आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जगण्याचा उत्साह वृद्धिंगत करत असतो.
गीतांजली जगदाळे
आनंद हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि आनंद हा एक ऊर्जेचा, उत्साहाचा स्रोत आहे. आनंद ही एक मानसिक भावना आहे ज्यामुळे माणसाला समाधान मिळते. आनंदी राहण्याचे अनेक मानसिक आणि शारीरिक आरोग्य विषयक फायदे आहेत.आनंदी राहण्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
त्यामुळे अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद मिळते.कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदी माणूस सहज मात करून पुढे जातो. आणि म्हणूनच आनंदी राहिल्यामुळे मानसिक ताण कमी होतो. आनंदी चेहऱ्याने जगताना एक वेगळाच उत्साह आणि इच्छाशक्ती जगात वावरताना येत असते.
आपण जीवनात जे काही करतो ते एकतर पोट भरण्यासाठी तरी असत नाहीतर दुसरं म्हणजे आनंदी राहण्यासाठी तरी असत. प्रत्येकाला आनंदी, समाधानी जीवन जगायची इच्छा असते. मानवाला अगदी पूर्वीपासूनच सामाजिक प्राणी म्हणून ओळखले जाते म्हणूनच आपल्या बऱ्याच गोष्टींचा समाजावर, भोवतालच्या माणसांवर आणि त्यांचा आपल्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.
आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपला चेहरा आपोआपच खुललेला दिसतो. घरातला एक जण जरी अशा आनंदी, प्रसन्न चेहऱ्याने घरात वावरत असेल तर घरातलं वातावरणच मुळी मोकळं आणि तजेलदार होऊन जात. आनंदी चेहरे बघूनच कसं मन उत्साही होऊन जात. मन उत्साही असलं की आयुष्यात येणारे challenges सुद्धा अतिशय खेळीमेळीच्या भावनेने स्वीकारले जातात, आणि असं केल्यामुळे त्या challenge मुळे येणाऱ्या अडचणीचं सुद्धा फार काही न वाटता आपण आपले संपूर्ण प्रयत्न लावून ते challenge पूर्ण करण्याचा , जिंकण्याचा प्रयत्न करत असतो.
आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, आचरणात आणतो, त्याच गोष्टी पुनःपुन्हा आपल्याकडे आकर्षित होत असतात. जर तुम्ही ‘Law of attraction’ बद्दल कधी ऐकलं असेल, तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल. आपल्या चेहऱ्यावरच्या आनंदाने फक्त आपला उत्साह वाढत असतो असं नाही तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणात देखील याने फरक पडत असतो, आपल्या आजूबाजूच्या माणसांवर देखील याचा चांगलाच परिणाम पाहावयास मिळतो.
आनंदी राहणं हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे! आपण आनंदी असल्यामुळे जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, सतत टेन्शन मध्ये असणाऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो, सकारात्मक असतो. आणि हीच सकारात्मकता आपल्याला बरेच अग्निदिव्य कुशलतेने पार करायला मदत करत असते.
टेन्शन ने आधीच खचलेला माणूस हा नकारात्मक विचारयंत्रणेने संकंटांचा सामना करण्याआधीच कुठेतरी त्याची मानसिक ऊर्जा कमी झालेली असते. आणि अशा पद्धतीने जर तो सामना करत राहिला तर हरायच्या भीतीने तो तीच गोष्ट स्वतःकडे आकर्षित करत राहतो.
सुख,दुःख हे सगळ्यांच्याच वाटेला येत असतात. फक्त त्याची रूपं आणि तीव्रता कमी-अधिक प्रमाणात असते. पण तरी देखील जीवनात अशी देखील माणसं दिसतात जी डोंगराइतकी संकट येऊन सुद्धा खंबीरपणे आणि आनंदी चेहऱ्याने उभी राहिलेली दिसतात. संकटांमुळे गमावलेल्या, सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा त्रास त्यांनाही तितकाच होत असतो जितका तो इतरांना होतो.
पण तरी देखील आपल्याला मिळालेलं हे आयुष्य , आपलं निरोगी शरीर, जवळची प्रेमळ माणसे यासाठी ते मनातून कृतज्ञता मानत आलेले असतात. जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे ते celebrate करणं त्यांना जास्त महत्वाचं वाटत असत. आणि ती कृतज्ञता त्या संकंटांनी केलेल्या प्रहरांपेक्षा त्यांना मोठी वाटत असते. पण काही लोक मात्र थोड्या-थोडक्या संकटांनी सुद्धा खूप खचलेले असतात.
शेवटी या गोष्टी ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात. त्यामुळे जीवनात दृष्टिकोन फार महत्वाचा ठरतो. अशा सतत किंवा जास्तीत-जास्त ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो अशा माणसांच्या सहवासात राहायला प्रत्येकाला आवडते, कारण अशा लोकांच्या सहवासात एक प्रकारचा उत्साह जाणवतो.
ज्या पद्धतीने आनंदी माणसे येणाऱ्या संकटांकडे बघत असतात, ज्या पद्धतीने ती त्यांच्याशी सकारात्मकतेने लढा देतात, आणि ज्या पद्धतीने आनंदी माणसांकडे बघून इतर माणसांना उत्साही आणि आनंदी वाटत, त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा इतरांच्या जीवनात उत्साह वाढवत असतो असे म्हणता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


