Skip to content

आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्यालाच वाटतं.

आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्यालाच वाटतं.


टीम आपलं मानसशास्त्र


मानवी स्वभाव आहे आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे असे प्रत्येकाला वाटत असते. मराठी मधली एक म्हण आहे ” दुरून डोंगर साजरे “.
दुरून बघितले की ते डोंगर खूप सुंदर दिसतात. त्याच्या वरची झाडे झुडपे हिरवीगार , सुंदर दिसतात. पण जवळ गेले की समजते की ती झाडे झुडपे काटेरी आहेत. सगळीच झाडे काही हिरवीगार नाहीत. त्यात काही वाळलेली , सुकलेली ही झाडे आहेत. काही निष्पर्ण ही आहेत.
तसेच आहे , प्रत्यक्षात आपल्याकडे अनेक चांगल्या गोष्टी असतात पण त्या आपण विचारात घेत नाही. त्याकडे लक्ष जात नाही.

किंवा आपल्याकडे ज्या वस्तू नाहीत , गोष्टी , व्यक्ती नाहीत त्या मिळविण्याकरिता आपण खूप इच्छा करतो , त्याकरिता प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी मिळवीत ही असतो. पण त्या मिळवल्या की ते समाधान कायमच राहत नाही. त्याची किंमत राहत नाही. याउलट आपल्याकडे जे आहे ते दुर्लक्षित केले जाते.. आणि दुसऱ्याकडे काय आहे ते बघून आपल्याला असे वाटते की अरे वाह त्याच चांगलच आहे. नेहमी आपण इतरांकडे बघत असतो.

एखादा मोठा उद्योगपती आहे तर त्याच्याकडे ब्रँडेड गाड्या , मोबाईल , घड्याळे , उंची कपडे असे बघून आपल्याला असे होते की अरे हा मोठा आहे त्याच्याकडे हे सगळे चांगलं चांगलं आहे. याला काय कमी आहे.

पण आपल्याला आता तो मोठा बिझनेसमन झाल्यावर आणि त्याच्याकडे असलेल्या गोष्टी बघून वाटते की आपल्याकडे हे नाही पण त्याच्या कडे आहे त्याच चांगलंच सुरू आहे. या चांगलं मागे त्याची खूप मेहनत असते. वेळ प्रसंगी केलेली तडजोड असते. अनेक गोष्टींचे त्याग असतात. शून्यातून तो वर आलेला असतो. आणि मोठा बिझनेसमन असला तरी त्याच्या चिंता मिटलेल्या नसतात च. तो दाखवत नसेल पण काही वेळेस त्यांचे स्टेटस मेन्टेन करण्याकरिता दिखावा करावा लागतो. तर लोक आकर्षित होतात.

आणि त्यातून अजून business वाढतो. काही वेळेस कर्जाचा डोंगर असतो. पण त्याला आनंदी चेहरा ठेवावा लागतो. सतत चिडचिड , राग करून चालत नाही. शांत राहून पुढे जावे लागते. आज त्याची जेवढी प्रसिध्दी दिसते त्यापेक्षा कैक पटीने त्याने मेहनत घेतली असते , कष्ट केले असतात. त्याग असतात.

बर्फाचा मोठा तुकडा समुद्रात जेवढा वरती दिसतो त्याच्या कैक पट खोल समुद्रात आत असतो. डोळ्यांना फक्त वरचा एक तुकडा दिसतो. तसे आपल्याला त्याचे चांगले दिवस , त्याच्या आलिशान वस्तू , घरे , गाड्या दिसतात. पण हे कमविण्याकरिता कैक पटीने त्याने मेहनत घेतली असते. ती दिसत नाही. त्याचे अनेकवेळा आलेले अपयश दिसत नाही. त्याचे प्रयत्न दिसत नाहीत. त्याग दिसत नाहीत,धाडस दिसत नाही. कुटुंबापासून दूर राहण्याचे त्याग दिसत नाहीत , दिवस रात्र केलेली मेहनत दिसत नाही. दिसते ते केवळ यश , पैसा , नाव , कीर्ती , समृध्दी , स्थैर्य .

मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म बघितली होती . त्यात दोन घरे समोरा समोर असतात. त्यात सगळीकडे काचा असल्यामुळे इकडच्या घरातून समोरचे दिसत असते. इकडच्या घरातली स्विटू समोरच्या घरातल्या रीना आणि तिच्या नवऱ्याला रोज प्रेमाने जवळ घेताना ..एकत्र भरवताना बघत असते. रोज काही पार्टी , मित्र मैत्रिणी , कधी छान gifts बघत असते.

