Skip to content

“आपण सर्वांनी स्वतंत्र मानसिकतेचं स्वप्न जगायला हवं.”

“आपण सर्वांनी स्वतंत्र मानसिकतेचं स्वप्न जगायला हवं.”


मधुश्री देशपांडे गानू


“बलसागर भारत होवो,

विश्वात शोभुनी राहो..”

सर्वप्रथम सर्व वाचकांना 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. देश सर्वो परी!

जेव्हा मी ब्रह्मविद्येचं प्रशिक्षण घेत होते तेव्हा आम्हाला काही वाचन पाठ असत. ते रोज म्हणायचे. त्यात काही वाक्य अशी होती. “मी संपूर्ण आहे. माझ्यात कसलीही उणीव नाही. कोणतीही भर घालणे शक्य नाही. काहीही बाहेर काढून घेणे शक्य नाही. मी सर्व आहे.” किती ताकदीची आहेत ना ही वाक्यं! आणि जर तुम्ही या वाक्यांचा रोज सराव करत असाल तर केवढी मानसिक क्षमता वाढेल तुमची.

हीच तर स्वतंत्र मानसिकता.. मग नवीन काही शिकायचं नाही का? तर असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की मुळात माझं मन आणि शरीर एक संपूर्ण ताकद आहे आणि मी ती संपूर्णपणे वापरली पाहिजे. शिकण्यासाठी, कृती करण्यासाठी, चिंतन-मनन करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी.

आज देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. खरं तर एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा कालावधी छोटा आहे. तरीही आज आपण संपूर्णपणे स्वतंत्र मानसिकता विकसित केली आहे का? आपल्या देशाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. म्हणजे खरं तर हीच आपली खरी ताकद आहे. पण तरुण आज ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धतीत अडकला आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर , इंजिनिअर चा मुलगा इंजिनियर या मानसिकतेतून आपण बाहेर पडू शकत नाही.

आजही पालकांच्या इच्छा, आकांक्षांचे ओझे तरुणांवर आहे. आज शिक्षणाचे अनेक स्तर उपलब्ध आहेत. पण एखादा अनोखा, वेगळा मार्ग चोखंदळपणे  चालताना आमच्या मनात धाकधूक आहे. “लोक काय म्हणतील?” ही तर सर्वात मोठी मानसिक गुलामगिरी आहे. तुमचं घर चालवायला, तुमचं आयुष्य घडवायला लोक येत नाहीत. तुमचे बरे वाईट निर्णय, त्याचे परिणाम ही तुमची जबाबदारी असते. आज अनेक युवा फक्त मार्कांच्या रॅट रेस मध्ये अडकले आहेत. वेगळ्या मार्गाने जायची स्वतंत्र मानसिकता तयार झाली नाहीये.

सवंग सोशल मीडियाचा विळखा तर संपूर्ण समाजाला बसलायं. जे दाखवतील ते पाहात राहायचं. त्याचं व्यसन लावून घ्यायचं. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींना मालिकांचे व्यसन लागलंय. याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच आहे. जे मनाला पटत नाही ते पाहायचं नाही इतका साधा निर्णयही आपण घेऊ शकत नाही.सोशल मिडीयाचा शिक्षणासाठी , व्यवसायासाठी खूप चांगला वापर होऊ शकतो. आणि असा सकारात्मक बदल होत ही आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. कारण सगळं जग एका बोटावर आलंय.

काल शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या आदरणीय श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी सांगितलं की तानाजीच्या मुलाचं लग्न असतं. तो म्हणू शकत होता,” लग्न उरकून दहा दिवसांनी येतो. कोंडाणा काय पळून चालला का?” पण नाही. महाराज सांगतात ना म्हणजे प्रमाण!  माझ्या मातृभूमीसाठी मी आधी. बाकी सगळं नंतर.. ही जाज्वल्य स्वतंत्र मानसिकता!  शिवाजी महाराजांचं जिजाऊ साहेबांवर निरतिशय प्रेम होतं. मातृभक्त होते ते. पण त्यांच्याही हस्ताक्षरात लिहिलेलं आहे.. आऊसाहेबांचं ऐकू नका. म्हणजे मातृभक्त असले तरीही योग्य अयोग्य काय याचा निर्णय घेण्याची स्वतंत्र मानसिकता त्यांची होती. म्हणूनच तर ते लोक कल्याणकारी, जाणता राजा होते. त्यानंतर असा राजा का झाला नाही हो ? याला आपली मानसिकता जबाबदार आहे ना!

