आपल्यातील या सवयी आपल्याला इतरांपासून वेगळे असल्याची अनुभूती देतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
निनाद एक कॉलेजवयीन मुलगा होता. कॉलेजला जाताना तो चालतच जात असे. कधीतरी फारच गरज लागली तर वाहनाचा उपयोग करत असे. तसेच येताना जाताना कोणाला काही मदत लागली, एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता पार करून द्यायचा असेल किंवा मग एखाद्याच पोत उचलून देणं असेल त्याला सांगावं लागत नसे. तो स्वतःहून इतरांना मदत करायचा. बाहेर गेल्यावर हे आपल्या करणे गरजेचे असेल तीच वस्तू विकत घेणे, विनाकारण खर्च न करणे अशा त्याच्या सवयी होत्या.
अगदी कोणता प्रॉब्लेम जरी आला तरी तो लगेच त्यावर react होत नसे. Impulsive होत नसे. त्याच्या या सवयी इतरांच्या नजरेत जरा वेगळ्या आणि कुतूहलाचा विषय होत्या. त्याचे मित्र त्याला म्हणत देखील, अरे तू कोणत्या जगात वावरतो? इतका विचार करून, शांत राहून कोण जगत? आजूबाजूला इतकी एन्जॉयमेंट असताना तो मात्र वेगळ्याच पद्धतीने वागतोस. तुझ्या सवयीचं वेगळ्या आहेत.
परंतु निनादला त्याचं काही वाटत नसे. कारण त्याच्या या सवयी त्याला स्वतःला इतरांपासून वेगळ बनवत होत्या. चार लोक वागतात म्हणून आपण वागायचं अशा विचारांचा तो नव्हता. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, सवयीमागे काही ना काही कारणे होती व त्यानुसार तो वागत होता.
निनादप्रमाणे आपल्यातही काही ना काही अशा सवयी असतात ज्या आपल्याला इतरांपासून वेगळा करतात तशी जाणीव देतात.आताच्या materialistic जगात जिथे चारी बाजूला झगमगाट आहे तिथे गरज म्हणून आहे तर बऱ्याच गोष्टी या दिखाव्यासाठी, चैन म्हणून केल्या जातात, विकत घेतल्या जातात, तिथे जर आपण आपल्याला आवश्यक ते घेत असू, त्यानुसार खर्च करत असू तर आपली ही सवय इतरांपासून वेगळी ठरू शकते.पण ही सवय आत्ताच्या काळात खूप गरजेची आहे.
मदत मागितल्यावर करणारे बरेच जण असतात. पण समोरच्याचे सुखदुःख त्याने न सांगताच समजून घेणं, त्यानुसार कृती करणं ही सवय निश्चितच आपल्याला दुसर्यापासून वेगळ करते. कारण हा गुण सर्वांमध्ये नसतो.
कोणतीही नवीन गोष्ट करताना बरेचदा त्याच त्याच पद्धतीने विचार केला जातो व पुन्हा ती गोष्ट केली जाते. ज्यातून काहीही साध्य होत नाही. पण आपण जर त्याच गोष्टीवर वेगळ्या पद्धतीने विचार करत असू, तशा स्ट्रॅटेजी तयार करून ती गोष्ट करत असू तर आपण अनेकांमध्ये उठून दिसतो, वेगळे ठरतो.
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करता करता आपले संस्कार, मूल्य ही कुठेतरी मागे पडत आहेत. पण तरीही अजूनही ती अनेकांमध्ये जपली जातात. ही मूल्य पाळली जातात. अश्या सवयी आताच्या काळात आपल्याला इतरांपासून वेगळ बनवू शकतात. जिथे सगळेजण technosavy झालेले आहेत, तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या माणसाची भेट घेणे, त्याच्या सुख दुःखात प्रत्यक्षपणे सामील होणे ही खरतर आपली संस्कृती आहे. जी कुटुंब व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला बांधून ठेवते. जी आताच्या काळात कमी होत असली तरी अश्या सवयी असणे हे वेगळेपण आणि माणूसपण आहे.
जरी आयुष्य हे एकच असलं तरी त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे, एकाच पद्धतीचे चाकोरीबद्ध आयुष्य न जगता काही वेळा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्यातून स्वतःचे व समाजाचे हित होत असेल अशा सवयी जर आपल्याकडे असतील तर नक्कीच आपण इतरांपासून वेगळे ठरतो.
संगीत असेल किंवा कोणतीही कला असेल सगळीकडे साहित्य, साधन तीच असतात. परंतु त्याचा वापर करण्याची त्याच्यातून कलाकृती बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते म्हणूनच इतरांपासून काहीतरी नवीन वेगळं करणाऱ्याला नेहमी नावाजल जात. हे त्याच्या सवयीतून आलेल असतं आणि या सवयी आपल्या विचारांतून, वेगवेगळ्या गुणांमधून तयार होतात.
म्हणूनच तर आपण चांगले गुण अंगी बाळगले, वेगळ्या पद्धतीने विचार केला, काहीतरी नवीन चांगलं, निर्माण केलं तर आपल्यातल्या या सवयी नक्कीच आपल्याला इतरांपासून वेगळ असल्याची अनुभूती देतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
