Skip to content

आपण एकमेकांना समजून घेऊन पुढे का चालू शकत नाही…??

आपण एकमेकांना समजून घेऊन पुढे का चालू शकत नाही…??


हर्षदा नंदकुमार पिंपळे


आदिती आणि सारंग म्हणजे सोसायटीमधील सगळ्यांचीच आवडती जोडी.त्या दोघांवर सोसायटीतील सगळ्यांचा जीव होता. दोघांच फार छान जुळलं होतं.आणि त्यांच अगदी मस्त जमतही होतं.जणू काय खऱ्या आयुष्यातील ते टॉम अँड जेरीच होते.खूप भांडायचे,मस्ती करायचे , अगदी पोट दुखेपर्यंत ते डोळ्यातून पाणी येईपर्यंत ते हसायचे.

नात्यातील हवाहवासा ओलावा त्यांच्या नात्यामध्ये अगदी भरभरून होता.पण अचानक त्या दोघांमध्ये काही अशा गोष्टी घडल्या की त्यांच्या नात्यातील ओलावा कायमचा निघून गेला. त्यांच नातं एखाद्या ऊन्हातल्या कोरड्या खडकाप्रमाणेच कोरडं पडलं.त्याला कधीतरी मायेचा पाझर फुटेल असं सगळ्यांना वाटायचं. पण प्रत्यक्षात त्यांच्या या नात्याला कधी पाझरच फुटला नाही.

पहा, नात्यांची विण विणली गेली तर खूप सुंदर- सुबक – नाजूक नी तितकीच घनिष्ठ असते. त्या नात्यात असतो तो ओलावा प्रेमाचा , मायेचा , आपुलकीचा. आणि हा ओलावाच नात्यांना टिकवून ठेवतो.नाहीतर नात्यांचा किनारा अगदी कोरडाठक्क पडतो.

नात्यात दुरावा तर येतोच पण कधी कधी काय होतं तर हा दुरावा संपतच नाही. नात्यातील एकही जण समजून घ्यायला तयार नसतो.किंवा मग अनेकदा असही होतं की एकजण समजून घ्यायला तयार असतो पण दुसरा मात्र त्यालाही राजी नसतो.अशावेळी खरच काय करावं कळतही नाही.

नात्यातील समजुतदारपणा त्यावेळी कुठे दडून बसलेला असतो काही एक उमजत नाही.समजून घेऊन पुढे ते जातच नाहीत. एकाच ठिकाणी अडून बसतात. घुटमळत बसतात. आपण एकमेकांना समजून घेऊन पुढे जाऊ शकतो की नाही किंवा पुढे का जाऊ शकत नाही या प्रश्नांची उत्तरही त्यांच्याकडे बहुधा नसतातच. खरतर त्यांना काय चाललय हे केवळ समजत राहतं परंतु उमजत मात्र नाही.

कदाचित यामागे नक्कीच काही ना काही कारणं असू शकतात. मुळातच अनेकदा कितीतरी नात्यात गोष्टी इतक्या टोकाला जातात की त्या हाताळण जरा अवघडच जातं. समज – गैरसमज यांची होणारी गुंतागुंत याला कुठेतरी कारणीभूत ठरते. नात्यांचा पूर्व गाभा कितीही सुंदर असला तरीही त्यात जेव्हा अडीअडचणी निर्माण होतात तेव्हा बऱ्याचवेळा त्या नात्याला तडा जाण्याचीच शक्यता अधिक असते.

त्यामुळे त्याला एकदा का तडा गेला तर त्याच नात्याविषयी मनात कटूता निर्माण होते.आत्ता मला आधीसारख काही वाटत नाही असं बोलून आपण मोकळे होतो.मनात घोंगड भिजत असेल तरी आपण त्याला बाहेर काढत नाही. गैरसमजाची साखळी ईतकी लांबलचक झालेली असते की ती तोडणं सहजासहजी कुणाला शक्य होत नाही.आणि मुळातच त्यावेळी आपल्या मनाची मानसिकता ही सुदृढ नसते.आपली मानसिकता ही पूर्णपणे बदललेली असते.

पूर्वावस्थेपेक्षा आपली अवस्था ही काही अंशी का होईना बदलेली असते.त्यामुळे असं समजून उमजून घेण्याची तेव्हा काही मानसिकताच नसते.इतकच नाही तर आपल्या मनात कुठेतरी ही भीतीही असते की “पुन्हा असं होणार नाही कशावरून…?” , आणि असं झालं तर वगैरे वगैरे शंका कुशंका मनात कळत नकळतपणे घर करून बसलेल्या असतात.

नाहीतर मग कधी कधी तर मनातून खरच इच्छा नसते एकमेकांना समजून घ्यायची,पुन्हा नाती जोडण्याची.मुळातच गैरसमज ही एकमेव विषारी गोष्टी आहे की ती प्रत्येक नात्यात कडवटपणा आणते.आणि एकदा का गैरसमज वादविवाद झाले की त्या व्यक्तीवरून मन उडून जातं. पुन्हा तेच वादविवाद होतील या भीतीने कधी ते समजून घेऊन पुढे जातच नाहीत. किंबहूना कोणतीही ‘risk’ नको म्हणून तसा विचार करायलाही त्यांच मन कचरत राहतं.

इतकच नाही तर एकमेकांना समजून घेऊन घेऊन शरीर आणि मन दोन्ही दमलेल असतं.त्यामुळे पुन्हा नव्याने काही करायची ताकद तेव्हा मात्र उरलेली नसते.झालं तेवढं आता बस् झालं , जितका त्रास झाला तितका खूप झाला …आता माझं आयुष्य मला स्वतंत्रपणे जगायचय….. असा विचार करणारेही अनेकजण आहेत. कित्येकांना पुन्हा गुंतण्यापेक्षा काही काळापुरती तरी स्वतःची अशी एक स्पेस हवी असते.

अशीच काहीशी कारणं असतात ज्यामुळे एकमेकांना कितीही समजून घेऊन आपण पुढे चालू शकत नाही.

पण तरीही कधी काय होऊ शकतं हे आपण इतक्या जाणीवपूर्वक आणि खात्रीने कधी सहसा सांगू शकत नाही. तसं पहायला गेलं तर कितीतरी नाती समजून घेऊन पुढे जाऊ शकतात. पण हा ज्याचा त्याचा स्वतंत्र निर्णय असतो.शेवटी आयुष्य त्यांच असतं.कुणावरही आपण जबरदस्ती करू शकत नाही. आणि जबरदस्तीच्या ओझ्याखाली दबलेल नातं कधीच मोकळेपणाने खुलत नाही. त्यामुळे मोकळ्या मर्यादांच अंगण नात्यांसाठी एकदा खुलं करून पहा…आणि नात्यातील विण तुटणार नाही याची काळजी घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!