आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नात्यांची गरज असते …
हेमा यादव कदम I ७८७५५५०७८९
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नात्यांची गरज असते … अगदी लहानपणी आई हवी असते , घराबाहेर पडताना बाबाची गरज असते , घराबाहेर पडल्यावर मित्र – मैत्रिणींची गरज पडते , मग तरुण वयात आल्यावर कोणीतरी हक्काच्या जोडीदाराची गरज पडते , त्यानंतर आपण आपल्या आई बाबांच्या भूमिकेत जातो तेव्हा आपण सर्वात जास्त जबाबदार असतो त्या भूमिकेतून बाहेर पडताना मात्र काही नाती मागे सुटलेली असतात काही सोबत तर काही कायमची हरवलेली असतात….
आपले वय आणि गरजा या नुसार नात्यांचे महत्व कमी जास्त होत असते. त्यामुळे भावनेच्या या खेळात आपण तटस्थचि भूमिका घेणे खूप आवश्यक असते. आपल्या सोबत किंवा एखादया कोणत्याही नात्याने बांधलेली व्यक्ती हि आपल्या मालकी हक्काची निर्जीव वस्तू नाहीये कि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण नाते जोडले आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते नाते तोडून टाकले जशी गरज आपल्याला असते तशी समोरच्या व्यक्तीला हि असते.
मान्य आहे कि, काळ आणि वेळे नुसार नात्याच्या परिभाषा बदलत जातात, गरजा बदलत जातात. पण म्हणून आपण नाती तोडत जाणे कितपत योग्य आहे हे आपण ठरवायला पाहिजे , कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे … आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना देत असते आणि त्या देण्यातून आपण तीळ तीळ घडत जात असतो .
असे म्हणतात कि मानवप्राण्याला देवाने विसरण्याची देणगी दिली आहे. असे असले तरी त्याबरोबर देवाने या प्राण्याला बुद्धी हि दिली आहे. त्यामुळे काय विसरायचं आणि काय लक्षात ठेवायचं हे हि कळायला पाहिजे. दोन व्यक्ती एकत्र आले तर वैचारिक भेद हे असणारच पण याचा अर्थ असा अजिबात नाही कि, आपण निवडलेली किंवा आपल्याला रक्ताच्या नात्याने मिळालेली कोणतीही व्यक्ती इतकी वाईट नसते कि , आपण नाते तोडून टाकावे…

आपल्या छोट्याश्या आयुष्यात कोणत्याही नात्याच रूप घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र विचारधारा असते त्यामुळे नाती टिकवायची असतील तर सर्वात आधी प्रत्येकाच्या विचारधारेचा आदर करायला शिका, प्रत्येक व्यक्तिमत्व समजून घ्या , जवळची कोणती व्यक्ती चुकताना दिसत असेल तर त्या व्यक्तीला समोर बसवून समजावून सांगा कि , त्याच्या / तिच्या वागण्यामुळे त्याचे / तिचे काय नुकसान होईल किंवा काय फायदा होईल..
हक्काने सल्ला जरूर द्या पण सल्ला दिल्यानंतर आपलेच म्हणणे खरे करण्याचा हट्ट करू नका .. नाती तेव्हाच टिकतात जेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेतो …
जर आपण स्वतःची तत्वे जपताना कळत न कळत दुसऱ्यांच्या तत्वांना किंवा विचारधारेला मोडण्याचा प्रयत्न केला तर मने दुखायला आणि नाती तुटायला अजिबात वेळ लागत नाही. जसे आपले अस्तित्व महत्वाचे आहे तसेच दुसऱ्याचे हि असते नाती तोडणे खूप सोपे असते. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या या देशात कोणी आपल्या आयुष्यात येण्याने / जाण्याने आपले आयुष्य अजिबात थांबत नाही.
हे जरी खरे असले तरी एका व्यक्तीची उणीव दुसरी व्यक्ती कधीच भरून काढू शकत नाही हे देखील लक्षात घ्या. आणि जर आपण कोणाला समजून न घेता आपल्या हेकेखोर पणामुळे जर नाती तोडत राहिलो तर अशी वेळ येईल कि , आयुष्याच्या शेवटी आपण एकटे पडू .. आयुष्य आपल्या लोकांच्या सहवासात जगण्यात जी मजा आहे ती मजा अनुभवायला शिका .. प्रत्येक व्यक्तीला आहे तसे स्वीकारायला शिका … नात्यांच्या यशस्वी गोष्टी बनवायला शिका , वर्षानुवर्षे नाती जपायला शिका .. तुमच्या या निर्णयामुळे तुम्हाला आयुष्यात कधी हि काही हि कमी पडणार नाही ..
धन्यवाद
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



awesome article👍👍👍
Very nice article👌👌👌