Skip to content

अहंकार वाढला की आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती पहा.

अहंकार वाढला की आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती पहा


सुलभा घोरपडे


अहंकार म्हणा किंवा ego म्हणा , मनुष्याचा फार मोठा शत्रू , पोथीपुराणात अनेक उदाहरणे आहेत , अहंकारामुळे नाश झालेल्यांची. रावण खूप श्रेष्ठ भक्त होता , ज्ञानी होता पण अहंकाराने दानव झाला , तसेच भस्मासुर , कौरव , कंस यांना ही अहंकार झाला होता , असे अनेक दाखले आहेत. .

एखादी गोष्ट खूप छान जमली की , आपल्याला थोडीशी गर्वाची भावना तयार होणे हे स्वाभाविक आहे पण माझ्यासारखं कुणालाच जमत नाही किंवा जमणार नाही , फक्त मीच करू शकतो , दुसरा कुणीच नाही , अशी भावना तयार होणे म्हणजे अहंकार वाढीला लागला आहे असे समजावे .

प्रत्येकाला अहंकार वेगवेगळ्या गोष्टीचा असतो , कुणाला सौंदर्याचा अहंकार असतो ( माझ्याइतकं कुणी रूपवान , सुंदर नाही ) तर कुणाला कर्तृत्वाचा , कुणाला सत्तेचा ,संपत्तीचा ( माझ्याएवढी संपत्ती , सत्ता कुणाकडे नाही ) तर कुणाला ज्ञानाचा ( माझ्याएवढं कुणी ज्ञानी नाही ) तर कुणाला भक्तीचा सुद्धा अहंकार असतो ( माझ्यासारखी कोणी भक्ती करत नाही ) , आणि या अहंकारा पायी मी म्हणेन तेच खरं , माझंच योग्य आहे , अशी भावना वाढीला लागणे म्हणजे अहंकार.

आपणास सर्व माहिती आहे , सर्व ज्ञान आहे असा हट्ट धरणे आणि दुसऱ्याला पटवून देण्यासाठीचा हट्ट कशाला हवाय …अशा हट्टापायी मनुष्य स्वतःपासूनही आणि इतरांपासूनही दूरावला जातो .

मला अजिबात , कसलाच अहंकार नाही , हे वारंवार सांगणे हा पण अहंकार आहे .

अहंकारामुळे मनुष्य फक्त’ मी ‘ भोवतीच फिरतो , दुसऱ्याला कमी लेखतो त्याच्या बोलण्यातून अहंकाराचा दर्प येतो , दुसऱ्याची फिकीर न करता कसेही बोलणे , दुसऱ्याचा अपमान करणे , यामुळे त्या व्यक्तीपासून माणसे दुरावली जातात आणि शेवटी अशा मनुष्यापासून लोकं दूर राहतात मग शेवटी अहंकारी मनुष्य एकटा पडतो .

अहंकारी मनुष्याला मुळात आपल्याला अहंकार झाला आहे हे पटत नाही , आणि वाटत ही नाही , दुसऱ्याना दिसत असतो .

त्याला किंवा तीला स्वतःची चूक दिसत नाही आणि दुसऱ्यातील चांगले गुण ही दिसत नाहीत , अहंकाराने बुद्धी कुंठीत होते , चांगलेवाईटाची विचार करण्याची शक्ती कमी होते आणि नको ती गोष्ट घडण्याचा संभव असतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात ” महापूरे झाडे जाती , तेथे लव्हाळी वाचती “! महापूर आल्यावर ताठलेली झाडे कोलमडून पडतात आणि लव्हाळी महापूर आल्यावर वाकतात , झुकतात आणि पुन्हा महापूर ओसरल्यावर ताठ मानेन उभी राहतात .

अगदी तसंच अहंकाराने ताठलेली माणसे एकटी पडल्यामुळे संकटात कोलमडून पडतात तेव्हा त्यांच्या स्वभावामुळे इतर लोकही त्यांच्या मदतीला येत नाहीत .

खरंतर आपण पृथ्वीतलावरील , विश्वातील अगदी सूक्ष्म कण आहोत , हे सर्व सोडून तर जाणार आहोत , मग एवढा अहंकार कशासाठी!

अहंकार होऊच देऊ नये आणि जर झालाच तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती पहा , कर्तृत्ववान व्यक्ती पहा आणि आपल्याला ज्या गोष्टी कधीच जमल्या नाहीत त्या गोष्टीकडे पहा म्हणजे वाटेल की आपण अजून खूप मागे आहे आणि आपला अहं मागे येईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!