Skip to content

आजारी पडल्यानंतर व्हेंटिलेटर बेडवर ‘निरोगी कसं जगावं’ हे पुस्तक वाचून काय उपयोग ?

आजारी पडल्यानंतर व्हेंटिलेटर बेडवर ‘निरोगी कसं जगावं’ हे पुस्तक वाचून काय उपयोग ?


गीतांजली जगदाळे


व्हेंटिलेटर वर असलेला माणूस खरंतर पुस्तक वाचायच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे त्या पॉईंट ला पुस्तक वाचून किंवा कसल्याही पद्धतीने का होईना निरोगी कसं राहावं हे कळून काहीही फायदा होणार नाही. पण ज्या माणसांचं आजारी पडायचं प्रमाण जास्त आहे त्यांना नक्की अशा पुस्तकाचा फायदा होऊ शकतो अर्थात फक्त वाचून नाही तर त्यातल्या गोष्टींची अंमलबजावणी करून ! सुदृढ शरीर ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगीच होय !

पण आपण जेवढं घ्यायला हवं तेवढ्या गांभीर्याने तिला घेत नाही आणि तिची कदर ही करत नाही. अर्थात हे सगळ्यांना लागू पडणार नाही, कारण खूप लोक असेही आहेत जे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. निरोगी आयुष्य जगायला असं काय बरं करावं लागत? तर फार असं काहीच नाही. सकस आहार, चांगले विचार, शारीरिक कष्ट आणि व्यायाम, आणि मेडिटेशन . इतकं केल तरी याचे खूप फायदे आपल्याला होत असतात ते ही अगदी नेहमीसाठी.

शरीराकडे आपलं लक्ष च मुळात तेव्हा जात जेव्हा आपण आजारी पडतो, वेदना होतात, हव्या त्या गोष्टी,कामे करणं अवघड होऊन बसत तेव्हा. तोपर्यंत मात्र आपण शरीराला नुकसान देणाऱ्या गोष्टीच जास्त प्रमाणात करत असतो. एखाद्याकडे कितीही पैसे असले पण जर शरीर च निरोगी नसेल तर त्या पैशाचा उपभोग ही नीट घेता येत नाही.

तेच शरीर निरोगी असताना मात्र आपण जे आहे त्याचा पुरेपूर उपभोग ही घेऊ शकतो आणि अजून जे काही हवे असेल त्यासाठी कष्ट ही घेऊ शकतो. शारीरिक संपत्ती जपायला हवी. कारण जगात खूप वस्तू पैशाने विकत घेता येऊ शकतात पण काही गोष्टी कितीही पैसा असला तरी आपण मिळवू शकत नाही, निरोगी शरीर हे ही त्यातलीच एक गोष्ट आहे.

शेवटी शरीर म्हंटल्यावर कधीतरी आजारी पडणार,त्याला डागडुजी ची गरज पडणार! पण हे कधीतरी होणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण तेच आपल्या हलगर्जीपणामुळे होत असेल तर आपण वारंवार आजारी पडत राहतो. शारीरिक रित्या निरोगी राहणं जस महत्वाचं असत त्याचप्रमाणे मानसिकरीत्या निरोगी राहणं देखील तेवढंच महत्व्वाच आहे. त्यासाठी चांगली पुस्तक वाचणे, चांगल्या गोष्टी ऐकणे आणि चांगला विचार करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी आपण करू शकतो.

खरंतर शरीराला खूप मोठी हानी पोहचवल्या नंतर या सगळ्या गोष्टी सुरु करण्यापेक्षा आपण आत्ताच हळू हळू सुरुवात केली तर आजारी पडण्याचं प्रमाण तर कमी होईलच पण आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये आणि उत्साहामध्ये देखील खूप मोठा चांगला बदल झालेला दिसून येईल आणि तसेच, जेव्हा कधी आजारी पडू तेव्हा सुद्धा आपली strength नेहमी पेक्षा अधिक असल्यामुळे त्याचा आजारपणात ही असा फायदा होईल की आपली सहनशक्ती तेव्हा साथ देते आणि वेदना थोड्या कमी होतात.

आयुष्यात खूप गोष्टी आपण चुका करत-करत शिकत असतो. पण काही गोष्टींबाबतीत केलेल्या चुका खूप महागात पडतात. निरोगी असलेलं शरीर जेव्हा आपल्या चुकांनी आपण रोगी बनवतो तेव्हा नेहमीच ती चूक भरून काढून शरीर पूर्ववत होतच असं नाही. प्रयत्न तर नक्कीच केले पाहिजेत पण त्याही आधी, जर आधी पासून थोडा वेळ आणि थोडं महत्व याला दिल तर नक्कीच ती चूक आपल्याकडून होणार नाही. त्यामुळे आजारी पडल्यावर, हतबल होऊन, त्या बेड वर बसून मग निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचण्यापेक्षा आत्तापासून च ती काळजी घेतली तर ती वेळ कदाचित आपल्यावर येणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!