आपल्यासाठी कुणी नसलं तरी आपण सर्वांसाठी आहोत, हे विसरू नका!
सौ. शमिका विवेक पाटील
लग्नाला नकार मिळाला म्हणून एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. जातीवाद, ह्याला जबाबदार कोण ? आजची तरुण पिढी की समाज.
अरेरे ! हे काय वाचायला मिळाले सकाळी सकाळी, हातातला पेपर टेबलावर ठेवत सावंतांनी बायकोकडे चहा मागितला.
अग ऐकलं का , चहात जरा आलं जास्त टाक. डोकं सुन्न झालं बघ. कसली ही आजची पोरं, ना आई बापाची चिंता करत ना समाजाची. नुसतं प्रेम करायचं आणि लग्न म्हणजे झालं. दुसरं येतेच काय ह्या उपट सुंड्याना. तुला सांगतो सुमे, आमच्यावेळी आम्ही डोळे वर करून तर सोडच साधे समोरा समोर उभे राहून पण बोलत नसू.
तुझ्या आईला तर मी डायरेक्ट लग्नाच्या दिवशी बघितली ते पण अंतरपाट खाली केला तेव्हाच नंतर दुसऱ्या दिवशी पूजेला. किती पवित्रता होती आमच्या नात्यात, पण ही आजकालची पोरं लग्नाआधीच नको ते धंदे करतात आणि आई बापाला तोंडघाशी पडतात. सावंतांचा चढलेला परा बघून सुनीता चहाचा कप पुढे करते.
शांत रहा ओ बाबा, कशाला उगीच बीपी high करताय. चहा घेतल्यावर वेळेवर औषधं घ्या आणि आराम करा. काय ग ? ऑफीस मध्ये कसले function आहे का ? एवढी छान नटून थटून चालली आहे. साडी घालण्याचे काय विशेष कारण ? नाही ओ बाबा, असच मन झालं म्हणून, for a change. बस् दुसरं काही कारण नाही.
ये बस जरा इथे, थोडं बोलायचं होतं. काय झालं बाबा ? औषधं आहेत ना सगळी ? त्रास होतोय का काही ? अपॉइंटमेंट काढू का दुपारची ?
अग, किती ग चिंता करशील माझी ? सूमे, तु माझा अभिमान आहेस. तुझ्यासारखी मुलगी देव प्रत्येक आई वडीलांना देवो म्हणजे कसलीच काळजी राहणारं नाही बघ. तुझा जन्म झाला आणि माझं भाग्यच बदललं, मी तुझ्या आईला सांगितलं की सुनिता हाच माझा मुलगा असेल, आपल्याला दुसरं मुलं नको. एकीलाच चांगले शिक्षण पाणी देऊन स्वतःच्या पायावर उभी करू. उद्या मोठी होऊन आपलं नाव काढेल पोरगी.
पण, आता….
पण, आता काय ? बोला बाबा…
आता भिती वाटतें ग, बाहेर समाजात बघते ना, काय होतंय ते, मुलं मुली आई वडिलांना विचारत नाही आणि लग्न करून मोकळे होतात. सूमे, तुझ्याकडून खुप अपेक्षा आहेत. मला वचन दे तू असेल काहीही करणारं नाही.
सूनिताच्या काळजाचा ठोका चुकला, आज ती रजिस्टर मॅरेज करायला जाणारं होती. नजर तिथेच स्तब्ध झाली. आणि थरथरत्या आवाजात तिने वडिलांना मिठी मारली. बाबा, तुमचे मन दुखेल असं मी कधीचं करणारं नाही. मी वचन देते. भरलेल्या डोळ्यांनी तिने अजितला फोन लावला,
हॅलो अजित..
अग आहेस कुठे तू ? कधीपासून आम्ही सगळे कोर्टात वाट बघत आहोत. All ok na ? अजितच्या ह्या बोलण्यावर सुनिता जोर जोरात रडत अजितची माफी मागू लागली. मला माफ कर अजित, मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी, मला बाबांना असं नाराज नाही करता येणारं. माझ्या बाबतीत ते खूपच पझेसिव्ह आहेत. I m sorry.
अग पण माझं ऐकून तरी घेशील का ? काय झालं नक्की ? मी तुला आता काहीच सांगू शकत नाही, मला माफ कर, आपलं लग्न आता होऊ शकत नाही. तिच्या ह्या बोलण्यावर अजितचा विश्वास बसेना. काही दिवस त्याने तिची वाट पाहिली. वाटले ती परत येईल, पण एक दिवस अचानक तिच्या लग्नाची पत्रिका आली. आणि उरली सुरलेली स्वप्न सुद्धा धुळीत मिसळली.
