आपले कान हे काहीतरी न ऐकण्यासाठी सुद्धा असतात !!
कु.मेराज बागवान
बारामती
निसर्गाने आपल्याला ‘कान’ हा असा एक खूप महत्वपूर्ण अवयव दिला आहे, की जो आपल्याला सुंदर अशा संगीताचा, आवाजाचा आनंद घेण्यासाठी खूप मदत करीत असतो.तर ह्या कानाचे मुख्य कार्य म्हणजे, ‘ऐकणे’.म्हणून समस्त मनुष्य प्राण्यांसाठी कान हा ऐकण्यासाठीचा अवयव आहे. पण कधी कधी ह्या कानाने काही वेळेस त्याचे कार्य थांबवले पाहिजे. पण मग तुम्ही म्हणाल , कानाने ऐकायचे नाही तर मग काय करायचे? खूप सोपे आहे, चला पाहुयात ,कानाचे कार्य काही बाबतीत कसे थांबवता येईल ते….
आपल्याला आयुष्यात असे बरेच अनुभव येतात , जेव्हा आपल्याला इतरांकडून ‘ऐकून’ घ्यावे लागते. मग कधी हे ऐकणे ‘कौतुकास्पद’ असते तर कधी ‘निंदात्मक’ असते.जेव्हा सकारात्मक बोलणे आपल्या कानावर पडते , ते आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी गरजेचेच असते.त्यामुळे हे बोलणे ‘लक्षपूर्वक ऐकणे’ खूप गरजेचे असते.पण दुसरीकडे , कोणीतरी आपल्याला उगाच टोमणे ‘ऐकवते’ ,मग अशा नकारात्मक बोलण्याकडे आपण किती लक्ष द्यायचे आणि आपले कान तिकडे वळवायचे की नाही हे मात्र आपल्या हातात असते.म्हणूनच आपण म्हणु शकतो की , आपले कान न ऐकण्यासाठी सुध्दा असतात.
सलोनी ला दहावीत ९५% गुण मिळाले आणि तिने ‘कला’ शाखा निवडली.तर तिच्या आजूबाजूचे तिला ऐकवायला लागले. अग ,’विज्ञान’ शाखा सोडून तू हे काय ‘खूळ’ डोक्यात घेऊन बसलीस. पण सलोनी , फक्त शालेय अभ्यासातच हुशार नव्हती, तर काय ऐकायचे आणि काय नाही ऐकायचे हे ती चांगलेच जाणून होती.आणि तिने अगदी असेच अंगी अवलंबिले आणि आज ती कला शाखेत ‘मानसशास्त्र’ विषय घेऊन द्वीपदविधर झाली आहे आणि एक ‘उत्कृष्ट’ ‘कौन्सिलर’ म्हणून अनेकांना आयुष्याची नवी वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे.
सलोनी ने त्यावेळेस जर इतरांचे बोलणे ऐकले असते तर कदाचित ती आज इथपर्यंत पोहचू शकली नसती. म्हणून काही गोष्टी ह्या ‘न ऐकण्यासाठी’ देखील असतात. तिथे कान बंद ठेवणेच योग्य ठरते.
तुषार ‘इंजिनिअर’ झालेला मुलगा.पण घरातील दडपणामुळे ‘चुकून इंजिनिअर’ झालेला. पण त्याचा कल मात्र ‘संगीताकडे’.इंजिनिअर होऊन , कुठे जॉब इंटर्व्हिव द्यावा ,बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करावी या सगळ्यात त्याला कसलाच रस नव्हता.कुटुंबियांसाठी तो जबरदस्ती इंटर्व्हिव देत असे .पण त्याचे मन मात्र ‘संगीत क्षेत्राकडे’ च गुंतलेले होते.म्हणून त्याने धाडस करून ऐके दिवशी ‘संगीत क्षेत्रातील’ संधीसाठी अर्ज केला ,आणि त्यांच्यातील गुणांमुळे त्याला ती संधी देखील मिळाली आणि आज तो एक उत्तम ‘गायक आणि संगीतकार’ म्हणून नावारूपास आला आहे.
तुषार ने जर असेच इतरांचे ऐकत , स्वतःला जे आवडते या कडे दुर्लक्ष केले असते तर तो कधीच इतका यशस्वी होऊ शकला नसता. म्हणून त्याने आपले कान वेळ निघून जाण्याआधी बंद ठेवले आणि तो एक समाधानी आयुष्य आज जगू शकत आहे.
‘अभिजित आणि मानसी’ एक आदर्श जोडपे.लहानपणापासून चांगले मित्र आणि तरुणपणी मैत्रीचे रूपांतर प्रेमात.तसे कुणाला काही हे नवल नव्हते, त्या दोघांचे कुटुंब शेजारी शेजारी रहात होते.त्यामुळे घरातील सर्वांनाच या सगळ्याची कल्पना होती.पण तरी देखील लग्नाला विरोध झाला.कारण असे काही खास नव्हते.पण सर्वांचे एकच मत ,’आंतरजातीय विवाह, लोक काय म्हणतील’.
पण अभिजित आणि मानसी समजूतदार होते , त्यांनी ह्या कारणांकडे अजिबात लक्ष न देता , कान तिकडे न वळवता , घरातील सर्वांना विश्वासात घेऊन त्यांची बाजू मांडली आणि शेवटी दोन्ही कुटुंबियांच्या संमतीनेच विवाह यशस्वीरीत्या पार पडला.आज दोन्ही कुटुंबे गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यावेळी जर अभिजित-मानसी ने ‘लोक काय म्हणतील’ याकडे लक्ष दिले असते तर दोघांची आयुष्ये विस्कळीत झाली असती आणि कोणीच आनंदात राहू शकले नसते.
जगात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्या वेळी आपण आपले कान ‘न ऐकण्यासाठी’ वापरायचे असतात. आज देखील अनेक मुलींनी टोमणे ऐकविले जातात. मुलगी २८-२९ वयाची झाली , अजून लग्न झाले नाही, अजून लग्न केले नाही, घरच्यांचे काही लक्ष आहे की नाही.पण त्या मुलीच्या, तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या काय अडचणी आहेत हे त्यांना त्यांचेच ठाऊक असते. आपण फक्त एखाद्याबद्दल अंदाज बांधू शकतो , पण वास्तव त्यापेक्षा खूप वेगळे असते.
काही बेरोजगार तरुण समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांना देखील काही लोक ‘टोमणे ऐकवतात’ ,’पैसे कमावण्याची आधी समज नाही आणि आला मोठा समाजकार्य करणारा कार्यकर्ता’. अशा वेळीस समोच्याला आपले म्हणणे पटवून देण्याऐवजी, त्यांना स्पष्टीकरण देण्याऐवजी , ‘कान बंद ठेवणेच इष्ट असते’.
समाज, लोक चांगले झाले तरी ‘ऐकवतात’ आणि वाईट झाले तरी ‘ऐकवतातच’.म्हणून कुठे कान उघडे ठेवायचे आणि कुठे बंद ठेवायचे हे लक्षात आले पाहिजे.
जेव्हा कधी ‘नकारात्मक’ गोष्टी कानावर पडतात.त्यावेळेस मौन धरणेच सर्वोत्तम असते. म्हणूनच आता ‘कान न ऐकण्यासाठी सुद्धा वापरूयात’.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


