ही वेळ सुद्धा निघून जाईल….
मानसी वैद्य
(समुपदेशक)
सतत कानावर पडणारे नकारात्मक संवाद,भरीस भर म्हणून प्रसार माध्यमे,यामुळे जनमानसावर याचा प्रचंड परिणाम होताना आपण पाहतोय.रात्री उशिरा फोन वाजला तरी छातीत धडधड होते. लॉकडाऊन मुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय ठप्प झाले आहेत.हे कमी की काय म्हणून वादळ,भूकंप या गोष्टी आहेतच.हे सगळे होत असताना सुद्धा सकारात्मक राहणे ज्यांना जमते ते या परिस्थितीवर छान मात करू शकतात.
एखादा छंद जोपासणे, प्राणायाम, व्यायाम या सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत पण अमलात आणल्या नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही.काही सहज सोप्या गोष्टी आहेत करण्यासारख्या….करून पहा नक्की फायदा होईल.
नेहमीपेक्षा सकाळी थोडे लवकर उठून, अंथरुणात च बसायचे. डोळे मिटायचे, आणि आपण ज्या कोणत्या देवाला,गुरूला मानतो त्यांना म्हणायचे माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे. माझ्याकडून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, माझ्या रागावर माझे नियंत्रण असणार. माझे कुटुंबीय, माझे आप्त जन यांची प्रकृती खूप छान निरोगी आहे. दहा मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करून डोक्यात येणाऱ्या (निरुपयोगी) विचारांना बाजूला सारून सकारात्मक विचारांची पेरणी करायची.
मोबाईल हातात घ्यायची घाई करायची नाही. जरी घेतला तरी त्यातले कोरोना चे संदेश जे आपले चित्त विचलित करू शकतात ते पहायचे नाहीत , न वाचताच डिलीट करून टाकायचे.
सगळ्यांना सहज करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे संगीत ऐकणे.जे आपल्याला आवडते ते. मूड लगेच छान होतो.मुले घरी असतात त्यांच्याशी संवाद साधायला ही खूप छान वेळ आहे. भविष्यात काही गोष्टी करायच्या आहेत त्याचे नियोजन आतापासून मुलांशी बोलून करू शकता .एखादा विनोदी चित्रपट सगळे मिळून पाहू शकता.
मोबाईल आणि इंटरनेट चा वापर नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी करू शकता.थोडक्यात जी गोष्ट केल्याने स्वतःला आनंद मिळतो त्याचा शोध घ्यायची ही उत्तम संधी आहे असे समजायचे.आणि ती गोष्ट करायची.
कोरोना हा विषय सोडून,मित्र,मैत्रिणींशी,नातेवाईकांशी गप्पा मारा. जोक सांगा,हसा, हसवा.पण तुमच्याकडे किती केसेस आणि आमच्याकडे किती या गप्पा नको.किंवा व्हॉट्स ॲप वर मिळणारे फुकट ज्ञान इतरांना वाटू नका.
एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली असेल तर तिला किती त्रास झाला,आपण काही करू शकलो नाही असा विचार मनात येऊ देऊ नका .त्यांच्याबद्दल च्या चांगल्या गोष्टी आठवा. आपल्या भावना कागदावर उतरवा. लवकरात लवकर त्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करा.
घरातून बाहेर पडताना जी काही काळजी घ्यायची ती तर घ्यावीच लागणार.पण मनात भीती बाळगू नका.आणि आपल्याला काही होणार नाही हा अती आत्मविश्वास पण नको.बातम्या पाहणे शक्यतो टाळा.काहीही कानावर आले तरी पॅनिक होऊ नका.
सकस आहार,योग्य झोप, फुफुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विठ्ठल नामाचा जप,जरुरी व्यायाम ,प्राणायाम या गोष्टीची सांगड घालून दिवसाचे उत्तम नियोजन तुम्ही करू शकता.
असा एक एक दिवस आनंदात गेला की तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की कोरोना नावाचे काही संकट आहे.आणि ते कधी संपेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही.ही वेळ सुद्धा निघून गेलेली असेल.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

