Skip to content

अस्थिर मन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही…

अस्थिर मन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


निर्णय..! आपल्या आयुष्यात ज्याला खूप महत्वाच स्थान आहे असा हा निर्णय..!! एकदा निर्णय चुकला की आयुष्याची बरीच गणितं सहजासहजी चुकतात. निर्णय चुकतो पण त्यातून आयुष्यभरासाठी एक अनुभव मात्र मिळून जातो.जसं निर्णयाला आयुष्यात स्थान आहे तसच ‘मन’….आपल्या या मनालाही आयुष्यात तितकच महत्त्वाच स्थान आहे.

आपण अनेकदा म्हणतो , माझं लक्षच लागत नाहीये , आज माझं चित्त काही थाऱ्यावर नाही. याचाच अर्थ काय तर…आपलं मन हे स्थिर नाही. आणि जेव्हा हे मन स्थिर , शांत नसतं तेव्हा आपले अनेक निर्णय चुकतात. मुळातच मन अस्थिर असताना एखादा निर्णय घेणे म्हणजे जरा अवघडच…! कारण , जेव्हा मन शांत नसतं , एका अस्थिर अवस्थेत असतं तेव्हा आपण अनेकदा एखादा निर्णय घेताना गोंधळून जातो.

आपल्याला समजत नसतं काय करावं…नी काय करू नये. हां , असेल हा निर्णय बरोबर असं म्हणून एका क्षणात निर्णय घेऊन मोकळे होतो.पण हे असेच घाईघाईत , मन स्थिर नसताना घेतलेले निर्णय बहुतांशी चुकतातच. आणि नंतर मात्र आपण आपला निर्णय चुकला म्हणून स्वतःलाच दोष देत बसतो.आणि मग लक्षात येतं की मन अस्थिर असताना निर्णय घेणं किती घातक असतं . कोणताही निर्णय अशा अवस्थेत मुळीच घेऊ नये याची जाणीव आपल्याला तो चुकलेला निर्णय करून देतो.

तुमचही कधी कधी असं होत असलेच….कोणत्या ना कोणत्या कारणामुळे , एखाद्या प्रसंगामुळे ,घटनेमुळे आपलं मन हे अस्थिर होतं जातं.आपलं लक्ष ती घटना किंवा तो प्रसंग सोडून इतरत्र कुठेही लागत नसतं.सतत मनात तोच विचार , तेच प्रश्न असतात. आणि अशातच एखादा महत्वपूर्ण निर्णय घ्यायची वेळ आली तर या अस्थिर मनाला काही सुचेनासं होतं.निर्णय घेतोय , तो बरोबर असेल नं…? की चुकेल…? अशी द्वीधावस्था होते या मनाची…!

खरच अशावेळी अस्थिर मन कधी स्थिर होईल असच वाटत रहातं.कारण निर्णय चुकला तर मन अजून अस्थिर ,चलबिचल होणार असतं.कितीदा पाहतो आपण अस्थिर मनाला…! कधी एखाद्या तणावाखाली असताना , परिक्षेचा ताण , कुणाशी भांडणतंटा , कुणाशी काही क्षुल्लक खटके , रागरूसवे , ते अगदी एखादा वाईट प्रसंग……. अशावेळी स्थिर , शांत असलेल मन हे क्षणात अस्थिर होऊन जातं.त्यामुळे सगळच बिघडून जातं.वेगवेगळे टेन्शन्स वाढतच जातात.

खरचं , मन शांत , स्थिर असणं किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नकोच…. कारण प्रत्येक जण अशा मनाच्या अस्थिर अवस्थेतून जातोच….त्यामुळे शांत , स्थिर मनाच महत्त्व तो जाणून असतो.अस्थिर मन सहजासहजी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही याची जाणीव प्रत्येकाला एक ना एक दिवस होते. कारण , एका निर्णयावर आपल्या आयुष्याचे पुढचे प्रवास घडत असतात त्यामुळे शांत मनाने निर्णय घेणे खूप आवश्यक असतं.कारण अस्थिर मन एकतर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही… किंवा मग घेतला तर तो निर्णय कितपत योग्य असु शकतो याची शाश्वती आपण स्वतःच स्वतःला देऊ शकत नाही.

अस्थिर मन……आयुष्यातील कित्येक निर्णय चुकवतो , कित्येक गोष्टी इकडच्या तिकडे करून ठेवतो.अस्थिर मन हे गोंधळलेल्या अवस्थेत असतं.ते एकाग्र नसतं…तळ्यात मळ्यात असा त्याचा गोंधळ झालेला असतो.अनेकदा आपण अशा अवस्थेत असताना कित्येकजण आपल्याला सांगत असतात की , “थोडा शांत हो …शांत मनाने विचार कर…आणि मगच निर्णय घे….उगाचच अशा गडबडलेल्या , कावऱ्याबावऱ्या अवस्थेत कोणताही निर्णय घेऊ नको….”

कदाचित तो निर्णय चुकू नये यासाठीच त्यांची ती सगळी धडपड असावी.एखादा अपवाद असेलही याला…पण तरीही अस्थिर मन हे सहजासहजी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आणि चुकून असा निर्णय घेतलाच तर….त्याच्या कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आपली मानसिक तयारी असावी.चांगल काही घडलं तर चांगलच आहे… पण चुकून काही झालच तर आयुष्यभरासाठी एक अनुभव मात्र नक्कीच मिळतो.म्हणून अस्थिर मनाला सांभाळताना जरा जपूनच….! नेहमी मन स्थिर , शांत ठेवण्याचा प्रयत्न करा…निर्णय घ्यायलाही त्याचा व्यवस्थित उपयोग होईल.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!