“आपल्यावर सतत जळणाऱ्या लोकांना हँडल करण्याच्या 10 टिप्स!”
मधुश्री देशपांडे गानू
“Jealousy thy name is woman.”
“स्त्री चेच दुसरे नाव मत्सर आहे.” आणि हे तंतोतंत खरे आहे. पण पुरुष सुद्धा तेवढेच मत्सरी असतात. एखाद्याच्या आर्थिक प्रगतीने, यशाने पुरुषांनाही मत्सर वाटतो. आपण कुठे कसा जन्म घेणार?, आपलं रूप रंग कसं असेल? यावर आपले नियंत्रण नाही. काही स्त्रिया, पुरुष अप्रतिम सौंदर्य घेऊन येतात. यात परमेश्वराची कृपा आणि त्यांचे आई-वडील यांचे यश असतं. तुम्हीं कसे दिसता? गोरे, काळे, सुंदर, कुरूप, जाड, बारीक, बुटके, उंच हे काय तुमचं कर्तृत्व नाही. पण नाही…
एखादी सुंदर स्त्री दिसली की इतर स्त्रिया तिचा मत्सर, द्वेष करणारच. मग तिला एकटं पाडलं जातं. सतत तिच्यात काही न्यून आहे का? हे शोधलं जातं. मुळात सुंदर स्त्रीचा मत्सर तर त्यांनी केलाच पाहिजे आणि हे अगदी नॉर्मल आहे, असं या स्त्रियांना वाटत असतं. मग यांची तिच्या वरून “gossip” करण्यासाठी घट्ट मैत्री होते.
आपल्याकडे गोरा रंग हा सौंदर्याचं प्रतीक मानला जातो. सुंदर, गोऱ्या स्त्रीच्या जवळ उभं राहणं ही इतर स्त्रियांना न्यूनगंड देऊन जातं. तिच्याबरोबर फोटो काढायला ही बिचकतात या स्त्रिया.. किती आजारी आणि विकृत मानसिकता आहे ही आपल्या समाजाची! खरंतर रंग, बांधा हे एखाद्या व्यक्तीबरोबर कायमस्वरूपी नातं जोडण्यासाठी कायमचा निकष ठरत नाही. “माणसाचा स्वभाव, त्याचं संयमी, नीतीमत्तेने वागणं, प्रत्येक व्यक्तीचा आदर राखणं हे खरं सौंदर्य आहे.” पण आपल्या उथळ मानसिकतेच्या समाजाला हे समजतच नाही.
सौंदर्य, घरंदाज श्रीमंती, कुशाग्र बुद्धिमत्ता या गोष्टी तुम्हीं जन्माला येताना घेऊन येता. ज्या व्यक्ती प्रचंड मत्सर, असूया यांनी पछाडलेल्या असतात त्यांना नम्रपणे सांगावेसे वाटते की “जे दुसऱ्याकडे आहे आणि म्हणून तुम्हीं इतका मत्सर करता त्या गोष्टी परमेश्वराने त्याच्या खजिन्यातून त्यांना भरभरून दिलेल्या आहेत. तुमच्याकडून हिसकावून नाही. तर तुम्हांला मत्सर वाटण्याचा काय अधिकार आहे??” आणि तुम्हीं कितीही जळलात तरीही कोणाचंही नशीब तुम्हीं काही केलंत तरी घेऊ शकत नाही.
आज सोशल मीडियावर अनेक फिल्टर वापरून स्त्रिया चढाओढीने आपले फोटो पोस्ट करत असतात. त्या याच न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. आपण जसे आहोत तसेच सुंदर आहोत, आपण परमेश्वराची सुंदर कलाकृती आहोत हे त्यांना मान्यच नसतं. “जे स्वतःलाच स्वीकारू शकत नाहीत ते दुसऱ्याचा मत्सर करणारच.”
मुळात आपण जेव्हा एखाद्या बद्दल असूया, मत्सर बाळगतो तेंव्हा आपण स्वतःलाच हवे तसे स्वीकारत नाही. आपण स्वतःवर खूष, आनंदी नसतो. स्वतःबद्दल कमीपणाची भावना, न्यूनगंडाची भावना असते. आणि म्हणूनच अशा व्यक्ती दुसऱ्यावर जळतात. दुसऱ्याचं चांगलं झालेलं यांना पाहवत नाही.