इथे थाटामाटात सुनिताचे लग्न पार पडले. लेकीने आपली लाज राखली म्हणून तिचे वडील सुद्धा भलतेच खुश होते. घरदार चांगले बघून तिच्या वडिलांनी योग्य मुलाशी लग्न लावून दिले. सुनिता आता नवीन संसारात अजितच्या प्रेमाला विसरून गेली. नवे आयुष्य जगायला सुरू केले. सासू सासरे आणि एक नणंद असे छोटेसे कुटुंब, सारे काही आनंदात सुरू होते. वर्ष असेच हसत खेळत गेल्यावर समजले की सुनीताला दिवस गेले आहेत. लवकरच घरात आता पाळणा हलणार होता. घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी होती.
नऊ महिने कसे उलटले समजलेच नाही आणि सुनीताला कन्या रत्नाचा लाभ झाला. घरातील वातावरण थोडे बिघडल्यासारखे तिला जाणवू लागले. छोटीला वर्ष होत नाही की इथे सासरची माणसे दुसरा chance घ्यायला बळजबरी करू लागली. सुनिताला ह्या गोष्टीचे नवल वाटले. नवऱ्याशी ह्या विषयावर काही बोलली तरी त्याचेही तेच म्हणणे असायचे. एकाला एक जोडीला हवे म्हणून पहिले मुल लहान असतानाच दुसरे झालेले बरे, म्हणजे संगोपन नीट करता येते. सुनिता त्यांच्या ह्या गोड बोलण्याला भुलली, दुसऱ्या खेपेला मात्र डॉक्टरकडे फेऱ्या वाढू लागल्या आणि तिसऱ्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. असे सलग दोन वेळा झाले, दोनदा गर्भपात झाल्यावर सुनिता आतून खूपच खचून गेली होती. असे का होतंय हे काहीच समजेना.
काही महिने उलटल्यानंतर एक अनामिक व्यक्तीचा फोन सुनीताला येतो.
हॅलो, सुनिता ? हो, आपण कोण ? मी तुझ्या नवऱ्याची पहिली पत्नी, तू इतकी कशी साधी भोळी आहेस ग. तुझा गर्भपात होतोय सलग दोन वेळा आणि तुला समजत कसे नाही ?
सुनिताला लगेच घाम फुटला… म्हणजे काय बोलता तुम्ही ? मला दोन मुली झाल्या म्हणून तुझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. त्यांना वंशाला दिवा हवा आहे. मी नकार दिला तिसरा चान्स घ्यायला म्हणून सोडून दिले त्याने मला. रोजची कटकट, मारामारी, शिवीगाळ.. खूप काही सहन केले मी. आता तुझ्या बाबतीत सुद्धा हेच होतंय ग, म्हणून तुला सावध करायला फोन केला. Sonography केली समजले तुझ्या गर्भात मुलगी आहे, बेकायदेशीर रित्या त्याने तुझा गर्भपात करून आणला. पण इथून पुढे तू सावध हो. काळजी घे स्वतःची.
क्षणभर सुनीताला स्वप्न बघत असल्याचा भ्रम होतोय का असे वाटू लागले. पण दुसऱ्याच क्षणी कोणीतरी तोंडावर पाणी मारून शुध्द आणावी असे झाले. तिने घाई गडबडीत आपल्या लहान मुलीला कडेवर घेतले आणि माहेरी निघून आली. वडिलांना सारी हकीकत सांगितली. चौकशी करता समजले, झालेली घटना सत्य होती.
मुलीच्या आयुष्याचे वाटोळे लावल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि हृदय विकाराचा झटका आला. त्याच पाठोपाठ त्यांची पत्नी सुद्धा स्वर्गवासी झाली. ज्यांच्या आधारावर सुनीता सासर सोडून आली होती आता तेच तिला निराधार करून गेले होते. ३ वर्षाच्या चिमुरडीला हाताशी धरून तिने सासरच्यांविरुद्ध कोर्टात केस लढवली. कोर्टाचा निकाल सुनीताच्या बाजूने लागला आणि कायद्याने तिला रीतसर सर्व हक्क मिळाले.
एकटीने तिने हा लढा लढला आणि जिंकला सुध्दा. समाजात मात्र ती एकटी पडली, येणारी जाणारी प्रत्येक नजर तिला टोचू लागली. तरीही हिम्मत न हरता तिने निराधार महिलांसाठी संस्था सुरू केली. जिथे ज्या स्त्रियांना कोणाचा आधार नाही अशा महिलांसाठी तिने वडिलोपार्जित जमिनीचा वापर करून पैसा उभारला आणि त्यांना छत्र मिळवून दिले. सुनीता आज इतरांच्या दृष्टीने समाजसेवा करत असेल पण ती इतरांना सांगताना असेच सांगते, जी वेळ माझ्यावर आली ती कोणावरच येऊ नये, आज माझ्यासाठी कोणी नसले तरी माझी संस्था सर्वांसाठी आधार आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


