Skip to content

आनंद टिकून ठेवण्यासाठी आपण कोणकोणते गुण अंगी बाणवू शकतो?

आनंद टिकून ठेवण्यासाठी आपण कोणकोणते गुण अंगी बाणवू शकतो?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणते गुण अंगी बाणवू शकतो हे आपण नक्कीच पाहू. पण त्या आधी, सगळ्यात महत्वाच्या एका गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊ. ती म्हणजे आयुष्यात आनंद आणि दुःख येत राहणार हे आपल्या सगळ्यांनाच मान्य आहे. पण आनंद आल्यावर तेवढ्यापुरताच साजरा करून, दुःख आल्यावर मात्र आनंद विसरून ते दुःख आपण सहन करत असतो.

पण परत एकदा आनंदाचा क्षण आल्यावर आपण ते दुःख विसरून लगेच आनंद साजरा करणं आपल्याला होत नाही. शेवटी आपण माणूस आहोत, इतक्या सहजतेने दुःख विसरणं आपल्याला शक्य होणार नाही. पण एक मात्र गोष्ट करणं आपण सोडूनच द्यायला हवं. ते म्हणजे प्रत्येक माणूस दुःख आल्यावर त्यापासून पळण्याचा किंवा ते दुःख टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी अटळ असल्याने आपल्याला काहीही टाळणं शक्य होत नाही. त्यामुळेच तसा प्रयत्न ही न करता माणसाने सुख असो वा दुःख त्याचा मनापासून स्वीकार करावा. दुःखाचा स्वीकार करणे हा ही आनंद टिकवण्यासाठी एक महत्वाचा गुणच आहे.
आता आपण आनंदाविषयी बोलूयात.

सगळ्यात आधी आनंद ही आतून येणारी भावना आहे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे बाहेरील परिस्थिती नेहमीच आनंद देऊ शकेल याची खात्री देता येत नाही. त्यासाठी आतून आनंदी वाटणे महत्वाचे असते. बाहेरील परिस्थिती बदललेली असता काही वेळेपुरता आनंद मिळणं होऊ शकत.

पण तो आनंद टिकवायचा झाल्यास त्यासाठी मन शांत असणं गरजेचं ठरत. पण नेहमीनेहमी असं आनंद देऊन जाईल असं काही घडेलच असं सांगता येत नाही. पण त्यापेक्षा कसल्याही कारणाशिवाय जर आपलं मन शांत, प्रसन्न आणि आनंदी असेल तर हा आनंद आपला चिरकाल टिकेल.

पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी सातत्याने कराव्या लागतील. प्रत्येकाचा आनंद वेगळा असू शकतो, म्हणजे जस काहींना आपली स्वप्न पूर्ण करताना आनंद मिळतो, तसा काहींना आपली माणसे, मित्र , कुटुंब, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ घालवून आनंद मिळतो. तर काहींना आपलं स्वातंत्र्य यामध्ये आनंद मिळतो. आता जे गुण आपल्याला आनंद टिकवायला मदत करतील असे काही गुण, किंवा सवयी लावून घेण्याचा आपण प्रयत्न करू.

१. आपण आनंदी असलो की आपण हसतो, स्माईल करतो. पण स्माईल केल्याने सुद्धा dopamine release होऊन आपण आनंदी होत असतो. दिवसाची सुरुवात स्वतःला आरशात बघून स्माईल करताना करून पहा. आनंदी होण्यासाठी खोटं हसण्याची तुम्हाला गरज नाही. पण नाराज असताना एकदा स्माईल करून बघण्याचा प्रयोग नक्की करून पहा.

२. रोज व्यायाम करा. व्यायामाने फक्त शरीर तंदुरुस्त राहायला मदत होत नसून त्याने सेल्फ-कॉन्फिडन्स वाढायला, स्ट्रेस कमी व्हायला सुद्धा मदत होते ज्याने आपला आनंद टिकण्यासाठीच एक प्रकारे मदत होत असते. कारण नकारात्मक भावनांचं प्रमाण जेवढं कमी राहील तेवढा आनंद टिकण्याची शक्यता वाढते.

त्यासाठी तुम्हाला खूप हेवी workout करण्याची गरज नसते. थोड्या प्रमाणात किंवा हलक्या व्यायामाने सुद्धा फायदा होऊ शकतो. जस की, जेवणानंतरची शतपावली, सकाळचं मॉर्निंग वॉक. यामध्ये तुम्हाला मजा येणाऱ्या activities तुम्ही करू शकता.

३.पुरेशी झोप, ही या ठिकाणी खूप महत्वाचा भाग पार पडते. रोज एकाच वेळेला झोपा आणि सकाळी एकाच वेळेला उठा. जरी सुट्टीचा दिवस असला तरी काही दिवस तशी सवय लावून घ्या. आपण किती तास झोपतो, आणि त्यानंतर आपल्याला झोप झाल्यासारखं किंवा फ्रेश वाटत का, याकडे लक्ष द्या. झोपण्याआधी काही वेळ वाचनात, किंवा शांततेत घालवा. जास्त जेवणे,किंवा अल्कोहोल घेणं टाळा.

४. आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल, निरोगी आयुष्य , जवळची प्रेमळ माणसं, अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ठेवून त्यासाठी कृतज्ञतेची भावना मनात असल्याने सुद्धा एक प्रकारचा आनंद मनात जाणवतो. मागे झालेल्या एका research नुसार, रोज आपल्याला मिळालेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता मनात आणून आभार मानण्याची एक कृती आंतरिक आनंद आणि आशा निर्माण करत असते.

याव्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत ज्या तुमचा आनंद टिकवूही शकतात आणि नव्याने आनंद देऊ ही शकतात, जसे की, मित्रांसोबत वेळ घालवणे, एक डायरी बनवून आपलं दैनंदिन जीवन त्यात लिहिणे, स्ट्रेस वाल्या गोष्टींना पुढे न ढकलता त्यांचा सामना करून ते तिथेच संपवणे, मेडिटेशन करणे, निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवणे, मनात दयेचे भाव ठेवून वागणे, नम्रपणे एखाद्याची खरी स्तुती करणे, स्वतःची काळजी घेण्यात काही वेळ घालवणे, आपल्या आयुष्यातले वाईट क्षण काही वेळ अनुभवून मग स्वतःच लक्ष इतर गोष्टींमध्ये वळवा. पण काही वेळेसाठी तरी ते क्षण ही अनुभवनं गरजेचं आहे, त्यापासून पळू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!