Skip to content

आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय संघर्षाचा खरा अर्थ कळत नाही…

आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय संघर्षाचा खरा अर्थ कळत नाही…


कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे


क्षणक्षण हळव्या मिठीत रिजतो
आठवांच्या पावसात चिंब चिंब भिजतो
शोधावयास दाणा-पाणी
पाऊले हळूवार चोरताना……..
रणरणत्या ऊन्हातील शीतल छाया
गहीऱ्या डोळ्यातील निःस्वार्थ माया
रिते हे आयुष्य वाटतो आसमंत ही सुना सुना……
क्षणाक्षणांचा सहवास सरतो तो
अन् उरतात केवळ स्पर्शखुणा….
कस सांगायच….
घरटे सोडून जाताना
जीव किती होतो ओ केविलवाणा……??

ज्या घरट्यात जन्माला येतो , ज्या घरट्यात पावलांवर पाऊल ठेवत बोट धरून चालायला शिकतो , ज्या घरट्यात उडायला पंख लावले जातात , अशा या घरट्याला सोडून जाताना मनाची अवस्था डोळ्यांना क्षणभरही बघवत नाही. इतक्या दिवसांचा सहवास आणि कडू-गोड आठवणींना मागे सोडताना मनाच्या नी देहाच्या पावलांना अक्षरशः वेदना होतात.

पाऊलं घरट्यातून बाहेर निघायला तयार नसतात पण आपले डोळे…या आपल्या डोळ्यात नाही म्हंटल तरी खूप ताकद असते.आणि हीच ताकद तुला बाहेर पडायचय,स्वप्नांशी संघर्ष करायचाय हे स्पष्टपणे खुणावत असते.अगदी ज्याला दृष्टी नाही त्यालाही ती ताकद तेच खुणावत असते.आणि मग अगदी जड अंतःकरणाने त्या पावलांना कसंबसं समजावून आपणच घरट्याबाहेरचा रस्ता दाखवतो.

घरटं आयुष्यभर अधिकाधिक सुंदर आणि भक्कम करायच असेल तर हेच घरटं काही क्षणांसाठी तरी सोडावं लागेल..असा आपलाच आपल्याशी संवाद सुरु होतो आणि आपण आपलं घरटं सोडून एका अनोळखी रस्त्याकडे आपली पावलं वळवतो.तेव्हाच , तिथूनच सुरु होतो आपल्या संघर्षाचा एक अनोखा प्रवास……!

शारीरिक , सामाजिक , मानसिक , कौटुंबिक , आर्थिक अशा वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष आयुष्यात आपण करत असतो.आणि जेव्हा आपण घरटं सोडून बाहेर पडतो तेव्हा आपल्या जगण्याचा खरा संघर्ष सुरू होतो.अगदी नवं घरटं शोधण्यापासून या संघर्षाची सुरुवात होत असते.सगळी घरटी आपल्या घरट्यासारखी आपली नसतात.

इतकच नाही तर कधी कधी आपल्याला नव्या घरट्यातल्या पाण्याची चवही लागत नाही. ते बाहेरचं अन्न खाताना तर आधी आठवतं ते आपलं हक्काच गोंडस घरटं…!म्हणजे राहण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंत संघर्ष करावा लागतो. कारण सगळच काही हातात असं ‘easily’ मिळत नाही. तेही मिळवावं लागतं.आणि ते मिळवण्यासाठी आधी वणवण फिरावं लागतं.आता घरटं सोडलं म्हणजे खरं तर जगायला बाहेर पडलो आहोत तर आपला संघर्ष जगण्याशी आहे हे आपल्याला माहीत असावं.

कारण संघर्ष करतोय पण कशासाठी , कोणत्या गोष्टीसाठी करतोय हे माहीत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आपण आपल्या घरट्यात असतो तेव्हा आपल्याला आपल्या घरट्याविषयी असुया असते.पण कधीकधी आपण आपल्या घरट्याची जाण ठेवायचीही विसरतो. पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या घरट्याविषयी असुया वाटत नाही पण काहीही करून जाण ठेवावी लागतेच कारण तसं केलं नाही तर त्या अनोळखी घरट्यातून केव्हा बेदखल केलं जातं कळतही नाही. अशा वेळी सुरू होतो तो वास्तव्याचा संघर्ष….!!