मी वर म्हटल्याप्रमाणे “लोक काय म्हणतील?” ही मानसिक गुलामगिरी आहे.  मग स्वैर वागायचं का? तर अजिबातच नाही. आपल्या मनाला शिस्त लावायची. आज ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या सर्व युवक युवतींचे सगळा देश अभिनंदन करतोयं. केवढा अभिमान देशासाठी.. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून इथपर्यंत प्रवास केला असेल, केवळ स्वतंत्र मानसिकता होती म्हणूनच.

आपल्या कुटुंबियांना आपल्या निर्णयाचा, कृतीचा त्रास होणार नाही आणि आपली प्रगती होईल असे निर्णय घ्यायचे. जर तुमचे कुटुंबीय तुमच्या बरोबर असतील तर समाज काय म्हणतो याला फारसा अर्थ उरत नाही. एखाद्या क्षेत्रात तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर तुमचे कुटुंबीय नक्कीच तुमची साथ देतील. खुद्द तुम्ही योग्य मार्गावर चालत असताना काहीवेळा प्रगतीचा आलेख, यशाची पायरी यायला वेळ लागतो.

अशावेळी समाज नकारात्मक टोमणे मारु शकतो. तिथे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. स्वतंत्र मानसिकता म्हणजे कसेही वागणे नव्हे, तर आपण कुटुंबाचा, समाजाचा पर्यायाने देशाचा महत्त्वाचा घटक आहोत, ही जाणीव ठेवून स्वतःच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न, मेहनत करणे होय. आज समाज अत्यंत नकारात्मक, नैराश्यग्रस्त वातावरणातून जात आहे. अशावेळी संयमाने सकारात्मक विचाराने पुढे जायला हवं. कोणताही टोकाचा निर्णय घेता कामा नये.

आजही आपण नोकरी म्हणजे शाश्वती असे मानतो. पण स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी जास्त धडाडीने तरुणांनी पुढे आले पाहिजे. ही मानसिकता तयार व्हायला हवी.  आपली युवा पिढी भारताचे नेतृत्व करते. तिच्या हातात या देशाचे भवितव्य आहे. या पिढीची स्वतंत्र मानसिकता तयार करण्याची जबाबदारी आधीच्या पिढीवर आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावसायिक ज्ञान आणि मानसिक, भावनिक, वैचारिक व्यवस्थापनाचे धडे शाळेतून लहान वयातच मिळायला हवेत. तरच स्वतंत्र मानसिकतेचं वैयक्तिक आणि देशव्यापी स्वप्न साकार होईल.

आता यावरही नकारात्मक, राजकीय प्रतिक्रिया येतील. पण हा आपला विषय नाही. मला माझ्या मानसिकतेत काय बदल करता येतील जेणेकरून माझे आयुष्य सकारात्मक, यशस्वी, आनंदी जगता येईल हा प्रामुख्याने मुद्दा आहे. अशानेच समाज बनतो आणि देशही. मी माझ्यापुरतं असं न राहता समाजाची ही प्रगती होईल हा विचार म्हणजे स्वतंत्र मानसिकता. सारासार विचार करण्याची क्षमता म्हणजे स्वतंत्र मानसिकता.

आपलं शरीर हे परमेश्वराने बनवलेलं अतिशय चमत्कार पूर्ण, गुंतागुंतीचं, अचूक आणि सुंदर असे यंत्र आहे. आणि त्याला मनाची (शक्तीची) जोड दिली आहे. जर ही शक्ती आपण संपूर्णपणे, सकारात्मकतेने, योग्य प्रकारे उन्नतीसाठी वापरली तर आपले जीवन आनंदाने, यशस्वीतेने उजळून निघेल. आपण नेहमी यशस्वी होण्याचा विचार करतो. पण मी आनंदी आहे का? हा खरा विचार आहे. आनंदी मनाने जीवनात यशस्वी होणे ही खरी स्वतंत्र मानसिकता आहे. आणि तिचे फक्त स्वप्न बघू नका. आजपासूनच ही मानसिकता आचरणात आणा आणि बघा… आयुष्य सुंदर होते की नाही..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!