Skip to content

आपापल्या वेदनेतून मजबूत व्हा, त्याच्या काही ट्रिक्स वाचा या लेखात…

आपापल्या वेदनेतून मजबूत व्हा, त्याच्या काही ट्रिक्स वाचा या लेखात…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकही वेदनादायी प्रसंग घडला नाही, मी पूर्णपणे आनंदी जीवन जगलो. अगदी जन्मापासून ते आत्तापर्यंत मी दुःखाशिवाय राहिलेलो आहे असं सांगणारा कोणीही व्यक्ती आतापर्यंत आपल्याला कधी भेटला आहे का? इथे थोडी गल्लत होऊ शकते. मी सुखी समाधानी जीवन जगलो हे वेगळ, पण माझ्या आयुष्यात दुःख म्हणून कधी आलच नाही असं म्हणणारं आपल्याला कोणी भेटणार नाही. कारण हे शक्यच नाही.

आयुष्यात जसा आनंद आहे, सुख आहे तसं दुःखदायक घटना, वेदना या असणारच आहेत. मग ती दुःख कोणत्याही प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक कोणतीही. त्याची गणती न केलेली बरी.

पण “समस्या असणे हे काही समस्या नसते तर त्यावर उपाय न काढता येणे ही खरी समस्या असते.” आपल्याला होणाऱ्या वेदना ही एक प्रकारची समस्याच आहे. ज्यातून आपल्याला बाहेर पडण्याची गरज असते. जे अनेकांना जमत नाही. कारण या वेदनेचा इतका त्रास होतो की त्यातून व्यक्ती अजून क्षीण होत जाते. माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

पण हे सर्वांच्या बाबतीत होतं का? नाही होत. कारण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्रासाशिवाय, वेदनेशिवाय आयुष्य मिळाल असत त्याची आपल्याला किंमत समजली असती का? माणूस जगण्याची धडपड मोकळा श्वास घेताना करत नाही तर तोच श्वास गुदमरतो, कोंडला जातो तेव्हा करतो. तेव्हा तो स्वतःची खरी ताकद पणाला लावत असतो.

म्हणूनच दुःख ही होणार आहेत, त्रास होणार कारण आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. पण त्या वेदनेतून सावरण, स्वतःला मजबूत करणे आपल्या हातात आहे. कारण असं झालं नसतं तर दीर्घकाळ राहिलेल्या आजारातून माणसं बरीच झाली नसती. तर या वेदनेतून मजबूत कसं व्हायचं ते पाहू.

१. त्रास होणारी घटना घडली आहे, त्यातून व्हायचा तेवढा त्रास होणार हे मान्य करा: बऱ्याच वेळा आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्याचा माणसाला धक्का लागतो आणि ती व्यक्ती ते मान्य करायला तयार नसते. त्या घटनेचा होणारा त्रास मान्य करायला तयार नसते. जवळची व्यक्ती सोडून गेल्यावर, नात तुटल्यावर अस होताना दिसत.

एकतर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही हेच व्यक्ती मान्य करत नाही, केलं तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो हे मान्य करत नाही. मला त्रास झालाच नाही पाहिजे, माझ आयुष्य पूर्वीसारखं व्हायला पाहिजे असा आग्रह केला जातो. परंतु कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायचा तेवढा होणार. तो असा नाकारून आपण स्वतःला denial mode मध्ये टाकतो. त्यामुळे त्यातून लगेच सावरता येत नाही. म्हणून जितका त्रास व्हायचा आहे तो होणार हे मान्य करून त्यापुढे आपण त्यातून कसे बाहेर पडू याचा विचार करा.

२. होणाऱ्या त्रासातून शिकवण घेणे: सकारात्मक मानसशास्त्रामध्ये positive effect of trauma and negative effect of trauma अशी संकल्पना आहे. म्हणजेच काय तर गोष्ट चांगली असली किंवा वाईट परिणाम दोन्ही पद्धतीने होतात. म्हणजे जरी दुःखदायक घटना घडली, त्रास झाला तर काही लोक त्यात अडकून राहतात. बाहेर पडत नाहीत हा त्याचा, त्या गोष्टीचा negative effect. तर काही जण त्यातून काहीतरी शिकत जातात, धडा घेतात व अजून मजबूत होतात हा positive effect.

इथे आपल्या हे लक्षात येईल की प्रसंग घटनांमुळे एखादा त्रास होत नसून आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो हा दृष्टिकोन कसा आहे यावर परिणाम ठरतो. कोणतीही घटना आपल्याला काही ना काही शिकवत असते. जेव्हा आपल्याला त्रास होईल, तो कोणत्या कारणामुळे झाला, त्यावेळी काय कमी पडलं यापुढे मी ती गोष्ट कशी सुधारू शकतो असा जर आपण विचार केला, असा दृष्टिकोन ठेवला तर आपण नक्की मजबूत होऊ शकतो.

३. हेही दिवस जातील: कोणतीही गोष्ट कधी कायमस्वरूपी टिकत नाही. जसा आनंद येतो तसेच दुःख येत. तसंच त्रास होतो तसं बरं पण वाटतं. म्हणून जरी आता आपल्याला त्रास होत असेल तरी स्वतःला हेच सांगा की हे कायमस्वरूपी राहणार नाही. मी यातून नक्की बाहेर पडू शकतो. फक्त मी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जोपर्यंत आपण स्वतःहून प्रयत्न करत नाही नाही,बाहेरून कितीही मदत मिळाली तरी त्याचा तितका परिणाम होणार नाही.

४. सर्वात जास्त वाईट काय होऊ शकत? : बरेचदा आपण आपल्या होणाऱ्या त्रासाला मनातल्या मनात इतकं मोठं करून ठेवतो तो बरा होऊ शकतो हेच आपल्याला माहित नसत किंवा मान्य होत नसत. इथे आपण स्वतःला आधीच weak करून टाकतो. म्हणून जेव्हा कधी आपल्याला कोणतीही वेदना होईल तेव्हा स्वतःला प्रश्न नक्की विचारा. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त वाईट काय होऊ शकत? व काय असू शकत?
कितीही वाईट गोष्ट असली तरी मरणा इतकी वाईट असणारे का? नसणार. कारण श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपण काहीही करून वेदना कमी करू शकतो, त्यासाठी प्रयत्न करू शकतो. आपण जर हे स्वतःला पटवून दिलं तर त्या त्या वेदनेवर उपाय करून नक्की मजबूत होऊ शकतो.

दर वेळी वेदना आपल्याला त्रास द्यायला क्षीण करायला असतात असं नाही. आयुष्यातले चांगले प्रसंग जी शिकवण देत नाहीत ते या वेदना देतात. आपण का जगायचं हे यातून समजत आणि म्हणून आपण मजबूत होत जातो. आपलं आयुष्यावरच प्रेम अजून वाढत. कारण अस जर नसतं तर सिंधुताई सपकाळ आज इतक्या जणांच्या माई झाल्या नसत्या. त्यांना त्यांच्या दुःखाने अजून मजबूत केले आणि दुसऱ्यांसाठी जगायला प्रेरणा दिली. म्हणून चांगलं, वाईट हे सर्व होत राहणार आहे. त्यात अडकून राहण आपण काम नाही तर त्यातून काही ना काही शिकण हे आपलं काम आहे. तर आयुष्याची गोडी वाढेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

5 thoughts on “आपापल्या वेदनेतून मजबूत व्हा, त्याच्या काही ट्रिक्स वाचा या लेखात…”

  1. वैयक्तीक,सामाजिक, मनोवैज्ञानिक,प्रबोधन, करण्यासाठी
    अप्रतिम.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!