आपण गेलेले दिवस मोजायला नाही तर उरलेले दिवस जगण्यासाठी आलोय.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
जन्म नी मृत्यू यामधील अंतर म्हणजे आयुष्य…!
कुणाच आयुष्य हे क्षणिक असतं तर कुणाच आयुष्य हे अगदी भरभरून असतं.कुणी चोवीस दिवस जगतं तर कुणी चोवीस वर्ष…!
ज्याला आयुष्यच कमी लाभलय त्याचं आपण काही करू शकत नाही.पण ज्यांना भरभरून आयुष्य लाभलय, जगायची संधी मिळाली आहे त्यांचा विचार आपण नक्कीच करू शकतो. कारण या धरतीवर अशी काही माणसं आहेत की ज्यांना आयुष्य भरभरून लाभलय पण ते आयुष्य असं जगतच नाही. आणि अशीही काही माणसं आहेत की जी कमी आयुष्यातही भरभरून जगतात.
पहा नं…कसं असतं ज्याच्याकडे कमी वेळ आहे तो अगदी भरभरून जगतो… आणि ज्याच्याकडे वेळ आहे , एक संधी आहे तो मात्र जगायचच सोडून देतो. सतत गेलेले दिवस मोजत बसतो.हा क्षण निसटून गेला , तो क्षण असाच गेला यावरच किती काळ विचार करत बसतो.उरलेलं आयुष्य केवळ गेलेले दिवस मोजण्यातच घालवतो.समोर उभं कितीतरी आयुष्य पडलेलं असतं पण ते जगायच आहे हे मात्र त्या गेलेल्या दिवसाच्या मोजणीमध्ये विसरून जातात ही माणसं.
एक एक क्षण महत्त्वाचा असतो पण तो क्षण हातातून अलगदपणे निघून जातोच.कुठल्याही क्षणांना आपण असं हातात पकडून ठेवू शकत नाही. आपण केवळ आठवणींमध्ये त्यांना कैद करू शकतो. येणारा प्रत्येक क्षण हा जाणार असतो. अगदी तसच दिवसामागून दिवस हे जातच असतात.पण म्हणून जाणारे/गेलेले दिवस असे मोजत बसायच का…? आपण काय केवळ हे उरणारे दिवस मोजायलाच इथे आलो आहोत का…? याचा जरासा विचार करणं आवश्यक आहे. काय आहे की या गोष्टींचा विचार केला नाही तर आपण जगायच सोडून जाणारे दिवसच मोजत बसू.
नवीन क्षण , नव्या आठवणी सजवायच्या असतील तर समोर पाहणं गरजेचं आहे. कारण काल काय घडलं यावर कायमस्वरूपी चर्चा करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने जगणं म्हणजे खरं जगणं आहे. नाहीतर गेला दिवस सतत मोजत बसायच म्हणजे काही खरं नाही. अशी मोजमाप केल्याने केवळ गेलेले दिवसच लक्षात राहतील. पण आपण किती दिवस जगलोय हे मात्र लक्षातही येणार नाही.
एक लक्षात ठेवा आपण हे गेलेले किंवा निघून जाणारे दिवस मोजायला इथे आलो नाहीत. गेलेले दिवस मोजण्यात कसला आलाय आनंद…? अहो , कित्येकांना जगायला आयुष्यच मिळत नाही. पण आपण मात्र आयुष्य मिळालय तर ते गेलेले दिवस मोजण्यात वाया घालवतोय.एक एक क्षण जगायचं सोडून गेलेल्या दिवसाच दुःख कवटाळून बसतो.पुढच आयुष्य, जगणं.किती सुंदर असू शकतं याची कल्पनाही करत नाही. ते उरलेलं आयुष्य हसतखेळत जगूयात असा विचार काही आपल्या मनात येत नाही.
पण तरीही सांगावसं वाटतं म्हणून… मित्रांनो आपलं आयुष्य म्हंटल तर क्षणभंगुर आणि म्हंटलं तर ते नक्की किती ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे पुढच्या सेकंदाला , पुढच्या क्षणाला काहीही होऊ शकतं.अगदी काहीही…!
आपल्याला वाटतं की सुख आज येईल ऊद्या येईल.. पण म्हणून आपण आत्ताचा क्षण जगायचाच नाही का…? कोणी सांगितलय पुढचे काही क्षण सुख आलच नाही तर….? गेलेले दिवस मोजण्यात , गेलेलं सुख मोजण्यात , आयुष्याच सुख वेचण्याच्या विचारात आपण उरलेलं जगायचही विसरतो.सांगता येत नाही नं…त्या उरलेल्या जगण्यातही सुख असू शकतं नं…?
अहो , संपलं चॉकलेट तर संपूद्या , किती संपले असा विचार करूच नका.याउलट किती चॉकलेट आवडीने, मिटक्या मारत खाल्ले हे आठवून पहा.ओठांवर एखादं मिश्कील असं हासू आल्याशिवाय राहणार नाही.
कारण एखादी गोष्ट हातून गेली किंवा संपून गेली तर आपण चेहरा पाडून बसतो.याला कारण कधी कधी आपली विचार करण्याची पद्धतही असते. जे केलय ते कधी आपण आठवून पाहत नाही. किंवा नवीन क्षण सजवायचा लवकर प्रयत्नही करत नाही. याउलट जे गेलय त्याच्यावर दिवसेंदिवस विचार करत बसतो.उरलेलं आयुष्य आपण गेलेल्या दिवसांप्रती अर्पण करतो.आणि मग जायची वेळ येते नी वाटतं उगाच विचार करत राहिलो..थोडं जगायला हवं होतं.
म्हणूनच म्हणते की… गेले दिवस तर जाऊद्यात… उरलं – सुरलं आयुष्य जगून घेऊयात…. कारण आयुष्य सुंदर आहे फक्त ते जगलं पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

