आनंद आणि नैतिकतेला वास्तवाची जोड पण असावी लागते तर जीवन सोप होईल.
काव्या गगनग्रास
दोन भाऊ होते. आनंद आणि नैतिक. जरी भाऊ असले तरी दोघांचेही विचार, वागणं, स्वभाव वेगवेगळे. आता विचारच वेगळे म्हटल्यावर मतभेद हे होणार. तरी यात कधी नैतिक वरचढ व्हायचा तर कधी आनंद. त्याचं साधं बोलण म्हणजे पण वादविवाद स्पर्धा वाटायची. आता वाद व्हायचे कशावरून? तर कोणत्याही गोष्टीवरून. आणि अश्या गोष्टी जिथे विशेष करून निर्णय घ्यावा लागत असे.
समजा एखादी गोष्ट खायची इच्छा झाली आहे. समोर पाणी पुरीचा गाडा आहे. पण समस्या अशी की दोघांकडेही पैसे नाहीत. इथे आनंद म्हणायचा, अरे काय त्यात इतकं? आपल्याकडे पैसे नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे. त्या गाडे वाल्याला थोडीच माहीत आहे. आपण एक काम करू पटापट खाऊन घेऊ. तशीही तिथे खूप गर्दी आहे. त्याला काय समजणारे? पटकन खायचं आणि लगेच सटकायच.
हे ऐकुन नैतिकला राग यायचा. तो म्हणायचा, अरे तुला काहीच कसं वाटत नाही. तो माणूस कष्ट करतोय. काहीतरी काम करून मिळवतोय आणि आपण आपल्याला वाटत म्हणून त्याला फसवयाच का? मला हे मुळीच पटत नाही, मी अस करणार पण नाही आणि तुलाही करू देणार नाही. अश्या या बोलण्यातून त्यांची वादावादी सुरू होत असे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे एक कोणतरी वरचढ होत असे. म्हणजेच एकतर आनंद म्हणायचा तास वागावं लागे किंवा नैतिक ला वाटत तस वागावं लागे. पण यात हाती नाराजीच येत होती कारण इथे समेट किंवा सुवर्णमध्य असा नसायचाच.
जी गोष्ट खण्याबाबत तीच बाकीच्या इतर गोष्टीमध्ये होती. दोघांची मते दोन टोकांची. रस्त्यावर पैसे पडले तर नैतिक म्हणणार त्याच काहीही होऊदे आपण पुढे जायचं, याउलट आनंद आपण काय चोरी करतोय का? दिसले तर घ्यायचे त्यात काय इतकं? या अश्या गोष्टींमधून सतत त्यांच्यामध्ये वाद.
पण आताचा वाद मात्र बाकीच्या गोष्टींपेक्षा खूप वेगळा होता. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न होता ज्याचावर वेळेवर मार्ग नाही काढला तर खूप मोठं नुकसान झालं असत. गोष्ट अशी होती की नैतिक आणि आनंद यांच्या बाबांचा अपघात झाला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होत. अपघात खूप मोठा झाला असल्याने दुखापत पण खूप झाली होती. म्हणून डॉक्टर ने ऑपरेशन करायला सांगितले होते. त्यासाठी खूप खर्च लागणार होता. पण तेवढे पैसे या दोघांकडेही नव्हते.
सर्व इतक्या घाईगडबडीत झालं की त्यांनी कोणाला काही सांगितलं देखील नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना यातील काही माहिती नव्हती. आणि आता इतका खर्च सांगितल्यावर त्यांना पण काही समजेना की नेमके करायचं काय? डॉक्टर नी एक दोन दिवसाची मुदत दिली होती त्यात निर्णय घ्यायचा होता. पैसे आणायचे कुठून हा प्रश्न होताच. पण त्यातही यांचे विचार परत आडवे येत होते.
आनंदला गरजेच्या वेळी काहीही केलं तरी योग्यच वाटतं होत. त्याच म्हणणं आपलं काम पूर्ण झालं पाहिजे.परिणाम नंतरची गोष्ट. पण नैतिक मात्र हे अजिबात मान्य करत नसे. जे समाजमान्य आहे, जे मूल्यांना, आदर्शांना धरून असेल ते करावं आणि तसच वागावं. भलेही आपलं यात नुकसान का होईना. पण या ठिकाणी ह वाद योग्य नव्हता कारण वेळ कमी होता.
बाबांच ऑपरेशन खूप महत्त्वाचं होत. त्यांचं बोलणं चालू होत तेव्हढ्यात आनंदला आठवल की बाबांच्या एका मित्राने त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी पैसे, काही दागिने ठेवायला दिले होते. ती लोक बाहेर जाणार होती आणि इतकं सर्व घरात ठेवून जाणं त्यांना योग्य वाटत नव्हत. यांचे बाबा त्यांच्या खूप विश्वासातले होते म्हणून त्यांनी ती रक्कम ठेवायला दिली होती.
आनंद ने असा विचार केला की आपण तेच पैसे ऑपरेशन साठी वापरायचे. त्याने ह विचार बोलून दाखवला तोच नैतिक त्याच्यावर भडकला. समोरच्याने इतक्या विश्वासाने काहीतरी दिलेले असताना आपण त्यांच्या विश्वासघात करायचं असं तुला वाटतच कसं? आपण असं काही केलं तर बाबा बरे होतील पण त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो निघून जाईल तोही आपल्यामुळे. त्यामुळे मला हे चोरी करण अजिबात मान्य नाही. तू काही करू नको मी माझ्या परीने प्रयत्न करतो. माझे कामाचे साठवतो, बॉसशी बोलतो पण तू असल काहीही करणार नाहीस. परत नेहमीप्रमाणे ते भांडायला लागले.
