Skip to content

आनंदी रहायचं हे मी स्वतः ठरवलं असल्याने मी आनंदी आहे.

आनंदी रहायचं हे मी स्वतः ठरवलं असल्याने मी आनंदी आहे.


सोनाली जे


आनंद म्हणले की बालकवी यांची कविता आवर्जून आठवते.

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे || १ ||

किती सहजगत्या त्यांनी स्वतः चा आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त केला आहे. ज्यांना आनंद घेता येतो त्यांना इकडे तिकडे चोहिकडे आनंदच आनंद गवसतो. आपल्या आनंद , दुःख , सुख , राग या भावना आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्या नुसार साधारणपणे बदलत असतात. आपण आपल्या आनंदा करिता बहुदा दुसऱ्यावर अवलंबून असतो ..

आपल्या सर्वांना च आपले आयुष्य सरळ , सुरळीत असावे त्यात संकटे किंवा अडचणी कमी असाव्यात आणि सुख आणि आनंद जास्त असावे अशी अपेक्षा असते.. आणि आपण कायम आपल्या लोकांचा शोध घेत असतो, प्रेमळ , समजून घेणारी , आपल्याला आनंद देणारी आणि आपण त्यांना आनंद देवू अशी.

पण मी जेव्हा माझ्या अंतर्मनात शिरले तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण एव्हढे दिवस उगीचच आपला आनंद आपले मित्र – मैत्रिणी , अहो, मुली , नातेवाईक यांच्यात शोधत होतो. आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्या करिता अडून ठेवत होतो. Movie बघायची तर ही मस्त रोमँटिक , कॉमेडी आहे अहो नच्या बरोबर बघू , Marvel’s movie मुलींच्या सोबत बघू आपल्याला आणि त्यांना ही आनंद मिळेल. असे म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्याकरीता बाकी ठेवत होते.

पण आपल्याला जशी त्यांच्या समवेत तो आनंद घेण्याची इच्छा असते तशी त्यांना असते का ? हा विचार कधी केला नाही.त्यामुळे बरेचदा मुलींना त्यांच्या मित्र मैत्रिणी सोबत मूव्ही बघण्यात जास्त आनंद मिळतो हे लक्षात आले. अहो नाईलाज म्हणून येत असतं त्या मूव्ही कडे लक्षच नसते. आपल्याला कॉमेडी वर हसून हसून पोट दुखायची वेळ येते पण त्यांना ती कॉमेडी समजली का नाही हाच प्रश्न पडे.

हळूहळू लक्षात आले की केवळ आपण म्हणतो म्हणून ते येतात..त्यांचे आपल्या सोबत असणे आपल्याला आनंद देते पण त्यांना ती जबरदस्ती वाटते. किंवा नाईलाज म्हणून येतात.

आता दोन महिन्यापूर्वी मी तापाने फणफणले होते. सर्दी नाही , खोकला नाही त्यामुळे खात्री होती की हा viral ताप असणार. एक गोळी घेतली ताप ही गेला. पण डोके प्रचंड दुखू लागले. Dr नी आधीच isolation मध्ये जाण्यास सांगितले होते. आता covid ने एवढं धुमाकूळ घातला म्हणून RTPCR करून घेण्यास सांगितले आणि negative च येणार रिपोर्ट ही खात्री असताना positive आला रिपोर्ट.

ब्रह्मांड आठविले. स्वैपाक कोण करणार इथपासून सगळ कसे होणार ..इतर कोणाला काही नसेल ना ..याची चिंता..त्या सगळ्यांच्या टेस्ट .सगळे बाकीचे negative आले. मग हुश झाले म्हणले आता काहीच भीती नाही..आपल्यामुळे इतर कोणाला त्रास नाही झाला ना बास ..देवाचेच आभार मानले आणि dr चे कारण ताप आला तसे त्याने isolation मध्ये जाण्यास सांगितले होते.

त्यामुळे बाकी सगळे सुखरूप राहिले. Frozen पोळ्या ऑर्डर केल्या. वाणी सामान वाल्याला फोन करून सांगितले लिस्ट पाठविते घरपोच दे सामान..मुली लहान निदान सॉस , जॅम , लोणचे , चटणी पोळी , चीझ , बटर पोळी खातील म्हणून ते सगळे मागविले. इन्स्टंट फूड पॅकेट्स मागविले. Payment online केले. निश्चिंत.

