Skip to content

आपल्याला आनंदी ,सुखी ठेवण्याची जबाबदारी ही इतरांची मुळीच नसते.

आपल्याला आनंदी ,सुखी ठेवण्याची जबाबदारी ही इतरांची मुळीच नसते.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


स्वतःचा आनंद कशात आहे….? स्वतःचं सुख कशात आहे हे स्वतःलाच शोधता आलं पाहिजे.स्वतःपेक्षा अन्य कोणतीही व्यक्ती आपल्याला आनंदी ,सुखी ठेवण्याची जबाबदारी घेत नाही. किंवा ती मुळी इतरांची जबाबदारी नसतेच.इतर जबाबदाऱ्यांप्रमाणेच स्वतःला सुखी नी आनंदी ठेवणे ही आपली स्वतःचीच जबाबदारी असते.इतकच की ती प्रत्येकाला समजतेच असं नाही.कित्येकांना वाटतं की आपल्याला सुखी नी आनंदी ठेवणे ही प्रामुख्याने इतरांची जबाबदारी आहे.

त्यामुळे ते इतरांकडून सतत तशीच ती अपेक्षा करतात. “त्याला कळायला नको का…माझं सुख कशात आहे…? माझा आनंद कशात आहे…. ?”वगैरे वगैरे बोलताना बऱ्याचजणांना आपण पाहतो.परंतु प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की “आपला आनंद , आपलं सुख ” ही आपली जबाबदारी असते.त्यामुळे इतरांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपला आनंद कशात आहे हे शोधायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.

एक आहे की , आपल्यामुळे कुणी आनंदी ,सुखी होणार असेन तर तसा प्रयत्न नक्की केला पाहिजे. खरं तर कित्येकदा असं होतही की आपल्यामुळे कुणीतरी हसतं , कुणाच्या तरी आनंदाच कारण आपण होतो.पण हा झाला वेगळा भाग.आपण कुणाला सुखी ठेवायच हे आपलं आपण ठरवायच पण इतरांनी कुणाला सुखी ठेवायच नी कुणाला नाही हे मात्र आपण ठरवू शकत नाही.

मुळातच इतरांनी का आपल्याला आनंदी ठेवायच….? त्यांनी का आपल्या आनंदाची जबाबदारी घ्यायची…? आणि आपल्या आनंदाची , सुखाची जबाबदारी जर इतरांवर असती तर आज चित्र काहीस वेगळं असतं.

अजून एक गोष्ट म्हणजे… इतरांनी जर आपल्या सुखाची जबाबदारी घेतली असती तर खरच आपण सुखी झालो असतो का…? किंवा आपण किती वेळ सुखाची वाट पाहत बसलो असतो…? आणि खरच आपण सुखाची ,आनंदाची अशी वाट पाहिली असती का ओ…..? हल्ली कशाच्या बाबतीतही संयम न ठेवणारा माणूस इतका वेळ खरच संयम ठेवू शकतो…..?

संयम ठेवून ठेवून आपला जीव आधीच अर्धा मेलेला असतो..(चातकासारखा संयम आपल्याकडे कदाचित नसावा.)आणि त्यात आयुष्य नाही नाही करून दुःखाने भरलेला डोहच वाटतो.अशा या दुःखाच्या डोहातून सुखाचा पाझर केव्हा फुटेल याची आपण वाट पाहत असतो.पण सुख काही लवकर येत नाही… आणि आलं तरी ते कधी जातं कळतही नाही. मग इतरांना आपण आपल्या सुखासाठी , आनंदासाठी जबाबदार का धरावं….?आपला आनंद ही त्यांची जबाबदारी म्हणून आपण असं गृहीत धरू शकत नाही.

लक्षात ठेवा , आपल्या आनंदाची , सुखाची जबाबदारी ही आपल्या स्वतःची असते.आपल्याला कशात सुख वाटतय हे आपण शोधावं. इतरांकडून कोणत्याही सुखाची नी आनंदाची अपेक्षा न करता , इतरांवर आपल्या आनंदाची जबाबदारी न टाकता आपणच आपल्या आनंदाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली पाहिजे.

आपल्याला वाटत असेल एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू उमलवाव…त्याच्या हसण्याने स्वतःला बरं वाटणार असेल तर जरूर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.आपला आनंद एखाद्या फुलपाखरात असतो , गाण्यात असतो …,आपलं सुख इतरांना हसवण्यात असतं , वाचनात असतं……पण मग ही जबाबदारी आपण इतरांवर टाकली तर…..? तर आपल्याला आपला तो हवा असलेला आनंद मिळेल का…? जे सुख हवय ते मिळेल का…? त्यांनी कितीही आनंद दिला तरी त्या आनंदातून आपण सुखी होणार आहे का..?तर या प्रश्नांची उत्तरं खरंतर मुळीच सांगता येण्यासारखी नाहीत.

पहा , विचार करा नी आपल्याला आनंदी, सुखी ठेवण्याची जबाबदारी ही इतरांची मुळीच नसते हे समजून घ्यायला शिका.स्वतःचा आनंद ,सुख आपली जबाबदारी असते हे स्वीकारून स्वतःच्या आनंदाच्या नव्या वाटा निर्माण करायला सुरुवात करा.

इतरांना आनंद ठेवण्यासाठी प्रयत्न करा पण इतरांनीही तसच केलं पाहिजे असा अट्टहास मात्र धरू नका.

आयुष्य आपलं आहे… त्यामुळे आपला आनंद नी सुख ही आपली जबाबदारी असते…इतरांची नाही.काय मग…स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतःच घेणार नं…?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्याला आनंदी ,सुखी ठेवण्याची जबाबदारी ही इतरांची मुळीच नसते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!