Skip to content

“आपला केवळ वापर करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा.”

“आपला केवळ वापर करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा.”


मधुश्री देशपांडे गानू


“व्यक्ती तितक्या प्रकृती” ही म्हण सगळ्यांनाच ठाऊक आहे. हर तर्हेची, स्वभावाची, नानाविध पदर असलेली माणसे या जगात आहेत. अगदी चोवीस तास एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षे ओळखत असतानाही अमुक एका प्रसंगी ती व्यक्ती अशीच वागेल असं आपण ठामपणे नाही सांगू शकत. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन, संस्कार, स्वभाव, त्याप्रसंगापुरती  त्याची मनस्थिती कितीतरी घटकांवर प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. जसे या जगात चांगले, सद्वर्तनी, सज्जन लोक आहेत, तसेच स्वार्थी, चलाख, चाणाक्ष, लबाड, धूर्त देखील आहेत. आणि अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीचे देखील आहेत.

पण आज आपण केवळ लोकांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणाऱ्या लोकांबद्दल बोलणार आहोत. अत्यंत धूर्त, हुशार, चाणाक्ष लोक असतात हे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची, बोलण्या-चालण्याची छाप सहज इतरांवर कशी पाडायची यात माहीर असतात. अगदी सर्वसामान्य, चाकोरीबद्ध सरळ जीवन जगणार्‍या लोकांना अशी माणसे वेळीच ओळखता येत नाहीत.

त्यामुळे त्यांच्या गोड गोड बोलण्याने, आकर्षक व्यक्तिमत्वाने सहज अनेक जण फसले जातात. अशा लोकांवर फार चटकन विश्वास ठेवला जातो. वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या जातात. पण यातूनच ही धूर्त माणसे कधी तुमचा कसा वापर करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात हे तुम्हाला कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. फसवणूक कशाही प्रकारे होतेच. विश्वासघाताचा धक्का तर बसतो. पण आता पश्चाताप करूनही काही उपयोग नसतो.

अगदी साधं सोपं उदाहरण घेऊ. दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी, खूप वर्षापासूनची मैत्री किंवा प्रियकर-प्रेयसी. अशा नात्यात एकाची भावनिक गुंतवणूक खूप जास्त असते. काळजी, प्रेम, विश्वास, कौतुक, आदर, माया, योग्य संवाद असे सगळे नात्याचे पदर यातील एकच व्यक्ती सांभाळत असते. दुसरी व्यक्ती मात्र जेव्हा तिला गरज असेल तेव्हाच त्या व्यक्तीशी संपर्क साधते. म्हणजे मैत्रीण असेल तर तिच्या अडचणीच्या वेळेला, कामाच्या वेळेला ती आपल्या मैत्रिणीला हक्काने बोलवेल. पण दुसऱ्या मैत्रिणीच्या अडचणीच्या वेळी मात्र काहीतरी थातुरमातुर कारण सांगून मदत करणार नाही. अशी उदाहरणे अगदी सहज अनुभवाला येतात.

सध्या सोशल मीडियामुळे आभासी नात्यांचा तर पूर आला आहे. हजारो मित्र मैत्रिणी आणि तसेच आभासी प्रियकर-प्रेयसी सुद्धा. सगळेच वाईट असतात असं अजिबात नाही. पण आपण सावध असावं लागतं. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. अनोळखी व्यक्तींवर फार पटकन विश्वास ठेवतो आपण. आपली दुःखं, अडचणी लगेच सांगतो. मग याच गोष्टींचा भावनिक वापर करून प्रेमाच्या खोट्या नात्यात अडकवले जाते. सोशल मीडियावर या प्रेमाचे काय प्रकार चालतात ते वेगळे सांगायला नको. यातूनच ब्लॅकमेलिंग, बलात्कार सारखी प्रकरणं उद्भवतात. स्त्रियाही पुरुषांची पैशाची फसवणूक करतात.

कित्येकदा तुमचा जवळचा मित्र असुदे मैत्रीण असू दे तिला हवं तेव्हाच, तिचे दुःख सांगायचं असेल तरच तिला तुमची आठवण येते. पण “तू कशी आहेस?” हे विचारायचं मात्र ती पद्धतशीरपणे विसरते. कोणीतरी फुकटचं ऐकायला हवं असतं, बास! त्याच आस्थेने तुमची चौकशी, तुमचं कौतुक, तुमच्या यशाचा आनंद याच्यात तिला/त्याला काहीच इंटरेस्ट नसतो.

कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. कधीही कोणासाठीही “Emotional Dustbin” बनू नका. त्यांच्या दुःखाचा कचरा ते तुमच्यासमोर ओतणार आणि मोकळं होणार. तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचं, तेही त्यांची इच्छा असेल तेव्हाच. स्वतःचा असा वापर कधीही कोणालाही करू देऊ नका. कोणत्याही नात्यात समान देवाण-घेवाण असेल तेव्हाच ते नातं टिकतं.

आपला केवळ वापर करणारी माणसं ओळखायची कशी?

१) अत्यंत गोड बोलतात. सुरुवातीला ओळख करून घेताना, ती वाढवताना गोड गोड बोलणारी असतात. तुमची अकारण, अवास्तव स्तुती करतात. २) नजर आणि हावभाव. एक तर सुरुवातीला नजरेला नजर देणं टाळतात किंवा एकटक नजर स्थिर ठेवून बोलतात. अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाने स्वतःची समोरच्यावर छाप पाडतात. ३) तुम्हांला कधीच कसलीही मदत करत नाहीत. सतत काहीतरी निमित्त सांगतात. ४) त्यांचं बोलणं आणि कृती यात प्रचंड तफावत असते. कधीच ताळमेळ बसत नाही. ५) विरोध सहन होत नाही. तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे हा अट्टाहास असतो. ६) तुम्हांला जेव्हा त्यांचं खरं रुप कळतं तेव्हा मान्य करत नाहीत आणि आक्रमक होतात. तुमची बाजू मांडायची संधी तुम्हांला देत नाहीत.

सध्या ” I Love You ” हा तर  अगदी उथळ वाक्प्रचार झाला आहे. पण प्रेमाच्या भरात बोललेलं कितीजण कृतीत आणतात?? विशेष करून मुलींनी अशा पोकळ प्रेमाला अजिबात फसू नये, बळी पडू नये. बोलणं आणि कृती यांची सांगड आहे का? याचा डोळसपणे विचार करावा. नाहीतर तुमचा वापर करून मग तुम्हांला नाकारण्यार्यांची संख्या  इथे कमी नाही. अशा लोकांना सावध राहून वेळीच ओळखा.

आज जीवघेण्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण कोणत्यातरी समस्येने, ताणाने ग्रासलेला आहे. अशावेळी बुवाबाजीचे ही पेव फुटले आहे. देवाधर्माच्या नावाखाली अत्यंत वाईट पद्धतीने सगळ्या प्रकारे सर्वसामान्य गांजलेल्या लोकांचा कसाही वापर होत आहे. हे आपण रोज बघतोच आहोत.

कष्ट न करता पैसा हवा आहे. शारीरिक आकर्षण, शरीर संबंध याला अवास्तव महत्त्व आले आहे. खूप सावध राहून माणसं ओळखून, पारखून घेण्याची आज गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबामध्ये एकोपा हवा. तुम्ही बाहेर काय करता, कोणा बरोबर असता याची माहिती कुटुंबातील व्यक्तींना हवीच हवी. “कुटुंबांतील नाती निकोप,  विश्‍वासार्ह असणे ही काळाची गरज आहे.” कारण असं नसेल तर अशा घरातील व्यक्तीचा वापर होण्याची शक्यता वाढते.

स्वतःवर ठाम विश्वास असावा. तुमचं अंतर्मन तुम्हांला वेळोवेळी चांगल्या वाईटाची सूचना देत असतं.  पण तुम्ही दुर्लक्ष करता. तुमच्या अंतर्मनाचा कौल वेळीच ऐका. “एखादी गोष्ट किंवा व्यक्ती चूक आहे.” असं तुमचं अंतर्मन तुम्हांला सांगत असतं तेव्हा बहुतेकदा ते खरं असतं.  कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. एक सोप्पा प्रश्न स्वतःला विचारा. ही व्यक्ती मला लाभदायी आहे का? याने माझी प्रगती होते का? मला आनंद मिळतोय का? जर उत्तर “नाही” आलं तर ताबडतोब अशा व्यक्तीपासून दूर व्हा. तुमचे आयुष्य आनंदी होण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. बघा पटतंय का??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!