आता पहिल्यांदाच एवढा वेळच वेळ मिळाला आपल्याकरिता.. बरं covid विषयी रोज काही तरी वाईट बातम्या येत होत्या..कॉलनी मध्ये एक जण गेले.माझ्या मैत्रिणीची आई अचानक गेली..भाऊ सिरीयस मग थोडे टेन्शन आले..पण मग ठरविले काही नाही आपण आता आनंदी राहायचे. काही असो आपल्याला आता हे सतरा दिवस आपल्या स्वतः साठी आणि फक्त आपल्या सोबतच आपण जगायचे आहेत.

पहाटे पहाटे उठून मस्त प्राणायाम , सुदर्शन क्रिया करायचे.मन प्रसन्न आणि आनंदी राहत होते त्यातून .दिवसाची सुरुवात खूप छान आणि शांतता देवून , मुख्य उठल्या उठल्या चा वेळ आपल्याला आपल्या करिता देत होते जे गेली २३ वर्षात कधी ठरवून ही आपल्या करिता काढू शकत नव्हते. उठले की स्वैपाकघरात.

रोजच्या रूटीन मधला हा पहिला बदल खूप आनंद दायी च होता माझ्या दृष्टीने. ते झालं की मस्त बसल्या जागेवरून मिळणारा दारात ठेवलेला चहा..जणू काही मला वाटायचे अरे वाह आपल्याला एखाद्या five star hotel सारखे बसल्या जागी चहा जेवण आणि परत कोणाचा disturbance ही नाही..खरे तर मी पूर्वीची असते तर मला खूप guilty फील झाले असते..असे आयते बसून खायचे. पण मी ठरविले होते की जे आहे त्याचा स्वीकार करायचा आणि त्यात आनंद शोधायचा.

‌प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेत केल्या गेलेल्या नोंदी , तब्येत आणि त्यात रोज तासा तासात होणारे चढ उतार , बदल, श्वास घेता येतो आहे हा आनंद च की, हे सगळे नोंद करायचे ताबडतोब स्वतः च dr बरोबर बोलायचे ..कारण इतर कोणाला काही समजायचं प्रश्न नाही कोणाच्या डोळ्यापुढे काय , वाऱ्याला सुधा नव्हते ..मग dr त्यांचा सल्ला , औषधे मागवायचे , त्याचे payment सगळे जागेवर बसून आरामात बरं परत मेडिकल वाला ही लवकर बर्या व्हा म्हणून गोड बोलून काही लागले तरी सांगा..

‌वाईटा मध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करत होते.. आपल्याला हे घरबसल्या रॉयल ट्रीटमेंट मिळते म्हणून आनंद. आणि परत सगळे आपले आपण जाग्यावर बसून ऑनलाईन करतो मग लॅब टेक्निशयन arrange करायचा असो किंवा रिपोर्ट सगळे जागच्या जागी मिळत होते याचा आनंद.

रोज ऐकणाऱ्या वाईट बातम्या यातून आपला आजचा दिवस आपण पूर्ण जगून घ्यायचा असे मनाशी ठरवून ज्या ज्या गोष्टीत आनंद मिळेल त्या त्या गोष्टी करत होते..व्यायाम , वॉकिंग,. आपल्या जवळच्या सगळ्यांबरोबर संवाद , त्यांना मदत , आराम , healthy खाणे , पिणे , स्वच्छता, ऑनलाईन classes सुरू केले. लिखाणाची आवड लिखाण सुरू केले, आजच्या दिवसात जेवढे भरभरून जगता येईल तेवढे जगण्याचा प्रयत्न करून आनंद मिळवीत होते..

covid मुळे हे ही समजले की वेळप्रसंगी आपले कोणीच नसते स्वतः मधल्या क्षमता ओळखा आणि कमी असतील तर त्या वाढवा. यातून स्वतः ला ओळखण्या , समजण्याचा आनंद मिळाला. आणि आपला आनंद आपल्यात च दडला आहे त्याला बाहेर शोधण्याची , इतर कोणा मध्ये शोधण्याची गरज नाही याचा शोध ही लागला.

