“आपल्या सगळ्यांना एका भावनिक स्पेस ची गरज असते.”
मधुश्री देशपांडे गानू
माणूस म्हटलं की शरीराबरोबर मन आलंच. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे म्हणतात की “शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” शरीराचा परिणाम मनावर आणि मनाचा परिणाम शरीरावर होतो. एखादा छान सुंदर नवीन ड्रेस घालून आपण आपलं शरीर सजवलं की आपसूकच मन प्रफुल्लित होतं. आणि मन आनंदी, समाधानी असेल तर शरीर आरोग्यपूर्ण राहतं. मानवी मन हे अगणित भावनांनी भरलेलं आहे. अगदी मूलभूत भावना जशा प्रेम, राग, आनंद, दुःख, अपमान, विरह अशा असतात. अर्थात त्यांनाही अनेक छटा आहेत.
प्रत्येक व्यक्ती ही दुसरी पेक्षा वेगळी असते. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मुळात जन्माला येताना आईवडिलांच्या स्वभावा मधून, जीन्स मधून त्याला अनेक गोष्टी मिळतात. भोवतालची परिस्थिती, होणारे संस्कार, त्याच्या आजूबाजूला असणारी माणसे, त्यांचे स्वभाव, येणारे बरेवाईट अनुभव, त्याचा स्वतःचा दृष्टिकोन, क्षमता, कुवत कितीतरी गोष्टींनी एका व्यक्तीचा स्वभाव बनत जातो. त्याचे स्वतःचे असे भावनिक विश्व तयार होते. त्यात अगणित भावना सामावलेल्या असतात.
अगदी सामान्य उत्स्फूर्त निर्माण होणाऱ्या भावनेपासून ते खोलवर परिणाम झालेल्या भावना.. प्रत्येक घडणाऱ्या प्रसंगानुसार, व्यक्तीनुसार या भावना बदलत जातात, व्यक्त होतात. मुलाला आई बद्दल प्रचंड प्रेम वाटते पण याच मुलाला शिक्षक रागावले तर वाईट वाटते किंवा त्यांचा राग येतो. तुमचे भावनिक विश्व, भावनांची आंदोलने ही योग्य पद्धतीने विकसित व्हायला हवीत.
आपल्या भावना, आपल्याला काय वाटते हे तुम्ही योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोचवायला हवं. योग्य वेळी योग्य भावना व्यक्त व्हायला हव्यात. नाहीतर घुसमट होते. कोंडमारा होतो. कधीतरी या साचून राहिलेल्या भावना अत्यंत वाईट पद्धतीने बाहेर येतात. किंवा त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य धोक्यात येते.
काही व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण योग्य पद्धतीने, योग्य शब्दांत, योग्य आवाज राखत आपले विचार, भावना व्यक्त करतात. मग त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत ही योग्य तऱ्हेने पोहोचतात. आणि संवाद सुसंवाद सुरू राहतो. नातेसंबंध कोणतेही असोत ते टिकून राहण्यासाठी हे भावनांचे प्रकटीकरण आणि भावनांची देवाण-घेवाण अत्यंत गरजेची आहे. आता “भावनिक स्पेस” म्हणजे काय? या तर यालाही अनेक कप्पे आहेत. आपल्या सगळ्यांनाच या भावनिक स्पेस ची गरज असते. कशी ते पाहू.
एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही ऑफिसमध्ये कामात गर्क आहात. तेवढ्यात तुम्हाला एक फोन येतो. एका नातलगांचे निधन झाल्याचा. तुम्हांला दुःख होतं. दुःखाची भावना तयार होते. पण आत्ता तुम्हांला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी उपस्थित राहायचं असतं. अशावेळी तुम्ही या भावनांना एक स्पेस देता. थोडा वेळ शांत राहण्यासाठी.
आणि स्वतःला समजावता की नक्कीच ही दुःखद घटना आहे पण आता माझे काम महत्त्वाचे आहे. ते झाल्यावर मी नक्की फोन करेन किंवा ऑफिस सुटल्यावर जाऊन भेटेन. तुमच्या या भावना तुमच्या मनात आता तयार झाल्या आहेत. त्या तुमच्याबरोबर थांबतात. तुमची वाट पाहतात आणि तुमचं काम संपल्यावर तुम्ही या भावनांना योग्य वाट करून देता. ही एक प्रकारची भावनिक स्पेस झाली.
तुमच्या भावनांना त्यांच हक्काचं घर असतं ते म्हणजे तुमचे शरीर. भावनांचा तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. सतत नकारात्मक विचार करणारी व्यक्ती ही नैराश्यग्रस्त होते आणि तिच्या बाबतीत सतत नकारात्मक घटना घडतात किंवा ती सारखी आजारी पडते.
आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. नवरा-बायको यांचं नातं. साधारण या नात्याच्या भावनिक गरजा काय असतात? तर शारीरिक संबंधांची गरज, प्रेम, विश्वास, दयाळूपणा, स्पर्श, प्रेमळ आश्वासक शब्द आणि कृती, मान्यता ,सुरक्षितता ,प्राधान्य अशा अनेक. हे नातं छान टिकवताना भावनांचा ताना-बाना विणावा लागतो.
पण याच नात्याची किंबहुना कोणत्याही नात्याची एक महत्त्वाची गरज असते ती म्हणजे “स्पेस”. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी व्यक्तिगत स्पेस हवी असते. मग ती शारीरिकही असते आणि भावनिकही असते. ही स्पेस जर कोणत्याही नात्यात जपली गेली तर नातं प्रगल्भ होतं. कित्येक गोष्टी आपण नवर्याशी/ बायकोशी शेअर करू शकत नाही पण त्याच गोष्टी आपण मित्र-मैत्रिणींशी मोकळेपणाने शेअर करू शकतो. ही आपली व्यक्त होण्याची गरज आहे. ही पण भावनिक स्पेसच झाली.
प्रत्येक व्यक्तीला भावना योग्य पद्धतीने, योग्य वेळी व्यक्त करता येतातच असे नाही. काही व्यक्ती चटकन मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. “लोक काय म्हणतील?” हा पगडा असतोच. पण आत्मविश्वासाची कमतरता ही असते. त्यामुळे त्या व्यक्त होत नाहीत. सगळं मनात साठवून ठेवतात. ही पण एक प्रकारची त्यांच्या पुरती घुसमट झाली तरीही भावनिक स्पेसच आहे. काहीजण जसे विचार येतील तसे कागदावर उतरवून काढतात. ही त्यांची त्यांच्या पुरती व्यक्तता झाली. त्यांची भावनिक स्पेस कागदावर जपली गेली. काही व्यक्ती अगदीच मनमोकळ्या, स्पष्ट बोलणार्या असतात. त्या योग्य तऱ्हेने त्यांची भावनिक स्पेस जाणतात आणि जपतात.
कधीतरी प्रत्येकाला एकदा तरी असं वाटतं की कोणाशीही बोलू नये. एकांतात एकटं राहावं. फक्त मी माझ्यापुरतं असावं. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं. माझा फक्त माझ्याशी संवाद असावा. ही भावनिक स्पेस प्रत्येकालाच अत्यंत गरजेची आहे. असा वेळ प्रत्येकाने स्वतः साठी काढलाच पाहिजे. आपली भावनिक स्पेस आपणच जपायला हवी. तुम्ही कपाट नित्यनेमाने आवरता ना!
कपड्यांचे नियोजन करता. नको असलेले कपडे देऊन टाकता. विभागणीनुसार कपडे छान लावता. कपाट नीटनेटकं ठेवता. मग हेच भावनांच्या बाबतीत करायचं. भावनांचं सुनियोजन करायचं. ज्या भावना, विचार, चिंता, काळजी याचा काहीच उपयोग नसतो, याने परिस्थिती बदलणार नसते अशा भावना प्रयत्नपूर्वक काढून टाकायच्या. आनंदी घटना, प्रसंग, आठवणी छान जपून ठेवायच्या. म्हणजे नवीन अनुभवांना, भावनांना मनात स्पेस झाली ना तयार!
जसे मी नेहमी सांगते जीवनात एक अशी व्यक्ती नक्की कमवा जिच्या पाशी तुम्ही सगळं अगदी सगळं मनातलं बोलू शकता. जी तुमचं छान ऐकून घेईल. जजमेंटल होणार नाही. तुमच्या बरोबर असेल. अशी एक व्यक्ती जी तुमची भावनिक स्पेस विश्वासाने, प्रेमाने जपेल. आणि दुसरं म्हणजे “ध्यान लावणे”. हे एक प्रकारचं “भावनिक स्पेस जपणं” आहे.
सातत्याने प्रयत्नपूर्वक ध्यान केल्याने फायदा होतोच. तुम्ही तुमच्या भावनांकडे त्रयस्थ म्हणून पाहू शकता. मनात येणार्या नकारात्मक भावनांचा तुमच्या वर होणारा परिणाम कमी होतो किंवा नाहीसा होतो. तुम्ही सकारात्मकतेने आयुष्याला सामोरे जाता. तुमची भावनिक स्पेस अधिक आनंदाने भरण्यासाठी…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूप छान लेख 👍👍👍