आपण का सुधारत नाही ???
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ज्ञ)
आपण का सुधारत नाही..
जी गोष्ट सर्वात जास्त मनापासून हवी असते, त्याबद्दल आपण फक्त सर्वात जास्त अपेक्षा ठेवतो कि ती मला मिळाली तर… तर मी खूप नशीबवान असेल.. पण आपल्याला हे सुद्धा माहिती असतं.. जर ती मिळवण्यासाठी कृतीतून योग्य मेहनत घेतली तर गोष्ट हळू-हळू आपल्या जवळ येत जाते… नुसत्या अपेक्षा ठेऊन ती गोष्ट, वस्तू, व्यक्ती, आपल्यापासून हळू-हळू दुरावत जाते.. हे आपल्याला माहिती असतं तरी देखील आपण का सुधारत नाही…
आपण का सुधारत नाही…
प्रेम हे हट्टाने, लबाडीने, चलाखीने मिळवण्यापेक्षा, कुणालाही जबरदस्तीने आपल्या कोषात थांबण्याचा आग्रह करणे, कदाचित आपल्या कोषात तिला तो जिव्हाळा, प्रेम, प्रेरणा मिळत नसेल ज्याच्यातून ती इतर विरोधकांशी झगडू शकेल किंवा आपल्या कोशातच तिला असुरक्षित वाटत असेल तर…किंवा ते जसं आहे तसं स्वीकारण्यामध्येच सर्वात मोठं प्रेम दडलेलं आहे, हे आपण नाही स्वीकारत. पण आपल्याला हे सुद्धा माहिती असतं.. जर आपला कोषच आणखीन जास्त परिपक्व बनवला तर फक्त प्रेमच काय इतर गोष्टींसाठीही आपण आकर्षण बिंदू बनू शकतो… मग आपण का नाही सुधारत…
आपण का नाही सुधारत…
आपण सहज एका नर्व्हस मित्र-मत्रिणींची थट्टा करतो. तो कामात कशा चुका करतो, हे फुशारकीने सांगतो. आपल्याला माहिती असतं कि त्याला वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम आहे. त्यावर सुद्धा आपण ‘काय बायकोला घाबरतो, तुला जमत नसेल तर वेगळा हो’ अशी टिंगल टवाळी करतो.. कदाचित तुम्हाला एक कॉमेडी वातावरण करायचे असेल… पण यातून आपण आपला शेवट गोड करून निघून जातो.. तुमच्या कॉमेडीत टार्गेट करण्यापेक्षा त्यालाही सामावून घ्या ना , तुमच्याही घरातल्या काही तुरळक गोष्टी सर्वांसमोर कॉमेडीने सांगा ना… त्या नर्व्हस व्यक्तींचाही शेवट गोड होऊ द्या ना… असं केल्याने काय बदल होईल हे सगळं आपल्याला माहिती असतं, तरी मग आपण का नाही सुधारत…
आपण का नाही सुधारत…
कधी-कधी आपल्याला भावना व्यक्त करण्याची गरज वाटते. कोणाशीतरी भरभरून बोलावसं वाटतं. कारण कित्येक दिवसांपासून साचलेला गुंता आता आणखीन कठोर होत असतो.. आणि असं ही नाही कि सभोवताली समजून घेणाऱ्या, आपल्याला ऐकणाऱ्या व्यक्ती नसतात. पण आपलीच त्या गुंत्यातील एक नस अशी सांगते कि सभोवताली आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही…त्या नसवर आपण इतका विश्वास ठेवतो कि आपलीच माणसं परकी वाटायला लागतात. तीच नस कशाला… अशा असंख्य नसांचे गुंते आपण आपल्याच गैरसमजुतीने, चुकीच्या विचार पद्धतीने आणि संकुचित जीवनशैलीने वाढवलेले असतात. हे सुद्धा आपल्याला जाणवतं… तरी मग आपण का नाही सुधारत..
आपण का नाही सुधारत…
आपला काटेकोर स्वभाव हा दुसऱ्यांना त्रास देतोय. आजपर्यंत आपल्यासमोर कोणीही ब्र काढला नाही. आपल्याशी बोलताना घरातल्या लोकांची बोबडी वळते आणि हे आपल्याला कमालीचे वाटते. आपलं कुटुंब एका योग्य दिशेला जात आहे, असं आपल्याला वाटतं. पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळालेली स्पेस, विचार मांडण्याची मिळालेली मोकळीक आणि आपापले निर्णय घेण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य हे सगळं काही आपल्या कुटुंबाला एका वेगळ्याच वैचारिक उंचीवर अद्याप घेऊन गेलं असतं.. सतत दबलेली लोकं, अतिशय शांत लोकं, फार न हसणारी लोकं ही काही उत्तम कुटुंब रचना नाही… हे सर्वांगाने कठोरता असणाऱ्या मनाच्या एका कोपऱ्याला पटत असतं, जाणवत असतं… तरी मग आपण का नाही सुधारत…
आपण का नाही सुधारत..
समोरच्याला वाईट वाटेल म्हणून आपण पुष्कळदा बोलायचं टाळतो. हा नियम इतर व्यक्तीबद्दल एकवेळेस लागू होऊ शकतो. परंतु अशी व्यक्ती जी आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे.. रोज कुठूनतरी समोरासमोर होणार आहे, एकमेकांना दिसणार आहे… अशांना वाईट वाटेल, घरातील वातावरण बिघडेल म्हणून आपण अनेकदा शांत राहिलेले असतो. पण खरंतर एकप्रकारे त्यांच्या या चुकीच्या तत्वांना आपल्याकडून नकळतपणे आणखीन खतपाणी मिळत असते. कधीतरी सुरुवातीलाच योग्य उपाय करता येऊ शकला असता.. पण आता मात्र आपल्यालाच प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची सवय लागलेली असते. आणि विशेष म्हणजे आपण या समजून घेण्याला आयुष्य मानलेलं असतं. कधीतरी हे मानलेलं आयुष्य आपलं नाही एक चांगलं जाणवतं….मग तरीही आपण का सुधारत नाही…
आपण अजून पर्यंत का सुधारत नाही…
???
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
