Skip to content

आपण इतरांसाठी स्पेशल असण्यापेक्षा स्वतःसाठी स्पेशल असावं, तेही नम्रपणे..!

आपण इतरांसाठी स्पेशल असण्यापेक्षा स्वतःसाठी स्पेशल असावं, तेही नम्रपणे..!


हर्षदा नंदकुमार पिंपळे


You’re so special to me in every way…..!

हे वाक्य ऐकण्यासाठी किंवा इतरांना सांगण्यासाठी आपलं मन आतुर झालेलं असतं.हे वाक्य साधं कानावर जरी पडलं तरी गालावरच्या खळा क्षणार्धात खुलतात.आनंदाची फुलपाखरं पोटामध्ये भिरभिरत लागतात. मनाला वेगळ्याच गुदगुल्या होतात.पण म्हणजे आपण इतरांसाठी स्पेशल असावं असं आपल्याला वाटतं.

पण आपणच आपल्यासाठी स्पेशल असावं असं आपल्याला सहसा वाटत नाही.खरच आपण स्वतःसाठी स्पेशल असावं असं इथे किती जणांना वाटतं….? कदाचित मोजकेच असतील की ज्यांना वाटतं की इतरांबरोबर आपण स्वतःही स्वतःसाठी स्पेशल असावं.

खरच असं कुणाला वाटत नाही का…की इतरांनी तु खूप स्पेशल आहेस असं आपल्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतःलाच स्वतः किती स्पेशल आहोत ते सांगावं…? का नेहमीच इतरांनी आपल्याला स्पेशल म्हणावं अशी अपेक्षा करायची…?

इतरांसाठी स्पेशल असण्यापेक्षा स्वतःसाठी जरा स्पेशल होऊयात नं…!

कुणीतरी येण्याची नेहमीच वाट पहायची का..? ” तु मोकळ्या केसात छान दिसतेस….तु ब्लॅक शर्टमध्ये जास्त छान दिसतोस…आणि…. यु नो….
You have no idea how much you are special to me…..You are just amazing यार……” असं कुणीतरी येऊन आपल्याला बोलेल याची आपण अगदी तन्मयतेने वाट पाहतो. पण खरच आपण इतरांसाठी स्पेशल आहोत असा गाढ विश्वास तरी कसा असतो आपल्याला…?

आपल्यासाठी कोण स्पेशल आहे आणि कोण नाही हे आपण सहज सांगू शकतो.पण कुणासाठी आपण स्पेशल आहोत आणि कुणासाठी नाही याचा अंदाज आपल्याला मुळातच नसतो.आपण ते असं सहजासहजी सांगूच शकत नाही. इतरांसाठी स्पेशल असलो – नसलो तरी आपण आपल्या स्वतःसाठी काय आहोत याचाही एकदा विचार करणं आवश्यक आहे.

कारण अनेकदा कुणीतरी आपल्याला स्पेशल म्हणून बघेल , आपल्यासाठी इतरांच्या मनात काही स्पेशल अशी जागा असेल असा विचार करण्यातच आपण कितीतरी वेळ खर्च करतो.उगाचच डोळ्यात प्राण आणून प्रतिक्षा करत राहतो.पण मग या सगळ्यामध्ये स्वतःकडे एकदाही पहावसं वाटत नाही का…? आपण स्वतःही स्वतःसाठी स्पेशल आहोत अशी भावना मनात रेंगाळत नाही का…?

खरं तर या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्याला माहीत… म्हणूनच थोडासा विचार करा…..स्वतःविषयी… स्वतःच्या स्पेशल असण्याबद्दल….

कधीतरी आरशात पाहून स्वतःच स्वतःला सांगा किती सुंदर आहोत आपण…! आपलं हसणं ,नटणं मुरडणं….एकदा स्वतःच स्वतःच्या डोळ्यांनी न्याहाळायचा प्रयत्न करा.”हे हे…तो म्हणाला खरं की मोकळे केस छान दिसतात मला….पण मला तर केस वरती बांधलेले जास्त छान वाटतात.” असं म्हणून खरच स्वतःच्या अंतरंगात काय दडलय हे नक्की शोधून काढा.

कारण अनेकदा इतरांसाठी आपण बरच काही करतो पण स्वतःला काही आवडत असेल तर त्याचा क्षणभरही विचार न करता त्याग करतो. असा सारखा सारखा त्याग….कशासाठी…? कधीतरी स्वतःला काय हवय ते पाहूयात नं…? स्वतःची प्रत्येक वेळी घुसमट होऊ दिली तर कसं चालेल…? कोणत्या ना कोणत्या मार्गाने कधीतरी व्यक्त व्हायला हवं नं….

स्वतःला काय हवं नी काय नको हेही पहायला हवं….इतरांसाठी आपण अनेक गोष्टींचा त्याग करतो.का तर ते आपल्यासाठी स्पेशल आहेत म्हणून…. पण मग स्वतःच काय…? स्वतःतही अशा काही गोष्टी असतात ज्या खरच खूप स्पेशल असतात. स्वतःसाठीच….! पण आपण कधी त्याकडे कधी लक्षच देत नाही. स्वतः स्वतःसाठी स्पेशल असावं असं आपल्याला मुळी वाटतच नाही.आपण आपली काळजी कधी एखाद्या विशेष व्यक्तीसारखी घेतच नाही.

स्वतःला काय हवं नी काय नको पाहतच नाही. इतरांसाठी कायम धडपडत राहतो पण स्वतःसाठी धडपडायला विसरतो.एकदा विचार करून पहा…आपण किती नी काय काय करतो.इतरांसाठी कशाचीही तमा न बाळगता आपले दोन्ही हात पुढे करतो.रडतो ,हसतो ,अडखळतो..पुन्हा नव्याने सावरतो….अशा या स्वतःच्या वागण्याचा आपल्याला खरच थोडातरी अभिमान हवा.आपण आपल्या स्वतःसाठीही स्पेशल असावं.अगदी नम्रपणे…! इतरांसाठी आपण जसे स्पेशल आहोत तसेच आपण आपल्यासाठी आहोत हे लक्षात ठेवा. आरशात पाहून एकदा मोठ्ठ्याने सांगा….”You are so special dear…”

चला स्वतःसाठी थोडं स्पेशल होऊयात… आपणही स्वतःसाठी स्पेशल आहोत याची स्वतःला जाणीव करून देऊयात….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!