तेवढ्यात तिथे त्यांचा एक मित्र आला. यांच्या आईने त्याला बोलवून घेतले होते. एक तोच होता जो यांना व्यवस्थित हाताळू शकत असे. त्यांच्या भांडणातून काहीतरी मार्ग काढू शकत असे. अर्थात काही वेळा त्याचा नाईलाज होई. पण तो पूर्ण प्रयत्न मात्र करायचा. त्याच नाव होत वास्तव.
नावाप्रमाणेच त्याचे विचार होते. त्यांचं म्हणणं एकच. पूर्णपणे दोन टोकं गाठून आपण आपलं नुकसान करून घेत असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त आपलाच विचार करून काहीतरी करणे आणि अगदीच ताठर होऊन एखादा निर्णय घेणे दोन्ही गोष्टी नुकसान करतात. काही वेळा त्या परिस्थितीला धरून, पुढच्या परिणामाचा विचार करून आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तवाला धरून निर्णय घेतला पाहिजे. ज्यातून आपलं काम पण होईल आणि नुकसान पण होणार नाही. अशी सदसद्ववेकबुद्धी वापरली तर समस्या कमी होतात.
आताही तो अगदी वेळेवर आला होता. त्याला ठाऊक होते की यांचा वाद मिटणार नाही आणि मिटला तरी येणारा निर्णय एकतर्फी होणार आणि काहीतरी समस्या निर्माण करणार. तो त्यांच्याजवळ गेला व त्यांना गप्प करून म्हणाला, हे बघा तुमचं दोघांचं म्हणणं मी खोडून काढणार नाही. आनंद तुला तुझे बाबा बरे व्हायला हवेत म्हणून तू अस म्हणतोस हे मला पटतय आणि नैतिकला जे वाटत तेही मी मान्य करतो. एखाद्याचा विश्वास तोडण बरोबर नाही. पण आता परिस्थिती काय आहे? आपल्याकडे इतका वेळ आहे का? म्हणूनच आपण असा मार्ग काढू ज्यातून बाबा लवकरात लवकर बरे होऊ शकतील. ते दोघं म्हणाले, तूच आता सांग आम्ही काय करायचे?
त्यावर वास्तव म्हणाला, तुम्ही बाबांना भरती केलं हे कोणाला सांगितलं का? त्यावर ते दोघंही नाही म्हणाले. आम्हाला वेळही मिळाला नाही आणि सुचलं ही नाही. नैतिक. त्यावर वास्तव म्हणाला, मग आता मी सांगतो तस करा. नातेवाईकांना सर्व परिस्थिती, पैश्याची गरज सर्व सांगा. मी तुमच्या काकांना वगैरे भेटलो आहे. तुम्हाला पण माहित आहे ते नक्की मदत करतील. त्यावर पण नैतिक चे म्हणणं होत अरे ते आमचे सख्खे काका नाहीत, आणि इतकी रक्कम कशी मागायची. मी कधी कोणासमोर हात पसरले नाहीत.
वास्तव म्हणाला, अरे मदत मागणं हे काही कमीपणा नाही. आणि आनंद म्हणतो तस इथे आपण काही चोरी करतोय का? नाही. तुमच्या कडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही परत करा. पण आता या वेळी जर बाबांचा ऑपरेशन व्हायला हवं असेल तर तुम्हाला कोणाचीतरी मदत घ्यावीच लागेल. आणि आपण आपल्या माणसाकडे मदत नाही मागणार तर कोणाकडे मागणार. दोघांनी ही विचार केला व वास्तवच म्हणणं मान्य केलं. त्याप्रमाणे त्यांनी नातेवाइकांना सर्व परिस्थिती सांगितली व वास्तव म्हणाल्याप्रमाणे त्यांना मदत पण मिळाली. जी आधीच मिळाली असती जर यांनी वाद न घालता त्यांना आधी कळवल असत तर. अश्या पद्धतीने बाबांचं वेळेवर ऑपरेशन झालं आणि ते मोठ्या संकटातून वाचले.
तर ही होती या तिघांची गोष्ट. आपण जरासा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की दोन भाऊ आणि त्यांना सांभाळणारा हा त्यांचा मित्र हे आपलेच, आपल्याच मनाचे भाग आहेत.
आपल्या आयुष्यात अश्या अनेक घटना घडतात की जिथे निर्णय घेणं अवघड जात. एकदा वाटत आनंद मिळतो ना, काम होतय ना मग मार्ग कोणताही असुदेत आपण तसच वागू. पण दुसर मन ज्याला नैतिकतेची धार असते ते मात्र चुकीच्या गोष्टी अगदी जिथे जरा माघार घेणं पण योग्य असत तिथे पण अडून बसत. आपल्या मूल्यांना पटत नाही ना! नाही करायचं. काय व्हयाच ते होऊदे.
पण कोणत्याही गोष्टीचं टोक हे वाईटच. मग तो आनंद असुदे किंवा नैतिकता. म्हणून या दोघांमध्ये सुवर्णमध्य काढायला जोड लागते ती वास्तवतेची. त्या परिस्थतीत जे वास्तविक आहे कमी नुकसानकारक आहे त्याचा विचार करून वागल पाहिजे. म्हणून कोणत्याही प्रसंगात आपल्या मनातली नैतिकता आणि आनंद यांना वरचढ न होऊ देता त्या दोघांनामध्ये आणून वास्तवाची जोड देऊन वागल पाहिजे. तर जीवन सोप होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

khup chhan