या Covid सारख्या रोगात उद्याचा दिवस उगवेल का याची शाश्वती नाही किंवा एक भीती म्हणून भरभरून जगायचे असे मग जे राहिले असेल ते करा .. भरपूर वाचन , आवडत्या movie बघितल्या , भरपूर लिखाण , व्यायाम ..आणि मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करण्याची सवय च लावून घेतली. आजपर्यंत breakfast ची वेळ इतर कामात चुकत होती ती ही वेळेत पाळली जायची.. आपल्याला काही झाले तरी कोणाला समजणार ही नाही अशी ही भीती एक दोन वेळा येवून गेली मनात.

मग सगळी भीती दूर करून ऑनलाईन लावलेल्या भगवत गीता क्लास मध्ये सगळे अगदी सात वर्षाच्या मुलांपासून ७० वर्षापर्यंत त्यांच्यात नवीन शिकताना आनंद मिळत असे. तर कधी webinars, या मधून आपण नवीन माहिती घेतल्याचा आणि आपल्याकडची माहिती , सल्ला दिल्याचा ही आनंद मिळवीत होते..आणि त्याकाळात उद्या जगेन की नाही याची खात्री नव्हती म्हणून आनंदी रहायचं हे मी स्वतः ठरवलं असल्याने मी तेव्हाही आनंदी होते आणि आता रोजचा दिवस आपण आनंदी च राहायचे उद्या कोणी बघितला..उद्या उगविला तर आपण नशीबवान च आणि अजून आनंद कसा मिळविता येईल ते बघता येईल.

आज हवा , वारा , पाणी , तप्त उन्हा नंतर पडणारी पहिल्या पावसाची आल्हाददायक सर थंड हवेचा आनंद देते. तर कडाक्याच्या थंडी नंतर येणारा उन्हाळा आनंद देतो. निसर्ग , डोंगर , दर्या , झाडे झुडपे , त्या झाडांच्या सुंदर विविध छटा आपल्याला मोहवून टाकतात , चंद्राची ती सौम्य आणि शांत शीतलता , काळया ढगात चांदण्या आणि तो चंद्राचा लक्ख प्रकाश, उगवत्या सूर्याच्या दर्शन घेताना आणि मावळतानाचा संधिप्रकाश अहाहा!!

हा निसर्ग आपल्याला एकटे असून ही आनंद मिळवून देतो. इतरांकडून आनंदाच्या अपेक्षा ठेवल्या तर त्यांच्या वेळेनुसार , सोयीनुसार , जमले तर ते आपल्या करिता म्हणून गोष्टी करणार तो अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा , त्यांच्या वागण्यातून आपला विरस करून घेण्यापेक्षा छोटे छोटे आनंद स्वतः मिळवू , लहान मुलांच्या मध्ये मिसळले की आपला आनंद पहिल्यांदा उभे राहण्यात ही आहे..पहिल्यांदा नवीन गोष्ट करताना आहे , अगदी नवीन खेळ आणला नवा व्यापार तर तो ही आनंद देणारा मग तो खेळायला शिकलो याचा ही आनंद.

तसेच आहे वयस्क लोकांच्यात ही हाच निस्वार्थी , निरागस आनंद आहे. एखादा नवीन पदार्थ केला आणि शेजारी एकट्या असणाऱ्या वयस्क काकूंना दिला आणि सांगितले की गरम गरम आहे लगेच खा की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही मला खूप आनंदी करून जातो. किंवा आजी आजोबांना जड पिशवी उचलून घरपोच दिली की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही मला आनंदी करतो. आनंदी रहायचं हे मी स्वतः ठरवलं असल्याने मी खरेच खूप आनंदी आहे.

आयुष्य सुंदर आहे तुमचा आनंद कस्तुरी सारखा तुमच्या मध्ये दडला आहे.. त्याचा शोध घ्या. हा शोध लागणे म्हणजे ही एक आनंद दायी सकारात्मक घटना आहे .

बालकवींची कविता खऱ्या अर्थाने जगा..आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे ll


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आनंदी रहायचं हे मी स्वतः ठरवलं असल्याने मी आनंदी आहे.”

  1. खुप चांगला होता. धन्यवाद 🙏🏻

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!