Skip to content

“आयुष्यात एकटे राहण्याचा निर्णय योग्य असेल काय??”

“आयुष्यात एकटे राहण्याचा निर्णय योग्य असेल काय??”


मधुश्री देशपांडे गानू


माणूस समुह प्रिय प्राणी आहे. समाजप्रिय आहे. त्याच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ आणि महत्त्वाच्या आहेत. समाजाचे स्वतःचे असे अलिखित नियम असतात. ते सांभाळून प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगत असते. शक्यतो या नियमांना धक्का लागू नये यासाठी प्रयत्न करत असते. आपल्या हातून समाजाने बोट दाखवावे असे काही घडू नये असा विचार प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय माणूस करत असतो. समाजाच्या चालीरीतींचा पगडा मनावर, मानसिक, भावनिक जाणीवांवर, स्वभावावर, कृतीवर आपसूकच पडत असतो.

आपण एका कुटुंबात राहत असतो. त्याचा अविभाज्य भाग असतो. आपला स्वभाव, आपले निर्णय, विचार, कृती हे या कुटुंबातील जडणघडणीवर अवलंबून असतात. मूल जन्माला आल्यापासून आई-वडील, भावंडं, आजी-आजोबा, नातेवाईक, शेजारी-पाजारी केवढा गोतावळा असतो आपला! एकटे राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. थोडं मोठं झाल्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे मित्र-मैत्रिणी निवडू शकतो. थोडक्यात काय घरी असो वा बाहेर आपल्याला कायम कोणाची तरी सोबत लागते. फक्त मनुष्यप्राण्याला मन, भावना, वाचा दिली आहे. त्यामुळे मनातलं बोलायला , भावना व्यक्त करायला आपल्याला सतत कोणीतरी समोर लागतं. किती सहज आणि नैसर्गिक गोष्ट आहे ही!

तारुण्यात एका विशिष्ट वयात आपल्याला कायमस्वरूपी जोडीदाराची गरज भासते. जी आयुष्यभर साथ देईल. शारीरिक, मानसिक , बौद्धिक, भावनिक, आर्थिक सगळ्या पातळ्यांवर आपल्याबरोबर राहील. मग लग्न करणं आलं. हे एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसूनही सगळ्यात महत्त्वाचं आणि जवळचं असतं. ही अशी सोबत असते ज्यामध्ये काहीच अंतर नसतं. “लग्न जुगार आहे”, असं वडीलधारी मंडळी म्हणतात आणि ते बरोबरही आहे.

दोन भिन्नलिंगी माणसे, भिन्न परिस्थितीत वाढलेली केवळ लग्न बंधनाने कायमची एकमेकांशी बांधली जातात. चोवीस तास एकत्र राहायला लागल्यावर एकमेकांचे गुणदोष समजू लागतात. समजूतदारपणा , तडजोडीचे धोरण, वास्तवाचा स्वीकार, जोडीदाराचा सन्मान , त्याच्या वेगळ्या मतांचा आदर, विश्वास आणि प्रेम या सगळ्या नाजूक धाग्यांनी हे नातं टिकून राहतं, फुलतं, खुलत जातं. मग एकमेकांची इतकी सवय होऊन जाते की एकमेकांशिवाय राहण्याची कल्पनाही सहन होत नाही.

पण कधी कधी हे नातं नाही फुलत. मग घटस्फोटा सारखा अप्रिय निर्णय घ्यावा लागतो. त्याच्या मन थकवणाऱ्या प्रक्रियेतून जावं लागतं आणि एकटे राहायची वेळ येते. कधी अचानक आकस्मात जोडीदार अर्ध्यावर संसार टाकून निघून जातो कायमचा. अशा वेळी तर उरलेली व्यक्ती उध्वस्त होते. पार कोलमडून जाते. एकटेपणाची कल्पना, जोडीदारा शिवाय आयुष्य हे सगळे सहन करण्याच्या पलीकडे असतं . 24 तास सोबत असणारं माणूस आता कधीच दिसणार नसतं.

हा एकटेपणा भयाण, वेड लावणारा असतो. याचा ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना त्याची तीव्रता कळेल. यातून बाहेर पडायला आई-वडील, मुलं, नातेवाईक जरी मदत करत असले तरी जोडीदाराच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी, एकटेपणा कोणीच कधीच भरून काढू शकत नाही.

एकटेपणा म्हणजे केवळ शरीराने एकटे राहणे नव्हे. तर तुमचे मन समजून घेईल, तुम्ही आहांत तसे तुम्हांला स्वीकारेल, तुमच्यावर मनापासून प्रेम करेल , तुमची सुखदुःख ऐकेल असं हक्काचं माणूस तुमच्याजवळ नसणं म्हणजे एकटेपणा. शरीर-मनाने केलेली साथ संगत तुमच्या सोबत नसणं म्हणजे एकटेपणा. अशी व्यक्ती कितीही माणसांच्या गोतावळ्यात राहत असली तरी ती एकटीच असते. आणि कुठल्याही क्षणी नैराश्यग्रस्त होऊ शकते.

