Skip to content

आनंदी भावना अंधारात असलेल्या मेंदूला प्रकाशात आणण्याचं काम करतात.

आनंदी भावना अंधारात असलेल्या मेंदूला प्रकाशात आणण्याचं काम करतात.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


मानवाला जितके अवयव आहेत त्यापैकी मानवाचा ‘मेंदू’ हा एक विशिष्ट असा अवयव आहे.आपल्या संपूर्ण शरीरावर,मनावर नि बुद्धीवर ज्याच नियंत्रण असतं तो म्हणजे आपला ‘मेंदू’. मेंदू…म्हणजे आपलं आयुष्य. ज्यामुळे आपण धडधाकटपणे जिवंत उभे असतो.तो संपला तर सगळच संपतं.त्याच्याशिवाय मानव हा अपूर्ण आणि अशक्य आहे.

आपण खूपदा हे वाक्य ऐकतो की…किती विचार करतेस, विचार करून करून तुझा मेंदू दमत नाही का…??थोडी विश्रांती घे जरा… पण मित्रांनो आपला मेंदू म्हणजे जणू विचारांच वारूळच आहे.त्याला विचार करायची सवय असते.आणि मुळातच आपल्या मेंदूचं ते काम असतं.अगदी दमछाक होईपर्यंत मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता असते.

आणि त्यामुळेच त्याला विचारांच वारूळ म्हंटल जात असावं.शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे.तसच आपला मेंदू हा क्षणाक्षणाला शिकत असतो.असं म्हणतात शिकण्याची प्रेरणा आपल्या मेंदूला नैसर्गिकरित्या मिळालेली असते.त्यामुळे त्याचं शिकण्याच काम कायम चालूच असतं.

पण…..कितीही नाही म्हंटल तरीही आपलं जीवन हे धकाधकीच आहे.धावपळीच आहे.आणि या धावपळीच्या जीवनात आपण कितीदा थकून जातो.काम करून करून -विचार करून करून आपली कधी दमछाक होते कळतही नाही.

आपली दमछाक होते हे आपल्याला जाणवतं.आपल्याला विश्रांतीची गरज आहे हेही आपल्याला समजत असतं. पण आपल्या या शरीरावर ,मनावर नी बुद्धीवर या मेंदूचं नियंत्रण असतं.आणि दिवसभर तो त्याचं काम करून दमलेला असतो.त्यालाही विश्रांतीची गरज असते.आणि आपल्या मेंदूला विश्रांती घेणं खूप गरजेचं असतं. मेंदू थकून चालत नाही. कारण तो थकला तर आपली पूर्ण ‘System’ च बिघडून जाते.

आणि इतकच नाही तर….आपल्या दैनंदिन जीवनात दमछाक होण्याव्यतिरीक्त सुद्धा इतर काही गोष्टी घडत असतात. आयुष्य आहे म्हणजे सगळ्या गोष्टी येणारच यात काही आपण शंकाच घेऊ शकत नाही. विविध समस्यांनी ग्रासलेली विविध माणसं आपण बघत असतो.त्यापैकी आपणही त्यातलेच एक असतो.

तुम्हाला एक गोष्ट माहीत असेलच कदाचित…. की आपल्या मेंदूला गोष्टींची जाणीव ही लवकर होत असते.कशाने त्रास होतो आणि कशाने नाही हे तो व्यवस्थित जाणतो.त्यामुळे आपला मेंदू जास्तीत जास्त चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात कसा राहील याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्याला त्रासदायक गोष्टी नेहमीच नकोशा वाटतात. कधी कधी नकारात्मक वातावरणामुळे मेंदूवर नकळतपणे वाईट परिणाम होतो.अशा वातावरणात मेंदू अजिबात सक्रिय नसतो.

वाईट भावना , नैराश्य , नकारात्मकता याने मेंदूवर ताण येतो. मेंदू ओझ्याखाली दबला जातो.तो बंद पडलाय याची जाणीव आपल्याला होत असतो. आणि मग बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही सुचत नाही. काही करावसं वाटत नाही.काही त्राण नसल्यासारखं वाटतं. थकून थकून आणि त्या नकारात्मक वातावरणामुळे मेंदूवर काळे ढग दाटून अंधार पसरलाय असच वाटत असतं.पण मग अशा या अंधारातील मेंदूला प्रकाशात आणणं मात्र खूप गरजेचं असतं.नाहीतर माणूस म्हणजेच आपण पूर्णतः बंद पडायला सुरुवात होते.

मित्रांनो मेंदू आणि भावना यांच एक विशिष्ट असं Connection आहे. मी वरती सांगितल्याप्रमाणे मेंदूला जाणीव खूप पटकन होते.तसच त्याला आनंद आणि दुःख याची जाणीवही लवकर होते. नकोनकोशा वाटणाऱ्या गोष्टीपासून मेंदूला लांब जावसं वाटतं.तो त्या गोष्टींमुळे निरूत्साही होतो. पण याऊलट आनंदाची भावना मेंदूला सतत हवीहवीशी वाटते.त्यातून तो प्रेरित होतो. आनंदाची भावना ही मेंदूमध्ये एक प्रकारे सुखद हार्मोन्स निर्माण करत असते.जे की मेंदूला हवेहवेसे वाटतात.

आता भीतीतून आनंदी भावना मिळत नाही हे सगळ्यांना माहीत आहे पण मग आनंदाची भावना कशातून मिळते…???तर गाणं ऐकलं तर आपल्याला छान वाटत.एखादा छंद जोपासायला आपल्याला आवडतं आणि छंदातून आनंदाची निर्मिती होते.आणि हाच आनंद मेंदूला उत्तेजित करत असतो.आणि आवडीच्या गोष्टींमधून आनंद मिळत असतो.अशा वातावरणात मेंदू खूप ताजातवाना होतो.आनंदी भावनांमुळे मेंदूवरचा ताण हलका होण्यास मदत होते.

नवा उत्साह निर्माण होऊन अंधारात असलेला मेंदू प्रकाशात येण्यासाठी या आनंदी भावना विशिष्ट पद्धतीने काम करतात.आणि या आनंदी भावनांमुळे आपला मेंदू पुन्हा पूर्ववत होतो.अंधारातून प्रकाशाची वाट त्याला दिसायला लागते.तो अगदी सुरळीतपणे काम करायला तयार असतो.त्यामुळे आनंदी भावना या मेंदूसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आनंदी भावना अंधारात असलेल्या मेंदूला प्रकाशात आणण्याचं काम करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!