आपल्याकडे जगण्यासाठी अनेक कारणे असतात, पण मरण्यासाठी एक सुद्धा नाही.
मेराज बागवान
जन्म-मृत्यू ह्या अटळ गोष्टी आहेत.कोणाचीच यापासून सुटका नाही.पण ह्या भूमीतलावर सगळ्यांना जगायचे खूप आहे.मरण कोणालाच नको आहे.सगळे जण मरणाला घाबरतात. कोविड च्या लाटेमध्ये तर हे खूप प्रकर्षाने जाणवले.म्हणूच एक गोष्ट म्हणवीशी वाटते , आपल्याकडे जगण्यासाठी अनेक कारणे असतात, पण मरण्यासाठी एक सुद्धा नाही.
जगायचे का? आपल्याकडे यावर अनेक कारणे आहेत.जसे की मला स्वतःसाठी जगायचे आहे, काही तरी आयुष्यात बनून दाखवायचे आहे, मोठे व्हायचे आहे, यश मिळवायचे आहे, हौसमौज करायची आहे, माझ्या कुटुंबियांसाठी जगायचे आहे, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत म्हणून मला जगायचे आहे.अशी अनेक कारणे आपल्याकडे आहेत.आणि ही कारणे देत देतच आपण जगत आहोत.ही झाली जगण्याची कारणे.पण ‘मरणाच्या’ बाबतीत काय?
आपण सगळे भोग वस्तूत अडकून पडलो आहोत.आपले मन सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडकलेले असते.कधी स्वतःसाठी तर कधी प्रिय व्यक्तींसाठी. आता सगळे मार्गी लागले.चला निवांत होऊयात असे आपण कधीच म्हणत नाही.समाधानी वृत्ती अनेकवेळा कमीच पडते.मग यामुळे फक्त ‘जन्म’ हाच विषय आपल्याकडे उरतो. आपण जन्माला आलो आहोत, मग अजून खूप जग पाहायचे आहे असे आपण स्वतःला म्हणत असतो .जणू आपण इथले कायमचे प्रवासी असेच आपल्याला वाटत असते. मग आपल्यासाठी ‘मरण’ तर फार लांबची गोष्ट झाली.
आजकाल काही झाले की , आपण लगेच उपचार करतो.आणि जेव्हा जेव्हा आजारी पडतो तेव्हा तेव्हा मी मरणार तर नाही ना, ही भीती देखील कुठे ना कुठे असतेच. मुख्यत्वे आपण मरण स्वीकारतच नाही. ‘मरण’हे अंतिम सत्य आहे, हे मानायला आपले मन कधीच तयार नसते.म्हणूनच मग मरण्यासाठी कारण उरतच नाही.
जन्माचे आपण खूप जोरदार स्वागत करतो.नवीन बाळ जन्माला आले की सगळ्यांनाच खूप आनंद होतो.आणि ते साहजिकच आहे. पण ‘मरण’ ही फक्त ‘नकारात्मकच’ गोष्ट आहे.असे आपल्याला वाटत असते. पण ‘मरण’ हे जीवनचक्राची अंतिम पायरी आहे.
मी ,माझे मरण हे आपण जास्त करून कधी ध्यानी मनीच घेत नाही.पण एकदा का म्रुत्यु हे सत्य स्वीकारले की एक आत्मिक समाधान मिळते.ह्या जगात कोणतीच गोष्ट कायम नसते. कोणतीच परिस्थिती ही कायम नसते.जीवनाचे चक्र कायम फिरत असते.आणि म्हणूनच जिथे जन्म असतो तिथे मृत्यू हा असतोच.
म्हणूनच, म्रुत्यु ला स्वीकारणे फार गरजेचे आहे.आणि एकदा का हे सत्य स्वीकारले की भौतिक सुख-वस्तू म्हणजेच जीवन हा गैरसमज दूर होईल.पैसा, सुख, समृद्धी, यश म्हणजेच जीवन , आणि यातच गुंतून पडणे म्हणजेच जीवन सार्थकी लावणे असे नाही हे आपल्याला तेव्हा उमजेल जेव्हा आपण ‘म्रुत्यु’ ह्या गोष्टीचा सर्वार्थाने स्वीकार करू.
जन्माला आलो आहोत तर जगले तर पाहिजेच पण जगात फक्त ‘जगायलाच’ आलो आहोत हा गैरसमज दूर करूयात. माहीत नाही कोणाचा म्रुत्यु कधी, कोठे , कसा लिहिलेला आहे ते.पण हे जरी माहीत नसले तरी ‘ म्रुत्यु’ ही आयुष्याची शेवटची पायरी, आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


