आपल्याला नसण्याचे दुःख सहन करता आले पाहिजे.
हर्षदा पिंपळे
आपल्या या आयुष्यात आपल्याला सगळ्या गोष्टी मिळायला हव्या , आपल्याकडे सगळ्या गोष्टी असायला हव्या असं वाटत असतं.परंतु आयुष्यात हे असं अगदी सहजासहजी होणं मुळीच शक्य नाही.प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी असतातच असं नाही. कारण इथे असलेल्या प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता आहे.कुणाकडे गाडी आहे तर कुणाकडे बंगला आहे… कुणाकडे गाडी ,बंगला नसून केवळ एक छोटीशी झोपडी आहे.
इतकच नाही तर ज्याच्याकडे खूप खळाळून पैसा आहे त्याच्याकडे मात्र सुख फार कमी आहे. म्हणजे पहा….कुणाकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता ही आहेच.आणि माणसाला नेहमी दुःख होतं ते त्याच्याकडे नसलेल्या गोष्टीच….आणि त्याला ते दुःख लवकर सहनही करता येत नाही. तो त्या दुःखाचा अनेकदा बाजार मांडतो.”माझ्याकडे हे नाही, ते नाही… आता कसं होणार…?” असा माळेसारखाच निरंतर जप करत बसतो.सतत स्वतःकडे नसलेल्या गोष्टींच्या दुःखाला कवटाळून बसतो.
माणसाला कितीही दिलं तर ते त्याला कमीच वाटतं.कदाचित यामध्ये तो सतत स्वतःची तुलना इतरांकडे असलेल्या गोष्टींशी करत असणार यात शंका नाही.”त्यांच्याकडे चांगल प्रशस्त घर आहे , चारचाकी गाडी आहे…” वगैरे वगैरे….बोलताना आपण कितीतरी वेळा पाहतो.त्याला त्याच्याकडे असलेल्या गोष्टीचा अनेकदा आनंदही घेता येत नाही. कारण नसलेल्या गोष्टींचा विचार करण्यातच त्याचा वेळ जातो.
अगदी मान्य की , माणसाला वाटतं की त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट हवी. किंवा दुसऱ्याकडे आहे तेही माझ्याकडे हवं , माझ्याकडे कोणतीही कमी भासायला नको…पण मित्रांनो खरं सांगायच झालं तर…”असणाऱ्या गोष्टीत सुख शोधता आलं की नसलेल्या गोष्टींच कधीच दुःख होत नाही.” त्यामुळे नसलेल्या गोष्टीच दुःख करण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये सुख शोधायला शिका. हेही मान्य की…आपल्याला सहसा कोणतच दुःख हे सहन होत नाही.
त्यातल्या त्यात नसलेल्या गोष्टींच दुःख तर अजिबात सहन होत नाही. तर इथे असलेल्या प्रत्येकाला एकच सांगण आहे की , नसलेल्या गोष्टींच दुःख करून काहीच होणार नाही… त्याने त्या नसलेल्या गोष्टी सहजासहजी मिळणार नाही.. त्यामुळे असं दुःख करत बसण्यापेक्षा ते दुःख सहन करायला शिका..असलेल्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिका.
काही नसलेल्या गोष्टी कधीच परत मिळत नाही.पण काही गोष्टी नक्कीच मिळू शकतात फक्त त्यासाठी दुःख न करता प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केले तरच काही अंशी गोष्टी आपल्याला मिळू शकतील.केवळ दुःखाला कवटाळल्याने काहीच साध्य होणार नाही.त्यामुळे शक्य होईल तितकं असलेल्या गोष्टी जपायला शिका…नाहीतर नसलेल्या गोष्टींभोवती सतत फिरत बसलात तर असलेल्या गोष्टीही नकळतपणे हातातून निसटून जातील. त्यामुळे आता हे आपलं आपल्यालाच ठरवायच आहे…
नसलेल्या गोष्टीच्या दुःखाला कवटाळत रडत बसायच की असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधायच….? ‘तेल गेलं ,तुपही गेलं हाती राहिलं धुपाटणं….’ आपली अशी अवस्था होता कामा नये.नाहीतर अशी अवस्था झाली तर आपल्या आयुष्यात दुःखाच्या त्सुनामी लाटा येतील…आणि आयुष्य नको त्या वळणावर जाऊन उध्वस्त व्हायला वेळही लागणार नाही.आणि साध सरळ आहे…
आपण आजुबाजूची परिस्थिती सहज पाहू शकतो.कधी कधी आपण त्या परिस्थीतीतून जात असतो तर कधी कधी आपण त्यापेक्षा वाईट किंवा चांगलं आयुष्य जगत असतो.म्हणजे सांगण्याचा उद्देश ईतकाच की जे आहे ते स्वीकारून पुढे जायला आपण शिकलं पाहिजे.कारण आपल्यापेक्षा इतरांकडे किती आणि काय जास्त आहे हे पाहण्यापेक्षा आपण आपल्यापेक्षा इतरांकडे काय नी किती कमी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या नसलेल्या गोष्टींच तुम्ही कदाचित दुःखही करत बसणार नाही.
आपल्याकडे घालायला चांगले कपडे , दोन वेळच अन्न , रहायला छप्पर आहे तरीही आपण रडत बसतो….पण हेच ज्याच्याकडे नसेल त्याच काय…?? आपण समाधानी राहू शकत नाही का…? आपण सगळ्या गोष्टी मिळण्याची वाट पाहू शकत नाही का…? थोडा फार संयम माणसाने बाळगलाच पाहिजे. त्याशिवाय कोणतीही गोष्ट व्यवस्थित पार पडणार नाही.
म्हणूनच आहे त्यात सुख वेचायला शिका..नसल्याच दुःख सहन करायला शिका…नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायाला शिका….आयुष्य कसं सुंदर होईल….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


