‘सु-संवाद’ हवाच…
सौ. माधुरी पळणिटकर
संवाद हा प्रेमाचा उगम असतो. भावना व्यक्त करतो तो संवाद. पण, त्याच शब्दात ‘वाद’ही लपला आहे, हे जाणून संवाद साधत राहणं गरजेचं. अबोला हा वाद टाळत असला, तरी त्यातून नाती नावाला उरतात आणि जवळचा माणूस दूर जातो. खूप प्रश्नांची उत्तरं या संवादाने मिळतात.
भावनांचा सागर मनात जेव्हा उफाळतो तेव्हा हळूवार संवादाचा किनारा आवश्यक असतो. संवाद प्रत्येक गोष्टीत लपला आहे. आपण फक्त तो ओळखायचा. ताल, सूर, लय यांचा कलेशी संवाद असतो. गायन करताना सुरांचा हृदयाशी संवाद असतो. हिरव्या वृक्षांवर पाऊस कोसळतो तेव्हा सरींचा सृष्टीशी संवाद असतो.
पिसारा बहरून नाचणारा मयूर, हिरव्या ऋतूशी संवाद साधतच मोहक दिसतो. पंढरीला वारकरी विठू नामात इतके दंग होतात, की ते सर्व कष्ट, यातना विसरतात.
आपल्या जीवनात अगदी लहान-पणापासून सुरू होते, ती संवादाची भाषा! नुकतेच बोबडे बोल बोलू पाहणार्या तान्हुल्याशी किती बोलावं, तितकं थोडं आणि असा मोह कुणाला झाला नाही तरच नवल! एक घास चिऊचा, एक घास काऊचा असं करत मधूर संवादाचं नातं इथूनच सुरू होतं.
संवाद हा प्रेमाचा उगम असतो असं मला नेहमी वाटतं. भावना व्यक्त करतो तो संवाद. संवाद या शब्दातच त्याच्यानंतर कधीतरी होणारा ‘वाद’ हा शब्दही लपला आहे. याचा प्रत्यय आपल्याला जीवनात येतोच पण, संवादाचे खूप फायदे आहेत.
सुसंवादाने नाती जवळ येतात तर वादाने माणसं भावनिक दु:खात होरपळतात. वाद टाळता येणं ही थोडीशी अशक्य गोष्ट आहे पण सुसंवाद करून जीवनात मधुरता आणणं शक्य आहे. ‘अबोला’ हा वाद टाळतो. पण नाती नावाला उरतात आणि जवळचा माणूस दूर जातो.
त्यामुळे ‘अबोला’ हे समस्येचे निराकरण असूच शकत नाही. मधूर संवादात जग जिंकण्याची ताकद आहे. आस्थेने चौकशी करणारा माणूस हवाहवासा वाटतो आणि प्रत्येक वेळेस त्यामागे त्याचा वाईटच हेतू असतो असे नाही.
सखींनो तुम्ही जे देता तेच परत तुमच्यापर्यंत पोहचत असतं, हे जगन्मान्य असतं. दुखावणारा माणूस स्वत:ची दु:खाची यादी वाढवत असतो तर काही काही लोक दुसर्यांना दु:खं देऊन, त्यांचे अश्रू बघून स्वत: आनंदात कसे काय राहू शकतात? हा एक मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.
माझ्या मते दुसर्यांना दु:ख देणारा माणूस स्वत: आतून प्रचंड दु:खी असतो हे खरे आहे. संवाद कौशल्याचं महत्त्व जीवनात संवाद साधतानाच कळतं. कारण ‘एकटेपणा’ आनंददायी आहे असं म्हणणारं खरंच कुणी नसतं.
जीवनात तुम्ही कसे दिसता हे इतकं महत्त्वाचं नाही. तुम्ही कसे असता, तुम्ही कसे संवाद साधता हे महत्त्वाचं आहे. संवादाच्या जादूने क्षणात परकी माणसं आपली वाटतात आणि ज्यांच्या आयुष्यात संवाद नावालाच असतो ती माणसं आयुष्य जगायचे म्हणून जगत असतात.
फक्त मनुष्य नाही तर सारी सृष्टी, प्राणी-पक्षी सर्व सर्व सर्वच संवाद साधत असतात. लाजाळूच्या पानांना स्पर्श केल्यावर ती पाने लाजतात आणि हिरव्या रोपाला प्रेमाने स्पर्श केल्यावर ती आनंदाने बहरतात. त्यामागे तुमच्या स्पर्शरुपी अबोल मायेचा संवादच तर असतो.
वासराच्या पाठीवर मायेने थोपटलेत तर त्याच्या काळ्याभोर डोळ्यात कारुण्याच्या किती पाणीदार छटा उमटतात हे त्याचे डोळे तुम्हाला सांगतात. संवाद कसा असावा हेही आपल्याच हातात असतं आणि वादाकडे संवाद झुकतोय असं वाटलं तर तो थांबवावा लागतो आणि मग स्वत:च स्वत:शी संवाद करावा लागतो.
