आयुष्यात अनेक क्षण निसटून जाणारच आहेत, आपण प्रत्येकाला पकडू शकत नाही.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
कधी हसवती ,कधी रडवती
कधी भुलवती, कधी खुलवती
क्षण हळवे आठवांचे मोती
क्षण हळवे क्षणांचेच सोबती….!!
क्षणभर…. क्षणभर असं वाटलं झोकून द्यावं स्वतःला त्या सुर्याच्या अधीन.काय तो त्याचा सुखावणारा नजारा…कोवळ्या किरणांचा मोहक मारा…! त्याला स्पर्श करण्याची तीव्र इच्छा होती. पण स्पर्श करणं काही शक्य नाही. म्हणून मग वाटलं जरा त्याच्या या सुंदर रंगांमध्ये जरा रंगून जाऊयात. पण कसलं काय….? तो त्याचा रंगीन नजारा क्षणात इकडचा तिकडे झाला.क्षणात ते चित्र बदलून गेलं. डोळ्यातून निसटून गेला तो क्षण.पण काय करणार, काही क्षणांना पकडून ठेवणं शक्य नाही नं….!
आयुष्याचही असचं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण असा पकडून ठेवू शकत नाही. एकतर आयुष्यात क्षण अन् क्षण मौल्यवान समजला जातो. कोणत्या क्षणी काय होऊ शकतं हे आपण नाही सांगू शकत. जन्म-मृत्यू मध्ये असणारं अंतर कधी कधी क्षणांचही असू शकतं.जन्माला आल्यानंतर लगेचच बाळ मृत पावतं…म्हणजे पहा हा सारा क्षणांचा खेळ आहे. एका क्षणात काहीही होऊ शकतं.आपण त्याचा अचूक अंदाज लावणं जरा कठीणच..!
फुलपाखरू…. त्याला आपण पकडायचा खूप प्रयत्न करतो.पण ते क्षणात निसटून जातं.नाही त्याला पकडून ठेवणं शक्यच नाही. एकतर ते इतकं नाजूक असतं की पकडून ठेवलं तर तुटण्याची शक्यता असते.
आपण क्षणांना केवळ कैद करू शकतो. पण त्याच क्षणांना कायमच पकडून ठेवू शकत नाही.मान्य आहे की आयुष्यातील कित्येक क्षण हे कायम हवेहवेसे वाटतात. ते निसटून जावे असं आपल्याला वाटत नाही. किंवा एखादा क्षण असा येतो की तो जगायची खूप इच्छा असते पण काही कारणांअभावी तो जगता येत नाही. तो क्षण नकळतपणे निसटून जातो.
पण काय करणार त्या क्षणांना आपण थांबूनही ठेवू शकत नाही. घड्याळातील काटा क्षणाक्षणाला पुढे सरकत राहतो . तो आपल्यासाठी थांबत नाही. म्हणजे वेळ , कोणताही क्षण हा आपल्यासाठी थांबू शकत नाही.
मग आपण तरी त्याला थांबवायचा प्रयत्न कसा करायचा…? आणि मुळातच त्या क्षणांना थांबवायचा प्रयत्नही करू नये. कारण त्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात आपल्या हातून पुढचे क्षणही निसटून जातात. आणि मग काय होतं तर…हातातला क्षणही निसटतो आणि पुढचा क्षणही निसटून जातो.
सुर्योदय होणार आहे, सुर्यास्त होणार आहे…म्हणजे काय तर क्षण येतात , जातात.क्षणांच हे चक्र चालूच असतं.बालपणीच्या, शाळा-कॉलेजच्या आठवणीतील ते सोनेरी क्षण निसटून गेलेच आहेत.त्यांना आपण पकडून एका कपाटात ठेवू शकत नाही.आपण फक्त त्यांना स्मृतीत ठेऊ शकतो.ते क्षण केवळ आठवू शकतो.
एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. आपण हळवे असतो. आपल्याला तेच क्षण पुन्हा जगायला मिळणार नाही हे पटतच नाही. किंवा समजूनही आपल्याला उमजत नाही.
तोच हात पुन्हा हाती घ्यावासा वाटतो , त्याच जुन्या वळणावर पुन्हा जुने क्षण घालवावेसे वाटतात , तीच कट्ट्यावरची धमाल , वाळूतली कलाकारी पुन्हा हवीहवीशी वाटते. पण नाही ओ…..तोच अनुभव , तेच क्षण असे एखाद्या जीन्स-टॉप सारखे कपाटात ठेवता येत नाही.त्यांना हाताने स्पर्श करून मुठीत पकडताही येत नाहीत. ते क्षण त्याच क्षणी निसटून जातात.आपला हात सोडून जातात. प्रत्यक्ष सहवास त्यांचा क्षणभरच असतो.बाकी सहवास केवळ स्मृतींमध्ये दडलेला असतो.
म्हणून क्षण क्षणांचा सोबती असतो….बाकी असतो तो आठवांचा मोती…!
गेलेला कोणताही क्षण हा प्रत्यक्ष सहवासाने परत अनुभवता येत नाही. त्यामुळे जो क्षण समोर असेल तो हसतहसत जगून घ्या.हरवलेले क्षण शोधत बसण्यापेक्षा समोर येणाऱ्या क्षणांना आपलसं करायला शिका.कारण हरवलेले कवडसे गवसतातच असं नाही.त्यामुळे समोर येणाऱ्या क्षणाला स्वतःहून सोडून द्यायच की भरभरून आनंद घेत जगायचं हे आपलं आपण ठरवायचं.
मित्रांनो ,
आयुष्य सुंदर आहे…
ते सुंदर-हळव्या क्षणांनी सजवायच असतं…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


