आपण पुष्कळदा अयशस्वी होऊ शकतो, मात्र हरू शकत नाही.
जागृती सारंग
जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे
आणि हरणं?
हरणं तर जंगलात राहतात…!
काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आलेलं हे प्रचंड सुंदर वाक्य आहे. अशी वाक्य मनात कोरून ठेवावीत. अशीच एक हरिवंशराय बच्चनजी यांची सुप्रसिद्ध कविता तुम्हा सर्वांना ठाऊक असेल…
लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती,
कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती।
तिन कडव्यांची कविता आणि प्रत्येक कडवं आयुष्य जगताना समजून घेतलं तर आणि तसंच वागण्याचा प्रयत्न केला तर जगणं सोपं जाईल.
जगातली कित्येक मोठमोठी माणसे सहज मोठी झालेली नाहीत. यशस्वी माणसांचं यश, धन संपत्ती त्यांचा सध्याचा झगमगाट न पाहता त्यांनी सुरूवात कशी केली हे आपण पहायला हवं, त्यांचा प्रवास पहायला हवा. पण सर्वचजणं फक्त यशाला श्रेय देतात. मोठमोठ्या माणसांचं सोडा बरीच माणसं अवतीभोवती असतात जी प्रचंड संघर्ष करून स्वतःला इतकी सक्षम बनवतात, धनवान बनवतात पण दुनिया फक्त त्यांच्या छानछौकी राहण्याकडेच पहात राहते. त्यांनी केलेला खडतर प्रवास जाणून घेण्यात कुणालाच रस नसतो.
हे यश प्रत्येकालाच मिळू शकतं फक्त गरज असते ती संयम आणि सोबत सतत प्रयत्न करत राहण्याची जिद्द. आयुष्य असो वा आयुष्य जगताना कुठलीही स्पर्धा असो ते जगताना खेळताना आपण आपलं सगळ्यात बेस्ट देणार आहोत अशाच आविर्भावात जगायचं, खेळायचं! मग हरलो तरी रडवेलं न होता, जिंकलेल्याची असूया न करता, आपण का हरलो, कुठे चुकलो, जिंकणाऱ्याने असं वेगळं काय केलं यावर अभ्यास करून, समजून घेऊन लगेचच पुढच्या तयारीला लागावं.
हे प्रत्येक गोष्टीत लागू पडते. म्हणजे बघा ना खेळ असो, परिक्षा असो, नोकरी असो किंवा अजून काही. गेल्या दोन वर्षांत बऱ्याच जणांनी आपले नोकरी व्यवसाय गमावले. नव्यानं सुरूवात करताना अजूनही अपयश येत आहे, कसंबसं सावरायचा प्रयत्न केला जातोय पण सारखी धडपडच सुरू आहे. हि धडपड करत असताना बरीच लोकं पूर्णपणे खचली ही आहेत इतकी की अगदी आत्महत्येचे विचारही मनाला हजारदा शिवून जात आहेत.
पण एवढंच लक्षात घ्यायला हवं कि हि वेळ कठिण आहे. ठिक होईल म्हणता म्हणता दोन वर्षे अशीच निघून गेली आहेत. कुणी कुटुंबच्या कुटुंब गमावलंय तर कुणी बायको, मुलं, नवरा, प्रियकर, प्रेयसी, नोकरी! सर्वच बाजुने प्रत्येकजण दुःखाच्या गर्तेत अडकला आहे. सगळं जरी गमावलेलं असलं तरीही आयुष्यात आपला आत्मविश्वास कधीच गमावता कामा नये. संत कबिरांनी त्यांच्या दोह्यांमधे म्हटलंय ना कि मन के हारे हार है मन के जिते जित। लाख संकटं येतील, कधी संकटांवर मात कराल तर कधी संकटं तुम्हाला हैराण करून सोडतील.
परंतू जर हे लक्षात घेतलं की आपण जे प्रयत्न करतोय त्यात कुठेतरी कमी पडतोय म्हणून आपल्या पदरी अपयश येत आहे. आपण हरत नाही कारण जिंकणाऱ्याने कदाचित जास्त प्रयत्न केलेले असतात किंवा कुठलीतरी ट्रिक वापरलेली असते. आपण हजार प्रयत्न करतो पण सतत अपयशी होतो. अजून हजार प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण आयुष्य हेच असतं.
रडणं, पडणं, धडपडणं, उभं राहणं, धावणं, हसणं, आधार शोधणं, आधार देणं, मधेच ठेच लागणं, पुन्हा रडणं, कुणीतरी सावरणं किंवा स्वतःच स्वतःला सावरणं हेच आपण लहानपणापासून करत आलेलो असतो. मग हजार प्रयत्न करतो तेव्हा कुठे आपण आईचं किंवा बाबांचं बोट धरून चालायला शिकतो ना! तसंच असतं आयुष्य सुद्धा!
लाख संकटं असतील तर लाख प्रयत्न करायलाच हवेत. संघर्ष कुणालाच टळलेला नाही. जो प्रयत्न करत राहतो तो एक दिवस नक्कीच जिंकतो. पण त्या जिंकण्यापूर्वी तुम्ही हजारवेळा हरलेले नसता तर हजार वेळा तुमच्या प्रयत्नांना अपयश आलेलं असतं. तुम्ही हरता तेव्हाच जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता.
हाच प्रकार असतो नाते संबंधांमध्ये सुद्धा! नात्यांमध्ये सुद्धा कुरबुरी होतात पण तिथेही नातं कसं टिकवता येईल, नात्यात कसा गोडवा निर्माण करता येईल याचे प्रयत्न करत रहावेत, अर्थात हे प्रयत्न दोघांकडून असायला हवेत.
कुणाच्या टोमण्यांकडे लक्ष न देता, जग काय म्हणेल मला इतकंही जमत नाही, किंवा माझं नशिबच भंगार, मला नाही जमत आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला असे एक ना अनेक नकारात्मक विचार मनात आणून खचून जाण्यापेक्षा मनात इतकंच म्हणावं “चल एक बार और ट्राय करते है” आणि प्रयत्न करत रहावेत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


