आठवण आठवताना त्रास होत असेल तर ती लवकरात लवकर मोकळी होणे का गरजेचे आहे ?
मेराज बागवान.
आयुष्य हे क्षणभंगुर असते.अनेक प्रसंग घडतात, घडून जातात,अनेक जण येतात आणि निघून देखील जातात आणि उरतात त्या फक्त आठवणी. आठवणी म्हणजे तरी काय? तर आठवणी म्हणजे, भूतकाळातील क्षण, जे घडून गेलेले असतात पण तरी देखील काही कारणास्तव ते आपल्या मनात कायम राहिलेले असतात.
मग कधी ह्या आठवणी सुखद असतात तर कधी दुःखद. पण सुखदायक आठवण असोत किंवा दुःखदायक, यातील काही आठवणी आठवत असताना मनाला खूप त्रास होतो. मग अशा आठवणींचे काय करायचे? तर ती आठवण लककरात लवकर मोकळी करता आली पाहिजे आणि असे करणे का बरे गरजेचे आहे ?
आयुष्यात विविध आठवणी असतात.जसे की , जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखाद्याचे किंवा स्वतःचे लग्न, प्रेमप्रकरण,एखादा मोठा अपघात,भांडण, एखादे आजारपण, एखादा समारंभ, एखादी स्पर्धा, एखादे कार्यालयीन काम, प्रोजेक्ट, परीक्षा इत्यादी.यातील आनंददायी घटना जसे की ,एखाद्या स्पर्धेत कधी तरी पहिले बक्षीस मिळाले असेल, स्वतःचे लग्न,एखादी सहल आणि तिथे केलेली मौजमजा आठवून मन प्रफुल्लित होते, आनंदित होते.पण काही दुःखदायक, नकारात्मक देखील घटना, आठवणी असतात ज्या आठविल्या की आपल्याला खूप त्रास होतो.
जसे की , एखादा अचानक घडलेला अपघात, अकाली मृत्यू , विरह , जवळच्या व्यक्तीबरोबर झालेले भांडण आणि त्यामुळे आलेला दुरावा, मनाविरुद्ध लग्न केले म्हणून नात्यांमध्ये पडलेली फूट इत्यादी.ह्या अशा आठवणींमुळे त्रास तर होतच असतो. मानसिक गोंधळ उडत असतो.पण अशा आठवणी फक्त आठवून आठवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा यातून मोकळे होता आले पाहिजे, बाहेर पडता आले पाहिजे.आणि आयुष्य आपल्याकडून हीच अपेक्षा नेहमी ठेवत असते.म्हणजे की , “नेहमी पुढे पुढे जात रहा”.
जर त्रासदायक आठवणी मनातून जातच नसतील तर अशा वेळी कोणाकडे तरी आपले मन मोकळे करता आले पाहिजे.त्यामुळे योग्य तो मार्ग सापडतो.मन शांत होते आणि पुढे काय कारायचे हे ठरविता येते.नाहीतर फक्त मनात नकोसा कचरा साठत राहतो आणि मन कायम अस्वस्थ राहते.म्हणूच त्रासदायक आठवण मोकळी करता आली पाहिजे.
त्रासदायक आठवणींमुळे संपूर्ण दिनमानावर परिणाम होतो.कोणतेही काम करीत असताना मन लागत नाही.सारखे भूतकाळात मन ओढ घेते ज्याचा वर्तमानाशी तसा काही संबंध नसतो. मग जर आपण कामे यशस्वरित्या पार नाही पाडू शकलो तर मग आपण आपले आयुष्य अधोगतिकडे घेऊन चाललो आहोत असा याचा अर्थ होईल.मग म्हणूनच अशा वेळी अधोगतिकडे न वळता, भरभरून बोलून व्यक्त होता आले पाहिजे.
