Skip to content

आपलं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळलं की सुखाची चव येते.

आपलं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळलं की सुखाची चव येते.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्य म्हणजे सुख-दुःखाचा सुरेख संगम…..!! पण सर्वांना हवहवसं वाटत असतं ते सुख….आणि नकोनकोस वाटत असतं ते दुःख…!!आयुष्यात कितीही सुखाचे किनारे असले तरी तिथे दुःखाच्याच लाटा अगणित असतात असं आपल्याला वाटतं.दिवसामागून दुःखं येतच राहतात.पण ती दुःखं येतात तशीच जातातही.दुःखं गेली की सुखाचा मार्ग कसा मोकळा होतो.

खर तर सुख-दुःखाची व्याख्या करणं तस अवघडच..!! कारण कोणाला कोणत्या गोष्टीत सुख मिळेल आणि कोणाला कोणत्या गोष्टीच दुःख होईल हे सांगता येत नाही. मित्रांनो , आपल्याला आपलं दुःख हे नेहमीच मोठ्ठ वाटत असतं.पण मला सांगा आपलं दुःखं इतरांपेक्षा मोठ्ठ आहे हे ठरवणारे आपण कोण…??वरवर दिसत असलं तरी कोणाच्या आत त्या दुःखाचा किती कहर आहे हे आपल्याला नाही समजत.माझच दुःखं मोठ्ठ समजुन आपण त्याचा बाजार मांडत बसतो.

एखादी गोष्ट शेअर करणं वेगळं आणि त्याचा बाजार मांडण वेगळं…!एकतर असही सुखाची किंमत दुःख आल्यावरच कळते.आपल्यापेक्षा इतरांच , जगाच दुःख हे मोठ्ठ असु शकत हे आपण विसरतो का..??की जगाच्या दुःखापुढे आपल्याला आपलच दुःख मोठ्ठ वाटतं..?? नाही का…???? हां काही अपवाद आहेत याला. जगाच्या दुःखापुढे आपलं दुःख क्षुल्लक वाटतं त्यांना. सारख सारख दुःखाचा बाजार मांडून आपल्याच दुःखाला स्वतःभोवती पिंगा घालायला लावत नाही.

मित्रांनो , जरा जगाच्या दुःखात स्वतःचं दुःख मिसळून बघा….सुखाची चव कशी जिभेवर आपोआप रेंगाळेल….!! दुःख सहजासहजी विसरता येत नाही पण एकदा इतरांच्या दुःखात मिसळून जायला काही हरकत नाही.इतरांच्या दुःखात आपल्याला आपल्या दुःखाचा विसर कधी पडतो लक्षातही येत नाही. आपलं दुःखही अशावेळी आपल्याला अगदी छोट्टस वाटायला लागतं. आपण कितीतरी अधिक सुखात आहोत याची जाणीव आपल्याला नकळतपणे होऊन जाते.

वेगवेगळ्या गोष्टींचं , वेगवेगळ्या प्रकारचं दुःखं….खरच किती त्या दुःखाच्या एक एक तऱ्हा…!!कुणाचं पर्वताएवढं तर कुणाच त्या विस्तीर्ण आभाळाएवढं दुःखं……आणि सुखाच काय तर…ओंजळभर , कणभर , मुठभर सुख……!अरे अशी मापं नाही ठरवता येत सुख-दुःखाची..निसर्गाने देताना दोन्हींमध्ये समतोल राखूनच दिलय.आपण त्याची मापं ठरवली.म्हणून आपल्याला दुःख पचवणं अवघड जातं. आभाळाएवढं दुःख वाटत असेल तर ते आभाळाएवढच वाटणार….तेच दुःख ओंजळभर आहे असं म्हणायला शिका…ओझं जरा हलकं होईल.

काही उदाहरण जाणून घेतली तर अगदी सहज लक्षात येईल… आयुष्यात आजुबाजुला इतक्या घटना घडतात की ऐकलं तरी कान , मन आणि मेंदूसुद्धा सुन्न होतो.

*महापूर/अतिवृष्टी/दरड कोसळणे…किंवा पावसामुळे होणाऱ्या आपत्ती.
*साखळी बॉम्बस्फोट/दहशतवादी हल्ले.
*अत्याचार/बलात्कार/हत्या

ही अशी काही उदाहरण आहेत जी की काळजाचा ठोका चुकणं काय असतं हे क्षणात सांगून जातात. हे घडल्यानंतरच दुःख , वेदना काय असतात हे आपण केवळ डोळ्यांनी पाहतो.पण ते बघतानाही मन कोलमडून पडतच…(कधी कधी अशा प्रसंगांना आपणही अनुभवतो.)म्हणजे विचार करा…त्या अतिवृष्टी , महापुरात आयुष्याचा संसार सेकंदात उध्वस्त होतो.

दहशतवादी हल्ल्यांमध्ये तर कित्येकांचा नाहक बळी जातो.आणि आपले रक्षण करणारे रक्षणकर्ते जेव्हा धरतीवर कोसळतात तेव्हा त्यांच्या घरच्यांच दुःख काय असेल…?? आणि अत्याचार बलात्कार या घटना तर इतक्या वाढल्या आहेत की ज्याच्यावर हा प्रसंग येतोय त्यांच दुःख ?? खरंतर कुणाच्या दुःखाची तुलना होऊ शकत नाहीच.कारण प्रत्येकाच दुःख वेगवेगळं असतं.

पण एक सांगायच झालं तर…एका अपघातात आपला पाय तुटला..आणि आपल्यासोबत असणारी व्यक्ती हे जगच सोडून गेली तर….मला वाटत इतकच लक्षात घेतल पाहिजे की , माझा पाय गेला तर मी इतकं दुःख का करावं..?? मला कमीत कमी उरलेल आयुष्य जगायला तरी मिळतय.आणि तो तर अपघातात गेला..त्याच्या घरच्यांनी तर त्याला पूर्णपणे गमावलं आहे. माझ्या घरच्यांसाठी मी डोळ्यापुढे तरी असेन…

पण त्याच्या घरच्यांच काय..??त्यांच दुःखापुढे माझं दुःख काही नाही…. मी आहे तसा सुखी आहे… असा विचार केला , थोडस दुःख इतरांच्या दुःखात मिसळवल तर…प्रत्येकाला सुखाची चव नक्की कळेल…आणि आपलं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळलं की सुखाची चव येते……..ह्या गोष्टीची जाणीवही प्रत्येकाला होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!