आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कोणताही माणूस, मग तो जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असो, वरून कितीही कठोर दिसत असेल, मग ती एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष; प्रत्येकाच्या मनात, मनाच्या त्या कोपऱ्यात संवेदनशीलतेचा एक बारीक धागा असतोच. प्रत्येकाच्या मनात थोडी का होईना संवेदनशीलता असते. भावनिकता असते. प्रत्येकाची व्यक्ती करायची पद्धत वेगळी असते. त्यांच्या आयुष्यातील ती व्यक्ती वेगळी असते. व्यक्तिपरत्वे हे बदलत जात. त्यामुळे माणूस समोर कडक आहे, रागीट आहे म्हणून आपण त्याला तो insensitive म्हणू शकत नाही. कारण त्याची ती संवेदनशील बाजू कदाचित आपण पाहिली नसेल. कदाचित ती अमुक एका व्यक्तीसाठी असेल. जगाला ती दाखवली जात नसेल ज्याची कारणं ही असू शकतात. पण अस होत की माणूस पूर्णपणे भावनाहीन असतो.
काही लोक जरा जास्त भावनिक असतात तर काही कमी. अनेकदा अस म्हटल जात की पुरुषांच्या तुलनेत बायका जास्त भावनिक असतात, संवेदनशील असतात. पण अस नाही. मुलीच्या लग्नात ढसाढसा रडणारा बाप कोणी पाहिलं नसेल का? मुल चांगल शिकुदेत म्हणून दिवसरात्र काबाडकष्ट करणारा बाप कोणाला माहीत नसेल का? हे सर्व नाकारून चालत नाही. बायकांची भावनिकता दिसून येते कारण त्यांना ती व्यक्त करण्याची मुभा असते. त्या रडतील, मन मोकळं करतील. दुर्दैवाने पुरुषांना ते स्वातंत्र्य अजूनही नाही. त्यामुळे ते दिसून येत नाही.
त्यामुळे संवेदनशील असणं,भावनिक असण हे कोणाच्याही बाबतीत असू शकत. फक्त आपण त्याच व्यवस्थापन कसं करतो यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. कोणत्या प्रसंगात भावनिक व्हायचं, कोणता प्रसंग विचारीपणाने हाताळायची हे आपल्यावर असत. आता आपल्यात आयुष्यात अशी काही नाती असतात, अश्या काही गोष्टी असतात जिथे आपण बऱ्याचदा भावनिक होऊनच निर्णय घेत असतो. तिथे आपण फारसा विचार करत नाही. फार प्रॅक्टिकल पण होत नाही. हळवं होऊन जातो. पण जेव्हा यातून निराशा येते. जेव्हा आयुष्यात असे काही प्रसंग घडतात जेव्हा आपण पूर्णपणे तुटून जातो तेव्हा मात्र हे भावनिक होण कमी होत.
हे तुटून जाणं आलेल असत बरेचदा अपेक्षाभंगातून, ही निराशा आलेली असते अती विश्वास ठेवण्यातून. आता ह्या अपेक्षा, हा विश्वास आपण परक्या व्यक्तिबाबत तर ठेवत नाही. ह्या सर्व गोष्टी ज्याना आपण आपलं मानतो, जी आपल्या जवळची असतात त्यांच्याबाबत असत. जेव्हा या गोष्टींना कुठेतरी तडा जातो तेव्हा माणूस आतून तुटतो. जितका त्रास अनोळखी व्यक्तीच्या वागण्यातून होत नाही तितका आपल्या माणसाकडून होतो, जरी प्रसंग, घटना तिचं असली तरी. म्हणून आपण म्हणतो देखील, दुसऱ्या कोणी केल असत तर मला काही वाटल नसत. पण तू केलंस याचा त्रास होतोय. ह्यात कुठेतरी अपेक्षा असते. आपण आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीला स्थान दिलेलं असत. पण जेव्हा त्याच व्यक्तीकडून वेगळे अनुभव येतात तेव्हा ते माणसाला बदलून टाकतात.
त्या अनुभवांतून माणूस अंतर्बाह्य बदलतो. आधीच्या त्याच्यामध्ये असलेली भीड आता कमी होते. त्याजागी ठामपणा येतो. आपल्या आजूबाजूला, अगदी घरातदेखील अशी माणसं असतात जी लगेच व्यक्त होत नाहीत. जी लगेच खचून पण जात नाही. ज्यांना आपल्या भावना उघड उघड दाखवायला फार आवडत नाही रादर ते लगेच भावनिक पण होत नाहीत. आपण म्हणतो किती रुक्ष माणूस आहे हा! पण त्या रुक्षपणामागे जे तुटलेलं मन असत ते फार कमी जणांना माहीत असते, त्यांनी जो त्रास अनुभवला त्याचे साक्षीदार खूप कमी लोक असतात.
त्यामुळे वर वर ही लोक रुक्ष, कोरडी, खूप जास्त प्रॅक्टिकल वाटत असली तरी आत कुठेतरी एक कोपरा दुखावलेला असतो. यांनी जाणीवपूर्वक स्वतः ला बदलेलेले असत कारण आधीच्या घटनाचे काही पडसाद अजूनही मनावर असतात. त्यामुळे आता जर आपण भावनिक झालो तर परत आपल्यासोबत तसच होईल की काय अशी भीती पण असते. पण ही गोष्ट देखील तितकीच लक्षात घेतली पाहिजे की दर वेळी हे प्रॅक्टिकल होण वाईट असत अस नाही.
जी लोक तुटलेली आहेत ती सर्वच काही रुक्ष होत नाहीत. सर्वच पूर्णपणे कोरडी होतात अस नाही. कारण अनुभव हाच आपला गुरु आहे. त्यामुळे जरी वाईट अनुभव आले तरी यातून योग्य तो धडा घेऊन अशी माणसं पुढे जातात. आधीच जे खूप जास्त विश्वास ठेवणं असत, आधीच जे पटकन भावनिक होण असत ते मात्र या अनुभवातून योग्य पद्धतीने हाताळता येत. लोकांना पूर्वीपेक्षा जास्त चांगल ओळखता यायला लागतं. सारासार विचार करता येतो.
या दोन्ही गोष्टी होतात एकाच गोष्टीतून. कोणती तर मन तुटल्यामुळे, यामागचे प्रसंग वेगेवगळे असले तरी अस होत. पण त्यानंतरचा माणूस मात्र दोन्ही पद्धतीने बदलतो. का? कारण शेवटी आपले विचार आपण कसे करतो यावर सर्व अवलंबून आहे. प्रसंग आणि आपण यामध्ये असणारे आपले जे विचार आहेत ते या गोष्टी घडवून आणतात. म्हणूनच काहीही झालं तरी, आपण आतून कितीही तुटलो तरी, हरलो तरीही हे विचारांच स्वातंत्र्य आपल्याकडे अजूनही आहे ही गोष्ट लक्षात ठेवून पुढे जायचं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
