच सुप्त आकर्षण वाटत असतं. काहीवेळा कौटुंबिक, सामाजिक नियम मोडूनही तो या अकर्षणामागे धावत सुटतो. आणि चुकीच्या मार्गाने त्याचं आयुष्य बदलतं.
आज तुम्हीं अगदी अत्याधुनिक स्मार्टफोन घेतलात तरी उद्या बाजारात नवीन मॉडेल येतं. मग वाटतं एक दिवस थांबलो असतो तर! नवीन फोन मिळाला असता. म्हणजे कितीही आणि काहीही स्वतःचं असलं तरीही माणसाचं समाधान काही होत नाही. आणखी, अजून आणखी हवं असं त्याला वाटतच राहतं.
आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे सगळं आलबेल आपल्या आयुष्यात घडावं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण प्राप्त परिस्थिती, अकस्मात उद्भवणारे चांगले-वाईट प्रसंग, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक चढ-उतार यामुळे अचानक आयुष्य वेगळं वळण घेतं. आणि आपण न योजलेले, कल्पनाही न केलेलं आयुष्य आपल्याला जगावं लागतं. निभवावं लागतं. अशावेळी आपण योजलेल्या आणि न मिळालेल्या गोष्टी आपल्याला आणि आपलं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकतात.
उदाहरणार्थ, एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारे २ प्रेमी जीव. कोणत्याही टोकाला जाऊन एकमेकांबरोबर राहायची, लग्न करण्याची तयारी असलेले. पण दोन्ही घरातून प्रचंड विरोध झाल्याने कायमचे दुरावले. पुढे मुलीचे लग्नही झाले. मुलगा मात्र आतून पार कोसळला. त्याला नैराश्याने घेरले. उमेदीची शिक्षणाची, नोकरीची वर्षं वाया गेली. त्यातून मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कसातरी सावरला.
शिक्षण, नोकरी असा धोपट मार्ग त्याने स्वीकारला. यथावकाश त्याचेही लग्न झाले. पण तोपर्यंत तो मानसिक, भावनिक दृष्ट्या एवढा कोरडा झाला होता की त्याचं मन अगदी दगडासारखा झालं होतं. त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर त्याच्या पत्नीला सोसावे लागले.
प्रत्येक वेळी न मिळालेल्या गोष्टी आयुष्यावर विपरित परिणाम करतात असं तर नक्कीच नाही. एखादा छोटासा प्रसंग, एखादी अपमानास्पद घटना तुमचा स्वाभिमान जागवायला कारण ठरते. अचानक अकस्मात घडलेला प्रिय व्यक्तीचा मृत्यू तुम्हांला स्वतःला शोधायला, स्वत्व सिद्ध करायला कारणीभूत ठरतो. आणि आत्मभान आलं की आपसूक यशाचे दरवाजे खुले होतात. तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट तुम्हांला समजतं. मग तुम्हीं स्वतःची कोणाशीही तुलना करत नाही.
भौतिक गोष्टींची ही तुलना करत नाही. दुसऱ्या जवळ काय आहे?, माझ्या जवळ काय नाही?, याला तुमच्या लेखी काहीही अर्थ उरत नाही. तुम्हांला तुमचा मार्ग गवसलेला असतो. आणि तुम्हीं आतून आनंदी, शांत, समाधानी होता. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता.
एक सुंदर आणि खरं वास्तवातलं उदाहरण देते. एक दहा वर्षाचा गरीब घरातील मुलगा. घरात खाणारी तोंड खूप. मुलाला मात्र चित्रकलेचे वेड. जिथे खायची भ्रांत, तिथे चित्रकलेचे लाड कोण पुरवणार?? फक्त मारच मिळायचा. मग त्या मुलाने जिद्दीने घर सोडले. मुंबईत आला. खूप हलाखीत दिवस काढले.
पण सचोटी, प्रामाणिकपणा होता. कधी भीक मागितली नाही. थातूरमातूर कामं केली. सिनेमांचे पोस्टर रंगवले. वेटरची नोकरी करत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण पूर्ण केलं. आणि हळूहळू मेहनतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार बनला. जवळपास 50 च्या वर जागतिक दर्जाची चित्रप्रदर्शनं भरवली. अमाप पैसा मिळवला पण पाय कायम जमिनीवर राहिले. कृतज्ञता कधीही विसरला नाही. परिस्थितीने जे मिळालं नव्हतं, जे नाकारले गेलं होतं त्यामुळेच त्याचं आयुष्य आमूलाग्र बदललं. आणि त्यांनी यशस्वी, कीर्तिमान आयुष्य घडवलं.
ज्या गोष्टी आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्ती, आपले कुटुंबीय आपल्या सोबत सुखात आणि दुःखात कायम असतात त्यांची नेहमीच कदर करा. कोणत्याही परक्या माणसासाठी आपल्या घरातल्या माणसांना दुखावू नका. तुमच्याजवळ जे नाही त्याची खंत बाळगू नका. त्याबद्दल निराश होऊन दुःखी होऊ नका.
जे तुमचं, तुमच्या हक्काचं नाही, जे दुसऱ्याच्या हक्काचं आहे ते त्याच्यापासून हिरावून घेऊ नका. त्याने तुम्ही कधीच सुखी होणार नाही. आभासी जग आणि सोशल मीडिया हेच खरं मानणारे लोक आज जास्त आहेत. त्यामुळे प्रेमभंग, प्रेमात आणि आर्थिक फसवणूक याने नैराश्यग्रस्त होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
तुम्हांला न मिळालेल्या गोष्टी किंवा तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचा नक्कीच वास्तववादी आणि प्रामाणिक प्रयत्न करा. पण न मिळालेल्या गोष्टींमुळे आयुष्य पणाला लावू नका. याहूनही सुंदर, आनंदी काही मी निर्माण करू शकते/ शकतो असा आत्मविश्वास बाळगा. आणि सकारात्मक विचारांनी, कृतीने तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः बदलून आनंदी व्हा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


