आजपासून मला माझ्या मनाला मोकळं ठेवायचं आहे…
सौ. मिनल वरपे
काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात..सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही…
मन माझं इतकं अडकलय सगळ्यात की या मनाला शांत करण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी एकटेच रहावेसे वाटते.. मनात असणारे सगळेच विचार बाजूला ठेवून, गर्दी, गोंधळ यापासून दूर जावस वाटते…
आणि ही गर्दी हा गोंधळ आजबाजुचा नाही तर माझ्याच मनातला… एक एक विचार मनाच्या एकेक कोपऱ्यात साठवत त्या विचारांची इतकी गर्दी वाढते की त्या गर्दीतून बाहेर कस पडायचं कळतच नाही…
ते विचार जे मनाला आनंद देतात त्यांची गर्दी कुठे हरवते कळतच नाही मुळात ती गर्दी नसतेच तर आनंद देणारे विचार मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात टाकून दिलेले असतात. त्यांना कधी आणि कुठे महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळतच नाही…कारण दुःख देणाऱ्या आठवणी इतकं मनात घर करून घेतात की आपल्याला सुचू देत नाही की या घरातून बाहेर निघायला सुद्धा वाट कशी शोधायची…
काहीही झालं तरी तिथेच सोडून द्यायला मला जमतच नाही.. मनात सगळं ठेवायची मला खूप वाईट सवय लागली आहे म्हणजेच मनाला लावून घेण्याची… त्यामुळे मला मोकळं जगताच येत नाही..
आज जे झालं, काल घडलेलं, आणि यापेक्षा अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वी जे घडलंय त्यामधे चांगल काय होत हे कमीच आठवते, पण वाईट, त्रास देणार, मनाविरुद्ध काय घडलं होत हे मात्र अचूक वेळेसहित लक्षात राहते..
किती गर्दी होत असेल मनात… जेव्हा इतक्या वर्षांचं सुद्धा घडलेलं आपण लक्षात ठेवतो.. मनात त्याबद्दल विचार साठवून ठेवतो.. आणि शेवटी त्याचा त्रास हा बाकी कोनापेक्षा मलाच जास्त होतो.. घुसमट होते मनाची.. नको वाटते आयुष्य… कारण साठवून ठेवलेल्या विचारांमुळे जगण्याचा अर्थ सुद्धा बदलतो.. जे समोर आहे त्याचा आनंदघेता येत नाही कारण हे अस घडल तेव्हा मला असा त्रास झाला होता हा विचार मनातून उभारी घेतो आणि पुन्हा मला नको तोच त्रास म्हणून मी जे समोर आहे त्यामधे नविन काहीच करत नाही..
हे असं आपल्या प्रत्येकाबद्दल होत असतं. पण काहीजण त्यामध्ये पार गुरफुटून जातात.
जसे आपले विचार तसच आपण वागतो.. मनात नविन विचार तेव्हाच येतील जेव्हा मनातील जुने विचार सोडून दिले जातील.. आता आपणच ठरवायचं की मनात कोणत्या विचारांना स्थान द्यायचं.. कारण वाईट गोष्टी वाईट विचार मला आजचा क्षण जगू देणार नाहीतच.. आणि आनंद देणारे समाधान देणारे विचार मला जगण्याची नवी दिशा देतील..
आजपर्यंत आठवून बघा की मनात ठेवलेल्या कोणत्या गोष्टींनी आपल्याला आजचा दिवस जगताना साथ दिलीये.. योग्य मार्ग दाखवला आहे.. एखाद्याचा तिरस्कार करणे, नकोती जिद्द करणे,. हा माझ्याशी तेव्हा असा वागला होता मग आज मी कशाला चांगल वागू याच्याशी.. मला याने त्रास दिलाय मग मी कशाला प्रेमाने वागू.. मला नाही कोणी समजून घेतलं तर मी का समजून घेऊ.. मला त्यावेळेस एकटं पाडलं होत म्हणून मला आज त्यांची गरज नाही… मला किती छळल हे मलाच माहीत.. माझं अपयश.. माझा अपमान.. माझ्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी.. मनात साठवलेल्या वाईट गोष्टी आपल्याला या सर्वांचीच आठवण करून आपल्याला चुकीचं वागण्यास भाग पाडतात…कारण आपण त्यांना मनात जागा देतो सोडून देत नाही…
आज हा चुकीचा वागत असेल पण माझ्या पडत्या काळात यानेच मला साथ दिली..कुठेतरी माझा अपमान नक्कीच झालेला पण दुसरीकडे माझा सन्मान सुद्धा झाला होता .. मी हे केलेलं तेव्हा मला खूपच आनंद मिळाला होता.. माझ्या आयुष्यात असे बरेच क्षण आहेत ज्यांनी मला अनपेक्षित सुख दिलं आहे.. मला या लोकांनी कधीच एकटं सोडलं नाही… अशा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपल्या मनात ठेवल्या तर आपल्याला आज चांगले विचार करून चांगल वागता येईल.. पण आपण त्यांना विसरून जातो..
म्हणून आजपासून मला माझ्या मनाला मोकळं ठेवायचं आहे..चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या हे ओळखून ज्या मला त्रास देतील.. चुकीची वाट दाखवतील.. अशा वाईट गोष्टींचा मनात पसारा न करता मला त्या तिथेच सोडून पुढे जायचं आहे.. कारण माझ्या मनात आणि आयुष्यात मला कोणत्याच वाईट गोष्टींची गर्दी करून गुदमरून नाही जायचं.. तर मला चांगल्या गोष्टी सोबत घेऊन एक सुंदर आयुष्य जगायचं आहे..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

