आपल्यासाठी सतत कोणीही धावून येणार नाही हे स्वीकारा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
श्रुती लहानपणापासूनच एका मोठ्या, भरपूर माणसं असलेल्या अशा परिवारात वाढलेली होती. आजूबाजूला माणसांचा नेहमी गराडा असे. तिला कधी कोणत्या गोष्टीची गरज लागली तरी लगेच मिळत असे. कुठे काही लागलं, अगदी साधं खरचटलं तरी घरातलं कोणी लगेच धावून येई. जसं घरात तसंच बाहेर. बाहेरही तिचा मित्रपरिवार होताच. तिला कधीही कसलीही मदत लागली तरी कोण ना कोणतरी असेच.
या सगळ्यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारचं परावलंबित्व आलं. लहानपणापासून सतत इतरांची मदत घेतल्याने तिच्यावर स्वतःहून कोणती गोष्ट करण्याची फारशी कधी वेळ आली नाही. तसंच तिच्या मनातली गोष्ट पक्की बसली की आपल्याला काही लागलं मदत असेल किंवा काय करायचं असेल. दुसरं कोणीतरी आहे जे करून देईल, आपल्या सांगण्यावरून येईल.
पण एकदा अस झालं की तिचे एक असाइनमेंट कॉलेजमध्ये सबमिट करायचे होते आणि त्यासाठी तिला वेळेत जायचं होतं. पण झालं अस त्यावेळी घरात कोणतं वाहन उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे तिने तिच्या एका मैत्रिणीला अगदी निघायच्या काही मिनिटे आधी फोन करून तिला पिकअप करायला सांगितले. तिची मैत्रीण तिला नेहमी मदत करत होती पण आज मात्र तिला काही कारणाने येणं शक्य नव्हतं. श्रुती मात्र तिने आयत्या वेळी बोलवलं तरी मैत्रीण येईल अश्या भरवश्यावर राहिली व तिला फोन केला. मैत्रिणीने श्रुतीला खूप समजावलं पण ती काही केल्या ऐकेना. शेवटी मैत्रिणी ऐकत नाही हे पाहून श्रुतीने फोन कट केला. या सगळ्या गोंधळाचा परिणाम श्रुतीला कॉलेजला जायला वेळ झाला आणि तिला असाइनमेंट पण वेळेत देता आली नाही. श्रुतीला यावेळी मैत्रिणीचा खूप राग आला. पण खरच यात मैत्रिणीची काही चूक होती का? की अजून काही होत?
खरी गोष्ट अशी होती की श्रुती हे मान्य करायला तयार नव्हती की दर वेळी तिच्या मदतीला कोणीही येऊ शकत नाही. समोरच्या व्यक्तीची पण काही बाजू असू शकते हेच तिला पटत नव्हत. जर ती मैत्रिणी वर अवलंबून राहिली नसती तर कदाचित लवकर गेली असती. पण तिचा जो सतत दुसऱ्यांनी यायला पाहिजे हा आग्रह होता त्यामुळे हे सर्व झालं.
पण हा आग्रह योग्य होता का? हे दरवेळी शक्य आहे का? माणूस आहे समाजशील प्राणी आहे आणि समाजात वावरत असताना एकमेकांना मदत करतात एकमेकांच्या अडीअडचणींना धावून जाणं ही चांगली गोष्ट आहे. यातून विश्वास, बांधिलकी निर्माण होते. परंतु यालाही काही मर्यादा आहेत. आपण प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टींमध्ये जर समोरच्या माणसावर अवलंबून राहिलो तर आपण स्वतःसाठी मर्यादा घालत आहोत.
आपण स्वतःच्या क्षमतांचा, शक्तीचा पुरेपूर वापर करत नाही. जे खरतर खूप गरजेचं आहे. कारण आपल्या स्वतःच्या क्षमताच आपल्याला कठीण प्रसंगी मदत करू शकतात. सतत दुसरा कोणीतरी आपल्यासाठी येईल असं जर आपण डोक्यात ठेवलं तर आपल्या नुकसानीच ठरू शकत.
बऱ्याच जणांना इतरांवर अवलंबून राहायची सवय असते. पण ती व्यक्ती एखादे वेळी नाही आली तर मात्र त्यांना राग येतो किंवा त्यांना ती परिस्थिती नीट हाताळता सुद्धा येत नाही. कारण त्यांना हे मान्यच नसतं की सतत कोणी आपल्यासाठी येऊ शकत नाही. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यवरी’ अशी वृत्ती ठेवून ते स्वतः च नुकसान करून घेतात.
अगदी आदिमानवाच्या काळापासून पाहायचं झालं तरी समोर धोका आल्यावर आदिमानव दोन प्रकारचे प्रतिसाद देत होता. ज्याला लढा किंवा पळा असे म्हणतात. जे आपल्या सर्वांमध्ये मुळातच आहे. यापैकी काहीही न करता जर तो दुसऱ्या कोणावर अवलंबून राहिला असता तर त्याच्या जीवावर बेतू शकले असते.
आपल्या सर्वांमध्ये परिस्थिती हाताळायची, समस्या सोडवायची क्षमता कमी अधिक प्रमाणात ही असतेच. परंतु आपल्यासाठी तर कोणीतरी धावून येईल ही मानसिकता ठेवून आपण आपल्या क्षमतांचा विकास करत नाही. आपण परावलंबी होतो. त्यामुळे कठीण प्रसंगी आपल्याला योग्य प्रकारे काम करता येत नाही. म्हणूनच स्वतःच्या क्षमतांचा विकास करायचा असेल, स्वावलंबी व्हायचं असेल तर आधी ही गोष्ट स्वीकारा की सतत आपल्यासाठी कोणी धावून येणार नाही. जर हे मान्य केलं तर आपल्याला दुसऱ्याने मदत केली किंवा नाही केली याने फार फरक पडणार नाही. कारण आपण त्या वेळी ती हाताळायला पुरेसे सक्षम असू.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