अशा व्यक्ती स्वतःला त्या आहेत तशा स्वीकारत नाहीतच पण समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य, बुद्धिमत्ता हेही त्या स्वीकारू शकत नाहीत. आणि अतिशय नकारात्मक आजारी मानसिकतेने समोरच्या व्यक्तीला त्रास देऊ पाहतात. “Beauty with Brain” इतकं Rare आहे का?? तुम्हीं यशस्वी झालात तर यांना दुःख होतं. तुमच्या यशाच्या आनंदात अशा व्यक्ती कधीही सहभागी होत नाहीत. त्या तुम्हांला टाळतात.
मी स्वतः लहानपणापासून या असूया आणि मत्सर याचा खूप अनुभव घेतला आहे. तुमच्याकडे जे भरभरून आहे त्याचं निश्चितच कौतुकही खूप होतं. कौतुक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि हे कौतुक सुद्धा तुम्हांला नम्रतेने, योग्य पद्धतीने स्विकारता यायला हवं. याचा अहंकार होता कामा नये. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही अशा असूया, मत्सराचा सामना करावा लागतो. एखाद्या पुरुषाची सुंदर पत्नी, एखाद्या स्त्रीचा हँडसम नवरा, आर्थिक प्रगती, बुद्धिमत्ता याचा काहीही संबंध नसताना हेवा करणारे खूप लोक असतात. आपल्या आजूबाजूला, मित्र मैत्रिणी, अगदी आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीही आपल्याबद्दल प्रचंड मत्सराने ग्रासलेल्या असतात.
आता अशा मानसिकतेच्या जळणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं ते पाहू.
१) दुसऱ्यावर जळणाऱ्या लोकांना स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंड असतो. आत्मविश्वास अजिबात नसतो. त्यांच्या आयुष्यात काही बरं चाललेलं नसतं बहुतेक! पण अशा मैत्रिणी असतील तर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांना मदत करा.
२) कितीही नकारात्मक मानसिकता या लोकांची असली तरीही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि कृती बदलू नका.
३) अशा मत्सरी लोकांचं बोलणं वैयक्तिक पातळीवर घेऊ नका. कारण हा त्यांचा स्वभाव दोष आहे, तुमचा नाही. यात फक्त त्यांची आजारी मानसिकता दिसते. तुम्हीं त्यांच्या खालच्या पातळीवर कधीही उतरू नका.
४) तुमचं काम, तुमच्या यशाच्या पायऱ्या मनापासून प्रामाणिकपणे चढत राहा.
५) सकारात्मक आनंदी व्यक्तींच्या सहवासात राहा.
६) एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. तुम्हीं सगळ्याच बाबतीत या लोकांपेक्षा वरचढ, उजवे आहात. जळणारी लोकं नेहमी तुमच्या मागे असतात.
७) अशा व्यक्तींशी जाणीवपूर्वक संभाषण कमी करा किंवा पूर्णपणे थांबवा. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नका.
८) “अनुल्लेखाने मारणे” असा मस्त वाक्प्रचार आहे मराठीत.. अशा व्यक्तींना आपल्या विचारांमध्ये, कृतीमध्ये थारा देऊ नका. ते अस्तित्वातच नाहीत असं समजा. त्यांचा कुठेही, कोणाकडेही साधा उल्लेखही करू नका.
९) स्वतःच्या मर्यादा आखून घ्या. तुमचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
१०) तुमचं नशीब कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातील दुःखं या जळणाऱ्या व्यक्ती भोगू शकतात का?? नाही ना! मग ते तुमचं सौंदर्य, श्रीमंती, बुद्धिमत्ता काहीही घेऊ शकत नाहीत.
तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्ती सतत स्वतःची तुमच्याशी तुलना करत असतात. त्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं हा तुमचा सन्मान समजा ना! अशा व्यक्तींकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आनंदासाठी प्रयत्नशील राहा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
