Skip to content

आपण नेमकं कुठं कमी पडतोय ….

कमी कुठेय?


सोनाली गायकवाड


इथे प्रत्येक जण सांगतोय रडा, भांडा, बोला. पण खरंच शक्य आहे का असं करणं? वेळ कुणाला आहे कुणाचं म्हणणं ऐकून घयायला. इथे प्रत्येकजण ‘व्यस्त आहोत आम्ही’, सांगण्यात व्यस्त आहे. बोललॊच कुणाजवळ तर समजून घेतंय का कुणी. की फालतू म्हणून सोडून देतोय.

काही गोष्टी स्पष्ट बोलताच येत नाहीत कुणाशी. कधी कुणाची तर कधी कशाची भीती असते. शिवाय आपलीच प्रतिमा जपायला निघालेला प्रत्येकजण ती ढासळू नये म्हणून अव्यक्तच असतो.

आत्महत्या करू नये हे खरंच पण कधी कधी कुणाला रोज मरावं लागतं. मरत मारत जगण कुणाला बरं आवडतं.

काही दुःख न बोलता येण्यासारखी असतात तर काही बोलूनही कुणी समजणार नसतं. व्यक्ती परत्वे त्याला वाटणाऱ्या गोष्टी, त्याची गुंतवणूक, त्याचा स्वभाव वेगळा असणार. एखाद्याला शुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्यासाठी भांडवल होते, कुणी कुणाची वर वर समजूत घातलीही तरी ऐकणाऱ्याला पटलंय ह्याची ग्वाही कोण घेणार.

वर वर शांत दिसणाऱ्या पाण्यातच खोल भोवरे असतात गिळंकृत करून टाकणारे. वादळ आलेलं सगळ्यांना दिसतं, पण निखळ शांत पाण्यातले भोवरे कुणी कसे ओळखावे. भोवऱ्यात अडकणाऱ्याला वर काढतांना स्वतःच गुरफटत जाणार नाही कशावरून.

कुणी कुणाला मदत करू शकत नसतं हेच खरं. आपली लढाई आपणच लढायची असते. त्यासाठी खम्बिर व्हावं लागतं. आलेल्या संकटावर मुसंडी मारून वर येता यायला हवं. लिहिणं आणि करणं ह्यात फार अंतर असतं म्हणून तर नुसते चांगले विचार लिहून वा ते वाचून होणार नसतं. रोज स्वतःला स्वतःशी जिंकता आलं की आयुष्य जिंकता येत.

आत्महत्येचा विचार एक नाही हजारदा आला तरी प्रत्येक वेळी त्यावर मात करता यायला हवी. गोष्टी आकलनापलीकडे गेल्या की मात करण्याची क्षमता कमी पडते. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो ही भावना बरेचदा स्वतःला संपवण्यास भाग पाडत असावी.

इतरांपेक्षा आपण कमजोर पडतो असे वाटू लागले की पराभव. आणि पराभव म्हंटल की पायउतार आपलाच आपणच केलेला. त्यावर मात करायला शिकायला हवं. आपण महत्वाचे हे स्वतःला पटवून द्यायला हवं.

नेमके तिथेच कमी पडतो का आपण?


Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *