आयुष्यातला गुंता हा हळूहळू सोडवायला हवा!
मिनल वरपे
शिकत असताना असं कधी झालंय का की एखाद गणित आपल्याला सोडायला दिले आहे आणि कोणताच विचार न करता म्हणजेच कोणत्या पद्धतीने सोडवाव, किती स्टेप्स मधे सोडवता येईल हे गणित अशी कोणतीच तयारी न करता आपण दिलेलं गणित अगदीच चटकन सोडवलं.
नाहीना.. कोणी कितीही हुशार असो पण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तातडीने देण्याआधी त्याचा क्षणभर तर विचार करतोच.हे तर अगदी साधं आणि सहज समजेल असं उदाहरण आहे.
आता आपण आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळूयात.आपलं रोजच्या आयुष्यात कस वागणं असते…?? काहीही घडो मी सदैव तयार आहे अस व्यक्तिमत्त्व कोणाचं असते..?? येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची..?? समोर अचानक उभ्या राहणाऱ्या अडचणींना तोंड कस देता येईल..??
वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का आपल्याकडे.. असतील तर चांगलच आहे. पण जर सापडत नसतील तर शोधण्याचा प्रयत्न करूयात..
मी एक चांगला जॉब करतेय, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी मी एक विमा योजना घेतली आहे.. याचा अर्थ असा होतो की आपण कोणत्याही क्षणी कोणतीही अडचण आली म्हणजेच कोणी आजारी पडलं, दुर्दैवाने अचानक कोणाचा अपघात झाला तर अशावेळी पैशांची गरज पडेल आणि ती वेळेवर पूर्ण करता येईल की नाही म्हणून मी हा विमा काढला आहे.
आता यामधे आपल्याला हे तर कळलच की आपण आपल्याला आरोग्याविषयी येणाऱ्या समस्यांबाबत काहीतरी सोय करता येते. अर्थात ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असते. पण आपण आपल्याला अचानक येणाऱ्या वेळेची सोय करतो.
मग जर आपण अशीच एक सोय आपल्या सगळ्याच बाबतीत केली तर… कारण अचानक येणाऱ्या अडचणी, जबाबदाऱ्या यांची त्यावेळी का असेना पण आपल्याला भिती ही वाटतेच. आणि मग आपण त्यावेळी आपण गोंधळून जातो. काय करावं ..काय वागावं आपल्याला काहीच सुचत नाही…
म्हणून त्यावेळी एकच गोष्ट आपल्या लक्षात असू द्या.. की आयुष्यातला गुंता हा हळू हळू सोडवायचा असतो. ज्याप्रमाणे आपण गणित एका विशिष्ट पद्धतीने सोडवतो.. ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो एक तरतूद करून ठेवतो.. अगदी याच पद्धतीने कुठेही न घाबरता आपल्या आयुष्यात येणाऱ्या.. पुढे येण्याची शक्यता असणाऱ्या अडचणींना आपण कस सामोरे जाऊ शकतो याची आपण तयारी ठेवायची..
एखादी समस्या अचानक आपल्यासमोर येऊन उभी राहते आणि आपण तिथे इतके भरकटून जातो की आपल्याला तिथे कस वागावं कळत नाही.. आपण त्या क्षणी कधी रडतो तर कधी रागावतो, कधी परिस्थितीला संकटाला घाबरून माघार घेतो, कधी कोणावर राग व्यक्त करतो तर कधी स्वतःवरच अविश्वास दाखवून चुकीचे मार्ग निवडतो आणि आत्महत्येचा जीवघेणा निर्णय घेतो.
अडचणी, समस्या, प्रश्न हे प्रत्येकालाच असतात. शिक्षण, नोकरी, नाती, कौटुंबिक वाद, मतभेद, आजूबाजूचे काही प्रश्न,आर्थिक, सामाजिक, आरोग्याविषयी अशा एक ना अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येणार आणि त्यावेळी अजिबात गोंधळून न जाता.. शांत डोक्याने विचार करून त्या अडचणींना सामोरं जायचं. प्रत्येक प्रश्नाची उत्तर मिळवता येतील फक्त घाई न करता हळू हळू ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