अशावेळी बरेचदा पुनर्विवाहाचा निर्णय घेतला जातो. ही सर्वस्वी तडजोड असते. त्या  व्यक्तीच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने स्वतःच्या इच्छा, गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कायमस्वरूपी सोबत मिळण्यासाठी लग्नाचा मार्ग निवडला जातो. पुन्हा हे नवीन नातं निकोप होईल अशी शाश्वती नसते.

एकटेपणा आणि एकांत या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परिस्थितीने, प्रसंगाने आलेलं एकटेपण वेगळं. ते तुमच्यावर लादलेलं असतं. आणि एकांत हा तुमची स्वतःची इच्छा असते. तुमची आवड असते. एकांतात तुम्हाला आनंद मिळतो.

आज जीवन अतिशय गुंतागुंतीचं, क्लिष्ट झालंय. प्रत्येकाला साथ संगत चांगली मिळेलच असा विश्वास वाटत नाही. मग आज तरुण पिढीत कितीतरी जण स्वेच्छेने लग्न न करता एकटे राहणे पसंत करतात. लग्न , मुलं, येणाऱ्या जबाबदाऱ्या हे त्यांना नको असतं. कित्येक स्त्रिया, पुरुष जोडीदाराचे अकस्मात निधन झाल्यावर पुनर्विवाह न करता स्वतःचा एकटेपणा स्वीकारून आनंदाने जीवन व्यतीत करतात. कधीकधी वाईट अनुभव आलेले असतात मग लग्न संस्थेवरचा विश्वास उडतो.

तर काही वेळा जोडीदाराबरोबर ची जी वर्ष संसार केला असेल ती इतकी सौख्याची, आनंदाची असतात की मन समाधानी असतं. आपल्या जोडीदाराच्या जागी नवीन व्यक्तीची कल्पनाही करवत नाही, म्हणून एकटे राहणे पसंत करतात. आज-काल प्रत्येकच आई-वडील हे बहुतेक आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे मुलांबाबतची कर्तव्यं पार पाडली की ते आनंदाने हे एकटं आयुष्य स्वीकारतात. मुलांवर अवलंबून न राहता अगदी एकटे स्वतःच्या घरात राहतात. नाहीतर अगदी सगळ्या सुखसोयींनी सुसज्ज अशा वृद्धाश्रमात राहणे पसंत करतात. नवीन छंद, नवीन मित्र मैत्रिणी, सहली यात रममाण होतात. आनंदाने सकारात्मकतेने जगतात.

तरुणपणी काय कसेही निभावून नेता येईल, पण म्हातारपणी खरी सोबतीची गरज असते हे जरी खरं असलं तरीही, एकटं राहणं हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. जसं कोणी कोणत्या वयात लग्न करावं, पुनर्विवाह करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे त्याचप्रमाणे. एकांत ही एकटेपणाची थोडी उच्च अवस्था आहे. जे खरंच मनाने स्थिर, सामर्थ्यवान असतात, ज्यांची अध्यात्मिक बैठक उत्तम असते, मनाची ऊर्जा अप्रतिम असते असे काही मोजके लोक एकांतवासात राहणे पसंत करतात. माणसांचा कोलाहल त्यांना रुचत नाही.

शेवटी एकटेपणा ही मनाची अवस्था आहे. आज कितीतरी नवरा बायको केवळ मुलांकडे पाहून संसार रेटत आहेत. ते आपापल्या पातळीवर एकेकटेच आहेत. त्यांच्यात नात्यांचे कोणतेही बंध नसतात. अशावेळी एक तणावग्रस्त आयुष्य ते जगत असतात. आपल्या माणसांत राहून एकटं पडणं यासारखं दुःख, यातना नाही. स्वतःच्या मनाने शारीरिक , आर्थिक, मानसिक सक्षम असणारे कितीतरी जण आज एकटेपणा आनंदाने स्वीकारत आहेत.

नवीन कोणताही सुखद वा दुःखद अनुभव घ्यायची त्यांची आता इच्छा नसते. “गुंतणं नको वाटतं” अशांसाठी हा एकटेपणा योग्यच आहे. एकटे राहण्याचा निर्णय हा संपूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी हा निर्णय घेऊन तो निभावणार्या व्यक्तीवर आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे. आयुष्यात “आनंदी मन” ही सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. मग ती तुम्ही एकटे राहून मिळवता की सोबतीने.. हा निर्णय फक्त तुमचाच असला पाहिजे. हो ना..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““आयुष्यात एकटे राहण्याचा निर्णय योग्य असेल काय??””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!