आपलं अंतर्मन सुध्दा खूप संवाद साधतं. फक्त गरज असते आपणच आपल्याशी संवाद साधायची. पण, आपला आपल्याशी असणारा संवाद खरा आणि सकारात्मक हवा. आपल्या भावना कधीच दाबून ठेवायच्या नाहीत कारण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. आज हे सिध्द झालंय, की भावना कोंडल्यामुळेच माणसाला अनेक शारीरिक, मानसिक आजारांना सामोरं जावं लागतं.
स्वसंवादाने आत्मज्ञान, आत्मपरीक्षण होते, गुण-दोषांचे ज्ञान होते. तुम्ही साधला आहे कधी तुमच्या मनाशी संवाद ? बघा, खूप प्रश्नांची उत्तरं या संवादाने मिळतात. भावनांचा सागर मनात जेव्हा उफाळतो तेव्हा हळूवार संवादाचा किनारा आवश्यक असतो. संवाद प्रत्येक गोष्टीत लपला आहे.
फक्त तो आपण ओळखायचा. ताल, सूर, लय यांचा कलेशी संवाद असतो. गायन करताना सुरांचा हृदयाशी संवाद असतो. हिरव्या वृक्षांवर पाऊस कोसळतो तेव्हा सरींचा सृष्टीशी संवाद असतो. पिसारा बहरून नाचणारा मयूर, हिरव्या ऋतूशी संवाद साधतच मोहक दिसतो. पंढरीला वारकरी विठूनामात इतके दंग होतात, की ते सर्व कष्ट, यातना विसरतात.
यावर माझ्या मनात विचार येतो, इतकी वर्षं लोटली तरी विठू माऊलीच्या भक्तीच्या प्रेमाचा संवाद अवघी पंढरी व्यापून उरतो. हा महाराष्ट्राचा, मराठी अस्मितेचा, मराठी मायबोलीचा, मराठी माणसाशी केलेला संवादच तर आहे.
मला वाटतं जगात सर्वजण संवादासाठी आतुरलेले आहेत. तुमच्या दोन गोड शब्दांची त्यांना खूप गरज आहे. भलेही तुम्ही त्यांना आर्थिक मदत देऊ शकत नसाल तरी त्यांच्या विश्वात जाऊन त्यांच्याशी केलेला संवाद त्यांना आनंद देऊ शकेल.
खूप खूप माणसं दु:खात होरपळत एकटीच कोपर्यात पडली आहेत. व्याधिग्रस्त पीडित लोक वेदनेशी संवाद साधून जगताहेत. वार्धक्य आलेले माता-पिता मुलं परदेशी स्थायिक झाल्यावर त्यांचे ‘अल्बम’ बघत त्यांच्याशी संवाद साधतात.
अशांशी सुध्दा संवाद साधायला हवा. ही सामाजिक बांधिलकी आपण मानायला हवी. तरुण मुला-मुलींशी संवाद साधून त्यांच्या जगात जायला हवं. नाही तर ‘जनरेशन गॅप’ निर्माण होते. पतीचा प्रेमळ आधार, मायेचा संवाद स्त्रीची भावनिक भूक भागवतो.
हृदयात पवित्रता, भक्तीचा सागर आणि ईश्वराशी एकरुप होण्याची इच्छा असेल तर ईश्वरसुध्दा भक्ताशी संवाद साधतो. संवाद मधूर हवा, योग्य हवा, निष्कपट, नि:स्वार्थी हवा. त्यात कुणाची तरी निंदा किंवा गॉॅसिपिंगचा भाग नसावा. गरिबांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायचा असतो याची नेत्यांना पर्वा नसते.
बजेट सादर होते. महागाईच्या भडक्यात सामान्य होरपळतो पण त्यांची सत्ता अबाधित असते. सासरी जाताना मुलीच्या डोळ्यात अश्रू दाटतात. ती फक्त आईच्या कुशीत रडत असते. तिच्या गालावरचा एक- एक अश्रू आई वडिलांच्या प्रेमाच्या संवादाचे प्रतीकच तर असते.
वडील पुरुष आहेत म्हणून रडू शकत नाहीत पण पाणावलेल्या डोळ्यांचा मुका संवाद फक्त त्यांच्या लाडक्या मुलीला कळतो. हा अबोल मूक संवाद सुध्दा किती बोलतो ? काही अबोल, काही प्रेमाचे, मायेचे गूढ गुज अंतरीचे मनाशी जुळवी मनाला…
हृदयाशी हृदयाला…मागती मधूर संवाद क्षणाला, आयुष्य फुलायला…आनंद वेचायला…हो ना?



खूप छान