Skip to content

आपला संवाद कसा सुधारावा ?

आपला संवाद कसा सुधारावा ?


आपलं मानसशास्त्र टीम


आपल्या भावना, विचार, मते आणि कल्पना यांच्या अभिव्यक्तीसाठी संवाद हे अतिशय महत्वाचे असे साधन आहे. एखादा सखोल विचार आणि दृढनिश्चय अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकतो. उत्तम संवादातून आपल्या बाजूने नसणारा प्रतिसाद आपल्या बाजूने वळवला जाऊ शकतो.

नम्र, शांत, संतुलित, आत्मविशासू, साधेपणा, ज्ञानाधिष्ठित आणि एकाग्रता या साऱ्या गोष्टी चांगल्या संवादासाठी नितांत आवश्यक आहेत. रुक्षता, उद्धटपणा आणि भडकपणाने केलेला संवाद आपण टाळायला हवा.

आपण इतरांसमवेत, आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांसमवेत जसा संवाद साधतो, त्याच पद्धतीने आपण स्वतःशीही संवाद साधत असतो. अहंकाराने ग्रस्त राहून जगणे आणि दुसऱ्याला सातत्याने नमवल्याने आपल्याला आक्रमक अशा प्रतिक्रियांचा अनुभव येत असतो.

बाहेरच्या जगाशी जसा संवाद आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपला आंतरिक संवादही तितकाच महत्वाचा आहे. किंबहुना त्याही पुढे जाऊन असे म्हणायला हवे कि आंतरिक संवाद अधिक महत्वाचा आहे.

जेव्हा आपण ध्यानमय अवस्थेत असतो आणि आपण आपल्याबाहेरील संवादाचे सारे धागे तोडून टाकतो, तेव्हा आपल्या स्वत्वाशी संपर्क जुळून येतो आणि आपल्या अंतःप्रेरणेचा विकास होतो.

शांततेची एक लाट येते आणि आंतरिक शांततेने मन भरून जाते. आंतरिक शांतता लाभली कि आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी संवाद साधतो, तेव्हा त्यात त्या शांततेचा अनुभव येतो.

आपल्या मनाची स्थिती जशी असेल, त्यानुसार आपल्या प्रतिक्रिया आणि इतरांशी असणारा संवाद अवलंबून असतो. अस्थिर मन असताना केलेला संवाद हा कायमच त्रस्तता, अस्वस्थता, अनाठायी अशा भावनांना जन्म देतो. जेव्हा मन स्थिर, शांत आणि संतुलित असते, तेव्हा व्यक्त होणाऱ्या भावनाही सहजसुलभ, बांधेसूद आणि विस्तारक्षम अशा असतात.

मानवी स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, आपण नको इतक्या घाईने निष्कर्षावर उडी मारत असतो. जेव्हा तुम्ही एखादे भांडण किंवा वादामध्ये असता, तेव्हा कधीही तातडीने दुसऱ्याला दोष देऊ नका अथवा टीका करू नका.

जेव्हा भांडणे होतील, तेव्हा त्यातून स्वतःला वेगळे करून बाजूला व्हायचा प्रयत्न करा. जेव्हा त्या परिस्थितीतील ताण कमी होईल, तेव्हा तुमचा मुद्दा पुढे शांतपणे मांडू शकता. आपल्या भावना व्यक्त करताना कायम सभ्य आणि नम्र रहा.

एखाद्या ठिकाणची कंपनेही संवादावर परिणाम करीत असतात. आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्यावर आपल्या मनाची स्थिती आणि संवादाची गुणवत्ता यांच्यावर त्याचा खूप मोठा प्रभाव असतो. जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा आपल्याला कायमच सकारात्मक कंपने आणि उच्च तत्वावरच्या ऊर्जेचा अनुभव येत असतो.

कोणीही भांडणे करत असताना अथवा वाद-विवाद होत असताना क्वचितच आपले तिकडे लक्ष जाते. जेव्हा आपण कामाच्या निमित्ताने विशेषतः रेल्वेने प्रवास करत असतो, तेव्हा ऊर्जा आणि कंपने हि सर्वत्र विखुरलेली असतात. त्यावेळी आपण अनेकदा प्रवाशांमध्ये भांडणे होत असलेली, मोठमोठ्या आवाजात बोलताना पाहतो. काही जण गाणी ऐकत असतात तर काही जण पुस्तके वाचत असतात.

सामान्यतः आपण जेव्हा रेल्वेमद्ये चढतो तेव्हा आपण आपले ठिकाण कधी येईल याची उत्कंठेने वाट पाहत असतो. या विखुरलेल्या कंपनांचा आपल्यावरही परिणाम होत असतो  आणि त्यामुळे क्षुल्लक अशा कारणांमुळेही आपण उत्तेजित होत असतो. त्यामुळे आपला उत्साह कमी-कमी होत जातो. पण जेव्हा आपण प्रचंड गर्दीच्या जागेतून बाहेर पडतो आणि आपल्या कार्यालयात पोहोचतो, तेव्हा काही क्षणांपुरता आपल्याला शांततेचा अनुभव येतो.

मनाच्या शांततामय अवस्थेतच तुम्ही एकाग्रतेने लक्ष केंद्रित करू शकता. ते केवळ ५ मिनिटांसाठी असो अथवा काही तासांसाठी. तुम्ही घरातील, कार्यालयातील विविध कामे करीत असताना किंवा अगदी प्रवास करताना देखील तुम्ही जप करू शकता. त्यासाठी एकाच जागी बसून राहण्याची आवश्यकता नसते.

सातत्याने कोणत्यातरी मंत्राचा जप करीत राहिल्याने तुमची उच्च स्थिती कायम टिकून राहते आणि त्याद्वारे इतरांशी असणारा तुमचा संवाद सुधारण्यास खूप मदत होते.

म्हणूनच आपली ऊर्जा वाचवायला हवी. इतरांविषयी कंड्या पिकवण्यात ती व्यर्थ वाया घालवू नये. सय्यम, सहिष्णुता, खंबीरपणा हि महत्वपूर्ण साधने आहेत. संवाद हि एक कला आहे. इतरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येईल, अशाप्रकारे तुम्ही इतरांशी संवाद साधा.

कोणताही संवाद हा चांगला आणि दुहेरी होण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे चांगले ऐकणारे बना. कोणत्याही चांगल्या संवादाइतकेच चांगले एकानेही तितकेच महत्वाचे आहे.

कोणत्याही चांगल्या संवादाचा बहुमोल नियम म्हणजे, ‘चांगले ऐका, समजून घ्या, विचार करा आणि मग प्रतिक्रिया द्या.’ दुसया माणसाला जराही संधी न देता केवळ तुम्हीच बडबड करीत राहिलात किंवा एकाच वेळी दोघे जण बोलत असाल, तर त्या संवादाला काहीही आधार नसतो आणि तो निरर्थकही ठरतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!