एका घरट्याकडून दुसऱ्या घरट्याकडे ,दुसऱ्या घरट्याकडून तिसऱ्या….असा हा संघर्ष आपल्याला करावा लागतो.बाहेर पडल्यावर पोटापाण्यासाठी पैसे तर लागणारच…घरून कितीदिवस असे सारखे सारखे पैसे मागणार..??आणि बाहेर राहणं मुळीच सोपे नाही. कुठे किती आणि कशी आर्थिक चणचण भासेल सांगता येत नाही. आणि पैसा नाही तर काही नाही ह्याची प्रचिती तर आपल्याला खूपदा येते.त्या पैशावरूनही कितीदा आपल्याला अपमान सहन करावा लागतो.

अशावेळी आर्थिक संघर्ष सुरू झालाय ह्याची जाणीव आपल्याला होते.घरटं सोडून स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी बाहेर आलोय तर कष्ट करावेच लागणार.कष्टाशिवाय , अथक प्रयत्नांशिवाय हा संघर्षाचा प्रवास अपूर्ण आहे. आणि संघर्ष म्हणजे तरी काय…?? तर संघर्ष म्हणजे खाचखळग्यांचाच एक खडतर प्रवास…!! खाचखळगे येणार-जाणार… त्या खड्ड्यात आपण अडखळणार,धडपडणार…

पण तिथून बाहेर पडणं हा झाला संघर्ष.घरच्यांसारख ओरडून पुन्हा जवळ घेणारं या बाहेरच्या जगात सहसा कुणी भेटत नाही. समजून उमजून सांगणारी आपल्या घरट्यातली माणसं या घरट्यात असणं फार कठिणच…!

खरचं , घरटं सोडल्यावरच संघर्षाचा अर्थ कळायला लागतो.दोन वेळच्या भाजीभाकरीसाठी , बघितलेल्या स्वप्नांसाठी आपल्याला संघर्ष करावाच लागतो.आपल्या घरट्यापासून लांब राहून , सगळ्या आठवणींना काही काळासाठी विसरून आपण भावनांशी संघर्ष करायला शिकतो.नोकरी मिळेल, नाही मिळणार…, येणारे जाणारे अपमान करतील.., डिवचतील…

या सगळ्याची तयारी करून मानसिक संघर्षाला आपण सामोरे जातो.कधी कधी पैसे खर्च होऊ नयेत म्हणून चालत चालत अंतर पार करतो.मेसला पैसे जातात म्हणून कधी कधी एखाद्या वडापाव नी चहावर दिवस घालवतो.स्वतःच स्वतः सगळं करून वेळेत सगळं होण्यासाठी तारेवरची कसरत करतो.अरे नाही… नाही तु जा..मी चहा पीत नाही असं म्हणून त्याच चहाचे पैसे वाचवून एखादं अर्ध्या किंमतीतील पुस्तक खरेदी करतो.

इतकच नाही तर…तो दोन पाय नसलेला माणूस पोटापाण्यासाठी फुटपाथवर बसून चित्र काढतो…आणि ते बघताना मनाची अवस्था अजून अवघड होऊन बसते.जगण्यासाठी त्याचा इतका संघर्ष…..???तेही अशा अवस्थेत असताना…??? ही अवस्था पाहून मनातल्या मनात विचारांचा केव्हा संघर्ष सुरू होतो लक्षातही येत नाही.घरट्यात राहून हा संघर्ष कळत नाही. आणि कळणारही नाही.

जो लढतो तो संघर्ष करतो.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लढून ,झगडून संघर्ष केला. आपणही परिस्थितीशी लढून संघर्ष करायला शिकलं पाहिजे.पण त्यासाठी एकदा तरी घरटं सोडलं पाहिजे. कारण संघर्ष म्हणजे काय…????हे घरटं सोडल्यावरच खऱ्या अर्थाने कळायला लागतं.एखाद्या गोष्टीचं मातेरं झालं असेल तर त्याच मातीतून हिरवीगार समृद्धी पिकवता आली पाहिजे. त्यालाच तर खरा संघर्ष म्हणतात….!!

म्हणून लढाईच्या मैदानात एकदा तरी उतरा……संघर्ष करायला हात सरसावल्याशिवाय राहणार नाहीत……..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय संघर्षाचा खरा अर्थ कळत नाही…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!