Skip to content

आपण कोणत्या ठिकाणी राहतो यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेत जगतो यावर आपली सुखं-दुःखं ठरत असतात..

आपण कोणत्या ठिकाणी राहतो यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेत जगतो यावर आपली सुखं-दुःखं ठरत असतात…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


ओंजळभर सुख असेल तरीही चालेल पण आभाळाएवढं दुःख नको रे बाबा….!!

खरतरं माणूस इतका समाधानी असता तर तो खरच खूप सुखी असता.पण त्याला तर ओंजळभर दुःखं आणि आभाळाएवढं सुख हवयं.खरतर त्याला दुःख नकोसच असतं.पण दुःख येतच राहणार हे माणसाला आत्ता कुठे कळून चुकलय.आयुष्य म्हणजे सुख-दुःखाने भरलेला डोह आहे ह्याची जाणीव आत्ता हळुहळू माणसाला होऊ लागली आहे.

पण अजूनही माणसाला त्याची सुखं-दुःखं , सुखं-दुःखाच्या व्याख्या काही ठरवता आल्या नाहीत. त्याची सुखं-दुःखाची मानसिकताच काही वेगळी आहे. अनेकदा माणूस त्याच्या सुख – दुःखाची वेगवेगळी कारणं देत असतो.कोणत्या ना कोणत्या “base” वर तो त्याची सुखं-दुःखं ठरवत असतो.पहा , अशी काही माणसं तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की पाहिली असणार किंवा तुम्ही स्वतः त्याचे अनुभवी पुतळे असणार यात शंकाच नाही.

“आम्ही राहतो तिथे फारशा सोयीसुविधा नाहीत , पाणीही बारिकच येतं नळाला ” , “अहो , काय सांगायच …इतकं मोठ्ठ घर पण काही उपयोगाच नाही… मोठ्ठ तर मोठ्ठ पण अस्वच्छ किती ते…नको वाटतं रहायला…” , “किती पसारा आहे या घरात , रोज आवरून आवरून विट आलाय अक्षरशः ….आयुष्य असच पसारा आवरण्यात चाललय..दुसरी काही कामच नाही वगैरे वगैरे…” हे अशाप्रकारच बोलणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलच असेल.”इथे राहतो , तिथे राहतो…, त्यांच घर किती प्रशस्त आहे…. चार माड्या , दोन वाडे…अहाहाहा….” काय सुख लोळण घालत असेल यार….कल्पनाही करू शकत नाही…” हे असं बोलणारेही आपण आपल्या आयुष्यात रोज पाहतो.

एखाद्या ठिकाणानुसार ,घरानुसार जर माणसाची सुख-दुःखाची व्याख्या ठरत असेल तर ही मानसिकता नक्कीच वेगळी आहे.अशा मानसिकतेमुळे सुख-दुःखाच्या कल्पनाच चुकीच्या ठरतील.आपली सुख-दुःखं एखाद्या ठिकाणावरून का ठरवावी…? आपली सुख-दुःखं तर आपल्याच हातात असतात.आपल्या मानसिकतेवर “depend” असतात.

कारण , अनेकदा कसं होतं तर…एखादं ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात , पक्षांच्या किलबिलाटात ,अगदी कितीही सुंदर असलं तरीही आपली मानसिकता तितकीच “फ्रेश” नसते.आपण सगळी जुनी-नवी दुःखं घेऊन आधीच वेगळ्या मानसिकतेत रमलेले असतो.पण उगाचच आपण त्या ठिकाणाला दोष देऊन मोकळे होते.एवढं सुंदर आहे पण काही नाही यार तिथे मन काही रमत नाही , बोर वाटतं सगळं , उदास नी निरस वाटतं….आपण हे अगदी सहज बोलून जातो.