स्विटू मात्र तिच्या तीन लहान मुलांचे , नवऱ्याचे करण्यात रोज गुंग असतें . सतत तेच करून कंटाळत असते. चिडचिड करत असते. आणि रोज रीना आणि तिच्या नवऱ्याचे प्रेम , एकत्र डान्स , एकत्र बसून candle light जेवण बघत असते. त्यांच्या घरात होणाऱ्या पार्टी बघून म्हणत असते किती खुश आहेत दोघे. नशीबवान आहेत. किती आनंदी आहेत. किती प्रेम करतात एकमेकांवर ..आणि मग आपल्या नवऱ्या वर चिडचिड करत असे. उदास बसत असे. आपल्याला हे काही मिळत नाही. आपला नवरा प्रेम करत नाही. तरी स्विटू चा नवरा तिला खूप मदत करत असतो. मुलांना सांभाळणे , तू दमली बस म्हणून वाढत असे. पण तरी ती खुश नसे. रोज सवयी ने समोर बघत असे .

एकदा ती असेच बघत असते एक दिवस , दोन दिवस जातात समोरच्या घरात काही हालचाल दिसत नाही. एक दिवस जातो दोन दिवस जातात. अचानक एक ambulance समोरच्या घरी येते. आणि इकडून स्विटू बघत असतें. आणि अचानक तिला रीना च्या‌ नवऱ्याचा मृतदेह दिसतो. तिला खूप धक्का बसतो. ती धावत पळत जावून रीना ला मिठी मारते. आणि तीच सांत्वन करते. आणि विचारपूस करते तेव्हा तिला समजते की रीनाचा नवरा गेली वर्षभर कॅन्सर ने आजारी होता.

आणि रीना म्हणून कायम त्याच्या सोबत असायची. त्याला आवडत्या गोष्टी करायची.त्याला आनंदी ठेवायची हे रीनाकडून समजल्यावर मात्र स्विटू ला जाणविले की जे समोर चांगले चांगले दिसत होते तेवढेच आपण बघत होतो. पण रीना आणि तिचा नवरा यांना रोज होणाऱ्या मानसिक यातना, शारीरिक त्रास , आपले मरण अटळ आहे याची जाणीव असताना रिनाचा नवरा आपल दुःख , शारीरिक त्रास बाजूला ठेवून रिनाला आनंदी ,सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच रीना ही त्याच्या मित्र मैत्रिणी यांना घरी बोलावून त्याला आनंदाचे क्षण जगू देत होती.

पण आपण मात्र फक्त आनंद , सुख , प्रेम बघत होतो. एकमेकांची चिंता , काळजी , औषोधोपचार , होणारे शारीरिक आणि मानसिक याची आपल्याला जराही कल्पना नव्हती. याचे स्विटू ला खूप वाईट वाटले. आणि आपण काय समजत होतो आणि खरे सत्य काय होते हे बघितल्यावर आपण आपल्या संसारात किती आनंदी आहोत. मुलांचा आनंद , आपला नवरा कायम सोबत असतो आणि तो आपली घेत असलेली काळजी याची जाणिव झाली.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्यालाच वाटतं.कारण आपण आपल्याकडे जे आहे ते कधीच बघत नाही. त्याची value नसते आपल्याला. कदर नसते. दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही एवढेच आपण बघत असतो.

मिलिटरी ऑफिसर त्यांच्या सुख सोयी दिसतात. त्यांच्या तैनाती ला असलेला स्टाफ दिसतो. त्यांना असलेल्या सवलती दिसतात. पण वेळप्रसंगी आपल्या प्राणाची ही पर्वा न करता , आपल्या कुटुंबियांना सोडून सीमेवर आपल्या देशाकरिता लढाई ला हेच सैनिक तत्परतेने धावतात. प्रसंगी लढाई जिंकतात तर कधी तरी आपला जीव पणाला लावतात आणि देशा करिता हसत हसत .युद्ध करताना शहीद ही होतात. तेव्हा त्यांचा देशाकरीता त्याग आणि त्यात कुटुंब आणि आपल्या लोकांना सोडून जाण्याचा त्याग दिसतो. प्रसंगी सगळे सोडून करावी लागणारी तडजोड दिसते. कौटुंबिक कर्तव्य बाजूला सारून देशाप्रती कर्तव्य निभवावे लागते.

मग आपण तर किती नशीबवान असतो. की कोणाच्या तरी त्यागं , बलिदान यामुळे आपण आपले कुटुंब सुरक्षित असतो.

आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्यालाच वाटतं. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कायम count करा कदाचित आपल्याकडे जे चांगले आहे ते समोरच्या कडे ही नसते म्हणूनच आहे त्याचा आदर ठेवा.

आयुष्य सुंदर आहे .आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, हा नकारात्मक विचार मनातून काढून टाका आणि आपल्याकडे जे चांगले आहे त्यात आनंद शोधा , समाधान शोधा. जे आहे ते सकारात्मक दृष्ट्या बघा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपलं सोडून सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्यालाच वाटतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!