एखादी आठवण आठवत असताना, आपण पुन्हा स्वतःला दुःखाच्या खाईत लोटत असतो.सध्या कोणतेही दुःख नसले तरी घडून गेलेले दुःख आपण आठवीत बसतो आणि याच त्रास फक्त आणि फक्त आपल्यालाच होतो.मन नैराश्याकडे हळूहळू झुकू लागते.मग हे नैराश्य घालविण्यासाठी , टाळण्यासाठी दुःखदायक आठवण व्यक्त करून लवकरात लवकर त्यातून बाहेर पडले पाहिजे.जेणेकरून आपण एक शांत आयुष्य जगू शकू.
जर का आपण कायम त्रासदायक आठवणीत कायम जगत राहिलो तर आपली विवेकबुद्धी देखील हळुहळु कमी होऊ लागते.विचार करण्याची क्षमता खुंटते.मन फक्त ती त्रासदायक घटनाच लक्षात ठेवले.मग या मुळे नकळत शारीरिक-मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच लवकर अशी आठवण पुसता आली पाहिजे.
एखादी आठवण आठवून जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा आपण आत्मविश्वास हरवितो.कोणतीच नवीन गोष्ट करण्यासाठी मन धजत नाही.मन कमकुवत बनू लागते.मन फक्त स्वतःच्याच कोशात राहू लागते. मग अशा समस्यांमुळे आपण आपल्या दैनंदिन गोष्टी देखील नीट पार पाडू शकत नाही.त्यामुळे ही त्रासदायक आठवण विसरून , ही आठवण बाहेर पाडून पुढे जाता आले पाहिजे.
जेव्हा जेव्हा आपण ह्या त्रासदायक आठणीत बुडालेलो असतो तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता देखील आपण गमावून बसतो. जीवनात काय कारायचे आहे हे देखील आपण नीट ठरवू शकत नाही.मन सैरवैर होते.त्यामुळे वेळीच अशा आठवणी मोकळ्या करायला शिकले पाहिजे.
कटू त्रासदायक आठवणी आठवत असताना ,आपण बाकीच्या गोष्टी विसरू लागतो.वर्तमानात पूर्णपणे जगू शकत नाही.मग याचे मानसिक शारीरिक दुष्परिणाम होतात.अनेक आहार , व्याधी जडतात.जे काही खूप हानिकारक आहे आयुष्याच्या दृष्टीने.म्हणूनच ज्या आठवणी त्रास देत आहेत त्यांना कायमचे बाहेर सोडता आले पाहिजे.
त्रासदायक आठवणींमुळे माणूस बरेचदा राग राग करू लागतो.कधी खूपच शांत शांत राहू लागतो.कधी त्याला भीती वाटते तर कधी असुरक्षिततेची भावना जागृत होते.आणि ही सर्व मानसिक आजारांची लक्षणे आहेत.या सगळ्याच्या अतिरेकामुळे आयुष्य थांबते.त्यामुळेच अशा आठवणी मनात दाबून न ठेवता योग्यरीत्या तिचा निचरा करता आले पाहिजे.आयुष्य वर्तमानात जगण्यासाठी ते फार गरजेचे असते.
आयुष्य कोणत्या एका आठवणीमुळे थांबत नाही.ईश्वराने आपल्याला इतके सुंदर आयुष्य दिले आहे ते आपल्याला आणखीन सुंदर करता आले पाहिजे.एक सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी मन मोकळे करता आले पाहिजे.स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे आणि त्यानुसार स्वतःमध्ये योग्य ते बदल देखील करता आले पाहिजेत.आयुष्यात यश मिळविण्यासाठी मानसिकरित्या एक खंबीर व्यक्तिमत्त्व आवश्यक असते.अगदी तसेच आपल्याला स्वतःला बनविता आले पाहिजे.
एक शांतीमय, आरोग्यदायी , सदृढ आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी मनातील भावना, आठवणी अनेक काळापर्यंत मनात साठून न देता त्याचा योग्यरीत्या निचरा करता आला पाहिजे.काही गोष्टी कालानिरुप सोडून देखील देता आल्या पाहिजेत.
एक मजबूत मानसिक दृष्टिकोनासाठी , व्यक्तित्वासाठी वरील सर्व गोष्ट खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच, एखादी आठवण आठवताना त्रास होत असेल तर ती लवकरात लवकर मोकळी होणे गरजेचे आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


