आयुष्यात निसटून गेलेली माणसं पुन्हा भेटायला हवीत, असं का वाटतं…??
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
चिमटीत पकडून ठेवायच म्हंटलं तरीही काही गोष्टी निसटून जातातच….!! तसच आयुष्यात काही माणसं येतात आणि निसटूनही जातात. पण मग आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांना भेटावसं वाटतं.मनामनातून पुन्हा एकदा त्यांना बिलगावसं वाटतं.आयुष्यात ही माणसं येतात आणि कधी निसटून जातात काही कळतही नाही. तरीही त्यांना पुन्हा एकदा भेटायला हवं….असं आपल्याला वाटत असतं.पण असं का होतं…???चला त्याचा उलगडा करूयात तुमच्या माझ्या मनातील शब्दा शब्दांतून………!!
आयुष्य हे माणसांशिवाय अपूर्ण आहे. तुमच्या माझ्या एकट्याचं हे आयुष्य नाहीच.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि जातातही. जन्म आणि मृत्यूच्या वेळी भेटणाऱ्या माणसांच काही माहीत नाही. पण आयुष्याच्या मध्यावर खूप माणसं भेटतात. पण त्यातील काही माणसं मात्र मनामनात एक प्रकारची आयुष्य जगण्याची रूंजी घालून जातात.
त्यांचा क्षणभर सहवास सुद्धा चेहऱ्यावर मधाळ असं हासू फुलवतो.काही कणखर अगदी साचेबंद आयुष्य जगायला शिकवतात. वरून काटेरी पण आतून रसरशीत आणि गोड स्वभावाची माणसं हृदयाच्या एका हक्काच्या कोपऱ्यात नकळतपणे जपली जातात.थोडे खटके उडायचे त्यांच्याशी पण कितीही काही झालं तरीही पावलं पुन्हा त्यांच्याकडेच वळायची.
फुलांना बहर यावा तशीच माणसं आपल्या आयुष्यात येतात.पण फुलांचा बहर कधीतरी जाणार असतो हे मात्र आपण मान्यच करत नाही.अगदी ही माणसं केव्हा कुठे भेटतील काही सांगता येत नाही.तसच ती कधी आयुष्यातून निसटून जातील तेही सांगता येत नाही. आपण आपल्या माणसांशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.आणि ही आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर भेटलेली माणसं कधी कधी कळत नकळतपणे निसटून जातात अगदी अळवावरचे थेंब ओघळतात न तसचं….!!
इतके छान ऋणानुबंध जुळलेले असतात न त्यांच्याशी की ते बंध कधी तुटूच नये असं वाटत असतं. मृगाकडे जशी कस्तुरी असते न तशीच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात. जी आपल्यातल्या उणीवा शोधून जाणीवा समृद्ध करतात. एकटेपणात त्यांच्या मायेचा स्पर्श अगदी सुखावणारा असतो.धकाधकीच्या आयुष्यातही विश्रांतीसाठी अशा माणसांचा सहवास म्हणजे एक पर्वणी असते.अडखळताना सावरणारी, वेळ आलीच तर कान पिळून समजावणारी ही माणसं जगण्याच्या असंख्य वाटा शोधायला नवीन ऊर्जा निर्माण करतात.
चिखलात माखलेल्या मनाला कमळासारखच जगायला शिकवतात. कारल्यासारखं कडू सत्य सांगतात पण खोटी स्वप्न कधीच दाखवत नाही. उंचावरून पडल्यावरही खळखळून कसं हसायचं..??हरल्यानंतरही पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची जिद्द कुठून आणायची…??हे सहज शिकवून जाणारी माणसं आयुष्यच बदलून टाकतात.
पण हीच माणसं आयुष्यात कधीकधी सहज निसटून जातात. आणि मन मात्र त्यांच्या आठवणीत रडत बसतं.आशेकडे डोळे लावून बसतात की ही माणसं आयुष्यात पुन्हा एकदा तरी भेटतील.अशा या ईवलुशा जीवाला फुलपाखरासारखं आनंदाने भिरभिरायला लावणाऱ्या या माणसांची आपल्या आयुष्यातील उणीव नकोनकोशी वाटते.
कारण आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडतात,कधीकधी दुःखाने डोह भरलेला असतो. पण समजून सांगणारी हीच माणसं नकळतपणे आयुष्यातून निसटून जातात.आणि मग त्यांना भेटावसं वाटतं.खांद्यावर डोकं ठेवून त्यांच्याच कुशीत सगळ्या भावनांना मोकळं करावसं वाटतं. पुन्हा पुन्हा त्या जुन्या माणसांच्या सहवासात थोडा वेळ घालवावासा वाटतो.
पटतय की निसटून गेलेलं पुन्हा मिळणं कठीण असतं. आणि ही तर माणसं……!!अशी मनाला मऊ मखमली रेशमी स्पर्श करणारी माणसं आयुष्यात भेटणं फार कठीण असतं.आणि मिळालीच अशी माणसं आयुष्यात तर ती कधीकधी निसटून जातात अनावधानाने. आयुष्य जेव्हा लपंडाव खेळायचं तेव्हा हीच माणसं सुखद धप्पा द्यायला यायची.किती छान वाटायचं त्यांच्या सहवासात. घुसमटलेल्या श्वासांना व्हेंटिलेटरवर न ठेवता मोगऱ्याच्या बागेत नेऊन पुन्हा श्वासांना गंधाळायला लावणारी..,थकलेल्या या देहाला पाचू-मरवा होऊन ताजीतवानी करणारी..
ही माणसं निसटून जातात.निसटुन जातात पण जाताना मनपटलावर वेगळे ठसे उमटवून जातात. पण कधीकधी प्रत्यक्ष सहवास हवाहवासा वाटतो. त्यांना भेटावसच वाटतं. आठवणींना जागं करून आयुष्याला नवी कलाटणी द्यावीशी वाटते.पुन्हा एकदा त्याच किनारी भेटून गुंतत चाललेल आयुष्य अलगद सोडवावस वाटतं.
खरचं.. ,निसटून गेलेल्या माणसांना पुन्हा भेटावसं वाटतं…. त्यांच्या वेदनांना वाटून घ्यावसं वाटतं….माझ्या /आपल्या जगण्यातल्या सुखाला थोडं वाटून द्यावसं वाटतं…. कधीतरी कुठेतरी ही निसटून गेलेली माणसं भेटायला हवी असं अगदी मनापासून वाटतं.!!
तुम्हालाही असच वाटतं न…?? निसटून गेलेली ही माणसं कधी भेटलीच तर नव्याने आठवणींची मैफिल आवर्जून सजवा……जगण्याला नवं ऊधाण येतं त्याने….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Really it is 100 % true .I am also feel the same .