Skip to content

आपल्या मागच्या चुका सतत ऐकवणाऱ्या लोकांना कसं हाताळायचं??

आपल्या मागच्या चुका सतत ऐकवणाऱ्या लोकांना कसं हाताळायचं??


सौ. मिनल वरपे


प्रगती केल्यावर जसे कौतुक करणारे आपल्यासोबत असतात अगदी त्याचप्रमाणे ते लोक सुद्धा आपल्या आजूबाजूला असतातच जे आपल्या जुन्या घडलेल्या चुका ऐकवून आपल्याला दुखावतात..

चुकांमधून माणूस शिकतो आणि पुढे जातो.. घडलेली चूक कितीही चुकीची का असेना पण ती पुन्हा पुन्हा न करता त्यातून धडा घेऊन आज मात्र त्या चुका चुकून सुद्धा होणार नाहीत याची काळजी घेत चांगलं वागून यश मिळवताना बऱ्याच जणांना आपण पाहतोच.

कोणी लहानपणी अभ्यास न करत कॉपी करतात पण जेव्हा त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते नंतर ते छान अभ्यास करून उत्तम गुण मिळवतात पण ज्यांना त्यांची प्रगती सहन होत नाही ते सतत हिणवतात की हा कॉपी करूनच पास झाला..

तरुणवयात प्रेम करतात .. तिथे कधी फसवणूक होते तर तारुण्यात आल्यावर मर्यादांच भान विसरल्यामुळे नकोत्या चुका घडतात.. पण नंतर त्या चुकांचा पश्चाताप होऊन काही तरुण/ तरुणी वागण्यात सुधारणा करतात पण तरीसुद्धा त्यांना जुन्या चुका आठवून भिती दाखवली जाते.

संसार म्हंटल की चुका तर होणारच.. कारण लग्न .. कुटुंब.. जबाबदाऱ्या या सगळ्यात काही वेळेस कळत तर कधी नकळत चुका होतातच.. अगदी मुद्दाम सुद्धा चुका झाल्या असतील आणि त्याची जाणीव झाल्यानंतर त्या चुका विसरून, त्यातून शिकून पुन्हा नव्याने संसार करताना बहुतेक लोक मुद्दाम घडलेल्या चुका उकरून भांडण वाढवण्याचे काम करतात.

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कधी नविन असताना तर कधी आपल्याच विचारांमध्ये असल्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि आपल्याला त्याचे परिणाम सुद्धा सहन करावे लागतात. पण नंतर त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन आपण चांगला performance देतो आणि त्याचवेळी आपल्याला आपल्या जुन्या चुका ऐकवून आपल्याला de motivate केलं जाते.

खर तर हे सगळे प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात.. पण कोणी आपल्या चुका ऐकवून आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याचा किती त्रास करून घ्यायचा हे आपल्याच हातात असते.

अशावेळी दुर्लक्ष भव.. हा सोपा मंत्र लक्षात ठेवायचा.. अगदी सहज आपण त्यापासून लांब राहणार कोणताच विचार न करता.

आपल्या चुका आपल्याला माहीत असतात. आपण त्यातून पुढे सुद्धा जातो पण तरीसुद्धा कोणी त्याची आठवण करून देत असेल तर अस समजावं की आपल्याकडून पुन्हा तिच चूक होऊ नये यासाठी लावलेला हा गजर आहे.. आणि ऐकून सोडून द्यायचं.

आपल्याला ऐकवलं की आपण स्वतःला त्रास करून घेतो हे जर समोरच्याला आपण वागण्या बोलण्यातून दाखवले तर ती व्यक्ती मुद्दाम आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल म्हणून ऐकून न ऐकल्यासारख करायचं आणि दुसऱ्याच विषयावर बोलायचं म्हणजे पुढच्यावेळी ती व्यक्ती ऐकवायला येणारच नाही.

आपण आज जे वागतोय त्याच कौतुक होत असेल तर ते सहन न झाल्यामुळे आपल्याला मुद्दाम जुन्या चुका ऐकवून घाबरवल जाते म्हणजे आपण त्यामधे अडकून त्याचाच विचार करू आणि पुन्हा नकळत जास्त चुका आपल्याकडून होतील. म्हणून आपण आज जस वागतोय तसच नेहमी वागण्याचा प्रयत्न करायचा. ती व्यक्ती काहीही बोलली तरी आपलं चांगल वागणं सोडायच नाही म्हणजे तिला कळेल की आता काहीही ऐकवून फायदा नाही.

आपल्या प्रगतीच्या वाटेत असे अडथळे येतील आणि येणारच अशी मनाची तयारी कायम ठेवली तर कोणी कितीही जुन्या चुका ऐकवल्या तरी त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही कारण आपण आपलं लक्ष आपल्या कामाकडे केंद्रित केलेल असेल.

कोणी आपल्या चुका ऐकवल्या तर अजिबात खचून न जाता त्या व्यक्तिपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. कारण जे व्यक्ती आपल्याला दुखावतात, खचवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करतात अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहिलेलं केव्हाही उत्तम.

चुका या प्रत्येकाकडून घडतात.. पण त्या पुन्हा न करता त्यातून शिकून चांगल वागण्याचा प्रयत्न जर आपण करत असू तर कोणीही आपल्याला आपल्या चुका आठवून दिल्या तरी अजिबात न घाबरता सामोरे जा.. कारण आज आपण चुकांमधून शिकत तर आहोतच, पण फोकस देऊन सुद्धा वागत आहोत.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!