Same place , different mentality….पहा, तेच ठिकाण पण मानसिकता मात्र वेगळी…यार किती सुंदर ठिकाण आहे, इथे आल्यावर तर सगळी दुःखं सहज विसरून गेलो मी.दुःखाचा जणू विसरच पडतोय इथे…! खरचं आयुष्य किती सुंदर आहे आणि आपण मात्र कण्हत कण्हत बसतो…

हे असं बोलणारी मानसिकता अगदी वरच्या मानसिकतेविरूद्ध. कधी कधी तर असही होतं , एखादं प्रशस्त घर असतं मात्र तिथे सतत पैशावरून , हिस्स्यावरून किंवा वेगवेगळ्या कारणावरून कोलाहल होत असतात.अशा कितीही प्रशस्त ठिकाणी सतत कोलाहल होत असेल तर तिथे सुख नांदणार तरी कसं…? अशी सततची कटकट , भांडणं यामुळे मानसिकता बिघडणारच.ठिकाण कसही कोणतही असुद्या पण आपली मानसिकता जर “Healthy” नसेल तर सुख कधीच तुमच्याकडे येणार नाही. किंवा ते आलं तरी तुम्हाला ते समजणार नाही.याउलट जर तुमची मानसिकता ही “Healthy” ,”Happy” असेल तर सुखाचे किरण स्वतःहून खिडकीतून तुमच्याकडे येतील.

ठिकाण छोटं असो वा मोठ्ठ, निसर्गाच्या सानिध्यात असो वा एखाद्या कोपऱ्यात….सुख आणि दुःखं हे केवळ आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं.आपण ज्या मानसिकतेत जगतो , वावरतो तिच मानसिकता आपल्या सुख-दुःखास कारणीभूत ठरते.

त्यामुळे एखाद्या अस्वच्छ ठिकाणी जरी गेलात तरी आपली मानसिकता आपण “निरोगी” ठेवायला हवी.जागा तर फक्त अस्वच्छ आहे. मी जागा स्वच्छ करू शकतो आणि इथे राहू शकतो , मला काहीच हरकत नाही. आपले विचार अस्वच्छ , मन अस्वच्छ असतं तेव्हा आपण काय ते फेकून देत नाही किंवा तिथे जाणही टाळत नाही… हा असा विचार करूनच कोणत्याही जागेत आपण आपली मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. आपली मानसिकता चांगली असेल तर आपण कुठेही सुखात राहू शकतो …. आणि आपली मानसिकता जर चांगली नसेल तर आपण कितीही सुंदर ठिकाणी मुळीच सुखी राहू शकत नाही हे प्रत्येकाने आपापल्या मनावर बिंबवलं पाहिजे.

एखाद्या ठिकाणावरून सुखं-दुःखं ठरविण्याऐवजी आपल्या मानसिकतेवरून सुखं-दुःखं ठरत असतात हे समजून-उमजून घेणं आवश्यक आहे.

पहा, एक दिवस अवश्य निरीक्षण करून पहा….आपण कोणत्या मानसिकतेत जगतोय हे तपासून पहा, आपल्या सुख-दुःखाला आपली मानसिकता जबाबदार ठरतेय की एखादं ठिकाण जबाबदार ठरतय हे एकदा तपासून पहाच…..आणि मग ठरवा आपल्याला काय करायच आणि काय करायच नाही….

जगात अगदी उलथापालथ होऊदे… पण आपली मानसिकता नेहमी “Healthy” ठेवण्याचा प्रयत्न करा.कारण आपल्या निरोगी मानसिकतेमुळे आपण इतरांची बिघडलेली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.सुखाच्या दिशेने एक पाऊल नक्कीच उचलू शकतो….बाकी आयुष्य सुंदर आहे… फक्त सुखं-दुःखं ठरवताना गल्लत करू नका…..हसत-खेळत मनसोक्त जगा…आणि जगूद्या…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपण कोणत्या ठिकाणी राहतो यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेत जगतो यावर आपली सुखं-दुःखं ठरत असतात..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!