Skip to content

आपल्याला काय हवंय याचा कोणीच विचार का करत नाही.

आपल्याला काय हवंय याचा कोणीच विचार का करत नाही.


मिनल वरपे


काहीवेळेस अस काही घडते की त्यावेळी आपल्याला ते सहन करण्यापलीकडे असते. त्यावेळी इतका राग,मनात विचारांचं इतकं वादळ उठते की त्यावेळी काय करावं तेच आपल्याला सुचत नाही.

मन भरून आलेलं असते.. माझं असं काहीच नाही असं त्या क्षणाला वाटते.. पुढे काय करावं.. मी तर कधीच स्वतःचा विचार केला नाही मला काय आवडते, काय नाही आवडत यांना मी कधीच हवं तितकं महत्त्व दिलं नाही.. माझ्या जगण्याचा अर्थच कधी शोधला नाही.. माझ्याच बाबतीत असं का घडते.. माझी काय चूक आहे यात.. हे माझ्याशी असेच का वागतात.. मी इतका सर्वांचा विचार करतो पण मला कधी काय वाटेल याचा कोणीच विचार का करत नाहीत..

इतके सगळे विचार त्या एकाच वेळी मनाची घालमेल करतात. आणि त्या क्षणाला काय वागावं आणि काय बोलावं म्हणजेच काही वागण्याआधी बोलण्याआधी विचार करावा हे आपल्या डोक्यातून निघून गेलेलं असते. आणि आपल्या भावनांचा बांध तुटलेला असतो.. मनातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आपल्याला खूप घाई झालेली असते..

आणि याच घाईत आपण अस काही बोलून जातो ज्याचं आपल्यालाच भान उरलेलं नसत. आपण दुखावले गेलो आहोत म्हणून कोणताही विचार न करता मनाला वाटेल तस आणि तोंडाला येईल ते आपण बोलून मोकळं होतो.

आणि इथेच आपण खूप मोठी चूक करतो. कारण मला जर त्रास होतोय आणि त्याच कारण दुसऱ्याचं वागणं बोलणं असेल.. मला त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं जर मिळत नसतील तर खरचं का रागात संतापात बोलून ती उत्तर मिळणार आहेत..??

आपण जितक्या रागात बोलतो तितकाच त्रास हा आपल्याला होतो. आणि काही प्रश्न असे असतात त्यांची उत्तरं शोधायला गेलो तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा दुरावू शकतो. कारण ज्याचं त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे त्यामुळे कोणाला काय आणि किती सांगायचं आहे हे जो तो ठरवत असतो….

आपण आपलं आयुष्य वैयक्तिक ठेवलं नाही यात आपलीच चूक आहे. कायम इतरांचा विचार केला… याला काय वाटेल..तो काय बोलेल..हे आपलेच विचार आपल्याला पुढे त्रास देतात.म्हणून आपल्याला काय आवडते ते करावं.. आपल्याला काय आवडत नाही त्यापासून लांब राहावं.. जिथे आपण आपल्यालाच महत्त्व देतो तिथे आपल्याला इतरांकडून आपल्यासाठी अपेक्षा राहत नाही.

आणि जिथे अपेक्षाच नसतात तिथे कसली प्रश्न आणि कसले उत्तर.. जर आपण स्वतःच्या इच्छा अपेक्षांना जपलं तर आपल्याला आपली ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष देता येते..नाहीतर आपण भरकटतो..

कोणी कस वागावं आणि काय करावं हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण आपण कस वागावं आणि काय करावं हे आपल्या हातात आहे. आपल्या मनात जेव्हा विचारांचा गोंधळ सुरू होतो.. काही प्रश्न अनुत्तरित राहतात त्यांना सोडून देण्यातच आपलं भलं आहे अस समजायचं..आणि काही प्रश्न असे ज्यांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात त्यावेळी माझी प्रश्न योग्य आहेत का.. मला जे वाटतेय ते चुकीचे तर नाहीना.. यांची उत्तर स्वतःकडून मागायची.. आणि जर योग्य असतील तर नक्कीच उत्तर मिळेल पण त्यासाठी आपण न चिडता, न रागावता शांत राहायचं..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!